Penguin Information in Marathi |Penguin Essay | पेंग्विन संपूर्ण माहिती!

पेंग्विन पक्षी दिसायला खूपच गोड असतो. पेंग्विन पक्षाला उडता येत नाही. सामान्यतः हा पक्षी अंटार्क्टिका खंडात आढळतो. हा पक्षी स्फेनिसिडी कुलातील पक्षी आहे. या कुलात एकूण १७ जाती आहेत. त्यापैकी एम्परर पेंग्विन हा सर्वात प्रसिध्द आहे. तसेच अंटार्क्टिका व्यतिरिक्त तो अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांतही आढळतो.

पेंग्विन सहसा पाण्यात आणि पाण्याशेजारी आढळतो. त्याचे शरीर जाड असते. त्याच्या शरीरावर काळी, निळसर राखाडी रंगाची आणि पांढरी पिसे असतात. पोटाच्या बाजूला पांढरी पिसे असतात. शरीर जाड असल्याने चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे थंडीत त्यांना शरीराचे तापमान उबदार ठेवण्यास मदत होते. त्यांचे पाय वाकडे आणि छोटे असतात. छोट्या पायांनी त्यांची चाल डौलदार वाटते. तो वेगाने चालू शकत नाही. 

पेंग्विनला एक आकर्षक चोच असते ज्याद्वारे त्याचे शरीर खूपच सुंदर दिसते. चोच काळया किंवा निळ्या – जांभळ्या रंगाची असते. त्यांचे पंख वल्ह्यासारखे असतात परंतु त्यांना उडता येत नाही. नैसर्गिक शरीररचना थोडी वेगळी असल्याने त्यांचे स्थलांतर वेगाने होत नाही. प्रत्येक ऋतूत जुळवून घेण्याची क्षमता चांगली असते. त्यांची ऐकण्याची क्षमता देखील चांगली असते. त्यांच्या पायांना पडदे असतात ज्यामुळे बर्फात ते व्यवस्थित चालू शकतात. 

जमिनीवर किंवा उष्ण प्रदेशात त्यांचे राहणे थोडे अवघड आहे. त्यांचे शरीर आणि पाय जास्त उष्णता सहन करू शकत नाहीत. जास्त वेळ ते समुद्रातच असतात. पाण्यात ते वेगाने पोहू शकतात. त्यांचे पंख मजबूत असतात ज्याद्वारे ते पाण्यात सहज पोहू शकतात. त्यांची चाल हळू असल्याने जलद चालताना ते कधी कधी पडतात आणि बर्फावरून घसरू लागतात. उंचच्या उंच बर्फाळ पर्वत ते सहज पार करतात. स्थलांतर करताना ते समूहाने चालत जातात. 

समुद्रातील छोटे जीव जसे मासे, खेकडे, कोळंबी हे त्याचे खाद्य आहे. समुद्रातील शिकारी जीव त्यांची शिकार करू शकतात. त्यामुळे ते जास्त खोल समुद्रात जात नाहीत. पोहताना त्यांची खूप ऊर्जा खर्च होत असते ज्यामुळे त्यांना सतत खाण्याची गरज वाटते. प्रजनन काळ हा त्यांच्यासाठी खूप सुरक्षित असावा लागतो. सर्व पेंग्विन समूहाने एखाद्या ठिकाणी जमतात आणि सर्व नवीन जन्मलेल्या पेंग्विन पक्षाला सुरक्षा प्रदान करतात.

समूहात असताना त्यांचा कोलाहल सतत चाललेला असतो. पेंग्विन नर आणि मादी आयुष्यभर सोबत राहतात. विणीचा काळ हा मादी पक्षाचा अंडी देण्याचा काळ असतो. अंडी उबवण्याचा काळ हा दोन महिन्यांपर्यंत असतो. अंडे दिल्यानंतर अंडे उबवण्याची जबाबदारी नर पेंग्विन घेतो त्यावेळी मादी अन्न जमा करण्यासाठी निघून जाते. एकदा अंड्यातून पिल्लू बाहेर आले की नर अन्न शोधण्यासाठी जात राहतो. हे सर्व कार्य समूहाने होत असते. पेंग्विन मादा आपल्या पिल्लाला आवाजावरून ओळखते. पिल्लू थोडे मोठे झाल्यावर स्वतंत्र राहू लागते.

Leave a Comment