प्रस्तुत लेख हा निसर्ग माझा मित्र (Nisarga Majha Mitra Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. निसर्गाचा सहवास हा एखाद्या मित्रासारखाच असतो अगदी निरपेक्ष आणि स्वच्छंदी! अशा आशयाच्या या निबंधात निसर्गाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे.
निसर्ग माझा सोबती निबंध मराठी | Nisarga Majha Sobati Nibandh Marathi |
पूर्ण आठवडाभर शाळेत व्यतित केल्यानंतर सुट्टी दिवशी मला माझे बाबा बाहेर फिरायला घेऊन जातात. जवळच्या एका निसर्गरम्य ठिकाणी जाणे हे आमचे प्रत्येकवेळचे नियोजन असते. लहानपणी मला समजत नसे की आम्ही का जातोय, परंतु सध्या निसर्गाविषयीची माझी समज वाढलेली आहे.
मला निसर्ग हा माझा खरा मित्र वाटतो. जसे आपण मित्राजवळ असताना एकदम निवांत आणि मुक्त वावरतो तसेच निसर्गात गेल्यावरही आपल्याला स्वच्छंदपणे विहरता येते. निसर्गात गेल्यावर मला थोडाही त्रास आणि कसलाच तणाव जाणवत नाही.
आपल्या आसपासची झाडे, नद्या, हवा, प्राणी – पक्षी, सूर्य – चंद्र, आकाश, जमीन, जे जे काही डोळ्यांनी दिसेल तो सर्व निसर्गच आहे. आपण स्वतःदेखील निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे निसर्गात गेल्यावर आपल्याला एकदम ताजेतवाने वाटते आणि निसर्ग सौंदर्य पाहून कधीकधी अचंबितही होत असतो.
निसर्गाकडून अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या प्राथमिक गरजा भागवल्या जातात. पूर्वीपासून मनुष्य प्राणी हा आपले जीवन सुंदर व सोयीस्कर बनवण्यासाठी निसर्गाचा उपयोग करत आलेला आहे. त्यामध्ये बुद्धी व कलेचा विकास तसेच राहणीमानाचा स्तर अशा बाबी आपण निसर्गाकडूनच पूर्ण करत आलेलो आहोत.
निसर्गात आपल्याला पाऊस, थंडी, ऊन इत्यादी बाबी जाणवतात ज्या पृथ्वीवरील सजिवांसाठी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच हवा, पाणी, अन्न अशा बाबी देखील निसर्गात सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निसर्गाकडून आपल्याला जे जे काही मिळते त्याबद्दल आपण त्याचे नेहमी कृतज्ञ राहायला हवे.
मानवी अहंकार व स्वार्थ यांमुळे सध्या आपण निसर्गापासून खूप दूर होत चाललेलो आहोत. निसर्गाचा सहज उपयोग हा आता राहिलेला नाहीये. अगदीच औद्योगिक व यांत्रिक प्रकारचे जगणे झाल्याने खूप साऱ्या शारिरीक व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.
सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी तज्ञ नेहमी निसर्गोपचार पद्धतीचा सल्ला देतात व निसर्गमय राहणीमान स्वीकारण्याचे सुचवतात. निसर्ग आपल्याला एवढा सहाय्यभूत असल्याने निसर्गाला आपण आपल्या जीवनशैलीत समाविष्ट करायलाच हवे.
मानवी स्वार्थ साधल्याने भविष्यात देखील नुकसानच होण्याची शक्यता आहे. आपण निसर्गावर नेहमीच आक्रमण करत असतो जसे की बेसुमार वृक्षतोड करणे, नद्यांचे प्रवाह रोखणे, जमिनीत व पाण्यात रासायनिक कचरा मिसळणे. अशा कृतींमुळे निसर्ग आपल्यावर कोपत असतो.
निसर्गाला सहाय्य करून जर आपण जीवन व्यतित केले तर आपले जीवन आनंदमय होण्याची शक्यता खूप वाढते. निसर्गाला मित्र मानून जर मानवी पिढ्यांनी भविष्याची वाटचाल केली तर सध्याच्या सर्व मानवी समस्या दूर होऊन एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते.
तुम्हाला निसर्ग माझा मित्र हा मराठी निबंध (Nisarga Majha Mitra Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…