ऑनलाईन परीक्षा – मराठी निबंध | Online Exam Essay In Marathi

सध्या सर्व विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागत आहे. अशा ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप, फायदे-तोटे, परीक्षा देताना येणाऱ्या अडचणी, अशा सर्व बाबींवर मुद्देसूद चर्चा ऑनलाईन परीक्षा (Online Exam Essay In Marathi) या निबंधात करायची असते.

ऑनलाईन परीक्षा मराठी निबंध | Online Exam / Test Marathi Nibandh

ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी असे सध्या आपण वारंवार ऐकत आहोत. शाळेत जाऊन परीक्षा देणे हे लॉकडाऊन / कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा घेण्याऐवजी ऑनलाईन परीक्षेची मागणी सतत डोके वर काढत आहे.

इंटरनेटमुळे कॉम्प्युटर आणि मोबाईलवर संवाद आणि माहितीचे आदानप्रदान सहजशक्य आहे. त्याचाच उपयोग शिक्षणातही केला जाऊ लागला आहे. ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थी पर्यायी प्रश्न सोडवतील अथवा परिच्छेद स्वरूपात उत्तरे देऊ शकतील ज्यामुळे त्यांच्या अभ्यासाचे आकलन होऊ शकेल.

ऑनलाईन परीक्षेचे अनेक फायदे सांगता येतील. जसे की, ऑफलाईन परीक्षेत वापरल्या जाणाऱ्या कागदी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांचा वापर कमी होईल, परीक्षा घेण्यात आणि निकाल लावण्यात लागणारा वेळ आणि ऊर्जा वाचेल. शिक्षण संस्थांवरील अतिरिक्त आर्थिक बोजा कमी होईल.

सततच्या संगणक वापरामुळे मुले लिखाण विसरून जातील. हस्ताक्षर आणि पर्यायाने भाषिक विषय कवडीमोलाचे ठरतील. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषेच्या विषयांचे महत्त्व राहणार नाही. परीक्षेची नियमावली आणि परीक्षा तंत्र हे सर्व ठिकाणी सारखेच नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये गुणवत्तेबद्दल मनात कायम शंका राहील.

पर्यायी प्रश्न आणि त्यावर नकल उत्तराची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत ऑनलाईन परीक्षा घेणे हा शैक्षणिक संस्थेचा उपक्रम व्यवस्थित विकसित होत नाही तोपर्यंत नेहमीच या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. ही परीक्षा इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असल्याने कधी नेटवर्क बिघाड झालाच तर परीक्षा घेण्यात व्यत्यय येऊ शकतो.

ऑनलाईन परीक्षेतील संधी तशा खूप आहेत. स्पर्धापरीक्षा जर ऑनलाईन असेल तर विद्यार्थ्यांचा वेळ आणि निकाल लावण्यात लागणारा वेळ वाचेल. शिक्षकांवर शिकवण्याव्यतिरिक्त लादलेली इतर कामे कमी होतील. व्हिडिओ तंत्रज्ञान विकसित झाल्याने ऑनलाईन वर्ग आणि तोंडी परीक्षा साहजिकच ऑनलाईन घेतली जाऊ शकते.

शाळेत जाऊन शिकणे ही संकल्पना काही वर्षानंतर नसेलच. सर्व ठिकाणी ऑनलाईन शाळा निर्माण होतील. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थी हा घरी बसूनच मोबाईल आणि संगणकाचा वापर करून शिक्षण घेण्यात मग्न असेल.

ऑनलाईन परीक्षेत नेटवर्क हा सर्वात मोठा अडथळा असू शकेल. ग्रामीण भागात अजूनतरी नेटवर्क म्हणावे तसे विकसित नाहीये. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेताना विद्यार्थी संतप्त होऊ शकतात. इंटरनेटसाठी प्रत्येक वेळी रिचार्ज करावा लागणार म्हणजे अतिरिक्त आर्थिक भार आहेच!

संगणक आणि मोबाईलमध्ये अगोदरच एवढ्या माहितीचा पसारा आहे की विद्यार्थ्याला शिक्षण घेणे म्हणजे स्वतःजवळ एक मोबाईल असणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षणतज्ञ आणि शिक्षण मंडळ यांनी व्यवस्थित आणि सुनियोजित आखणी केल्यास ऑनलाईन परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सहाय्यकच ठरेल.

तंत्रज्ञान आणि त्याचा शिक्षणातील उपयोग पाहता पुढील काही वर्षांचे नियोजन करून ऑनलाईन परीक्षा ही चाचणी परीक्षेत उपयोगी ठरेल त्यानंतर बोर्ड किंवा स्पर्धा परीक्षेत त्यांचा वापर करणे सुयोग्य ठरेल. नाहीतर अपुऱ्या ज्ञानामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे हा आणखी एक उपक्रम राबवण्यासारखे होईल.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला ऑनलाईन परीक्षा मराठी निबंध (Online Exam Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment