जलप्रदूषण – मराठी निबंध | Water Pollution Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा जलप्रदूषण – मराठी निबंध (Water Pollution Essay In Marathi) आहे. या निबंधात जल प्रदूषणाची कारणे, लक्षणे आणि उपाय यांची चर्चा करण्यात आलेली आहे.

जलप्रदूषण निबंध मराठी | Jal Pradushan Marathi Nibandh |

मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे अतिशय नुकसान झालेले आहे. त्यामुळेच पाणी, हवा, ध्वनी आणि मृदा प्रदूषण अशा काही समस्या निर्माण झाल्या आहेत. यापैकी जल प्रदूषणाची समस्या अधिक गंभीर मानली जाते.

सजीवांना जगण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. पृथ्वीवर फक्त एक ते दीड टक्के पाणी पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ 98% पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरूपात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरणे आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात त्याला जलप्रदूषण म्हणतात. ते पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते.

जल प्रदूषण समस्येसाठी मानवच सर्वस्वी जबाबदार आहे. वाढते शहरीकरण, कचरा व सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, औद्योगिकीकरण अशा अनेक कारणांद्वारे जलप्रदूषण होत असते. काही ठिकाणी दैनंदिन कचरा देखील लोक नद्या, नाले व तलावांमध्ये टाकताना दिसून येतात.

जल प्रदूषणामुळे पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहेत. नद्यांचे व  तलावांचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यामध्ये राहणाऱ्या जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. हे पाणी वापरता येत नसल्याने आपल्याला पाणीटंचाईचा सामना देखील करावा लागतो.

अशा दूषित पाण्याचा वापर झालाच तर आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. जल प्रदूषणामुळे पाण्यामध्ये जिवाणूंची उत्पत्ती होते असे जिवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात.

ताप, अतिसार, उलटी, टायफॉईड, अशा विविध रोगांची लागण आपल्याला होऊ शकते. तसेच दूषित व साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते. जल प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा जलचर प्राण्यांवर दिसून येतो. प्रदूषित पाण्यातील सजीवांचे जीवन विषारी घटकांच्या सेवनाने धोक्यात येते.

शेतीत रासायनिक खतांचा वापर टाळणे, घरगुती आणि दैनंदिन कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे, दैनंदिन वापरातील पाण्याचे स्त्रोत जसे की नदी किंवा तलावावर कपडे आणि जनावरे धुण्यास लोकांना बंदी घालणे असे जलप्रदूषण रोखण्यासाठी वैयक्तिक स्तरावर उपाय असू शकतील.

जलप्रदूषण रोखण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक जलस्त्रोत स्वच्छ करणे तसेच जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना करणे, अशा विविध योजना आणि उपक्रमांतून जलप्रदूषण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.

लेखन सौजन्य – निकिता पवार

तुम्हाला जलप्रदूषण हा मराठी निबंध (Water Pollution Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…धन्यवाद!

Leave a Comment