निसर्ग मराठी निबंध | निसर्गाचे उपकार | Nature Essay In Marathi |

निसर्ग (Nature) ही संकल्पना खूप विस्तारपूर्ण आहे. स्वतःचे अस्तित्व आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी आपला संबंध खूप खोल आहे त्यामुळे निसर्गाशी लहानपणापासून मेळ बसला पाहिजे. निसर्ग आपल्या सर्वांचा आवडता बनला पाहिजे तरच आपण त्याची काळजी घेऊ शकू! याचे ज्ञान येण्यासाठी निसर्ग निबंध ( Nature Essay In Marathi ) लिहणे अपेक्षित असते.

निबंध लिहताना निसर्गाचा आणि मानवाचा संबंध दर्शवणे आणि जास्त काल्पनिक विस्तार न करणे गरजेचे आहे. मुद्देसूद वाक्यरचना असली पाहिजे आणि कुठल्याच मुद्द्यात अतिशयोक्ती करायची नाही. चला तर मग पाहूया, कसा लिहू शकता “निसर्ग” या विषयावर निबंध!

निसर्ग निबंध | Nisarg Marathi Nibandh |

जे जे मानवनिर्मित नाही त्याला आपण निसर्ग म्हणू शकतो. पाणी, हवा, अग्नी, पृथ्वी आणि आकाश ही तत्त्वे निसर्गात आढळतात. त्यांचे स्त्रोत वेगवेगळे आहेत. जसे नद्या, समुद्र, डोंगर, जमीन, सूर्य, झाडे जे जे आपल्याला आसपास डोळ्यांनी दिसते आणि दिसत नाही त्या सर्वांचा मिळून निसर्ग तयार होतो. अशी एक व्याप्त व्याख्या निसर्गाची करता येईल.

पृथ्वी वर्तुळाकार दिशेत स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत आहे. आपल्याला जे दिवस रात्र जाणवतात ते खऱ्या अर्थाने पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरत आहे. पृथ्वीवर एक जीवनदायी वातावरण आहे ज्यामध्ये खूप सारे घटक समाविष्ट आहेत. पाणी आणि हवा हे त्यामध्ये मुख्य जीवनदायी घटक म्हणता येतील. त्यांची उपलब्धता ही निसर्ग नियमानुसार होत असते. माणूस, प्राणी, झाडे, जे जे सजीव पृथ्वीवर आहेत ते एकमेकांशी आणि पर्यायाने निसर्गाशी जोडलेले आहेत.

हवा आणि पाणी सर्वांना आवश्यक आहे. तसेच जगण्यासाठी म्हणजे जीवन गतिमान ठेवण्यासाठी अन्न आवश्यक आहे. याव्यतिरिक्त अग्नी आणि आकाश ही तत्त्वे जीवनाला सांभाळून आहेत. पृथ्वीला अनेक उर्जाबले सांभाळून आहेत. एकत्र जीवन आणि निसर्ग समजणे खूप कठीण आहे तरी आपण सभोवतालचे वातावरण म्हणजे निसर्ग समजतो की ज्याद्वारे आपले जीवन गतिमान आहे.

आता मानवी जीवन आणि निसर्ग यांचा संबंध आपण पाहूया. निसर्गात वेगवेगळे ऋतु असतात, त्यानुसार आपल्या शेजारील वातावरण आणि हवामान बदलत असते. पाऊस पडतो, ऊन असते, थंडी जाणवते हे सर्व बदल जगण्यासाठी आवश्यकच आहेत. तसेच पाण्याची गरज आणि हवा शुद्धीकरण यासाठी निसर्गचक्र आहे ज्याद्वारे पृथ्वीवर फिरून फिरून पाऊस पडत असतो तसेच वातावरणात हवेचे थर आहेत ज्यामुळे आपल्याला आवश्यक असणारी हवा आपण श्वास म्हणून घेऊ शकतो.

अग्नीची गरज ही नंतर निर्माण झाली आणि आपण अन्न शिजवून खाऊ लागलो. अन्न निर्मिती आपण शेती आणि झाडे यांमार्फत करू लागलो. झाडांचा आपल्या जीवनात अमूल्य असा वाटा आहे. झाडे ऑक्सिजन बाहेर सोडतात ज्याचा वापर आपल्याला श्वास घेताना होतो. तसेच शेतात पिकणारे कच्चे धान्य आपण अन्न म्हणून वापरतो. सर्वांना जीवनदायी ठरणारे पाणी हे आपल्याला नद्या आणि समुद्रामार्फत मिळत असते.

निसर्ग हा माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. पण जेव्हापासून उद्योग आणि विज्ञान हे माणसाच्या जीवनात प्रविष्ट झाले तेव्हापासून निसर्गचक्र बिघडू लागले. लोकसंख्यावाढ झाल्याने निसर्गावर आक्रमण सुरू झाले. नद्यांचे प्रवाह थांबवले गेले, प्रदूषण वाढले, हवा दूषित झाली. जंगलतोड सुरू झाली. एक निसर्गनिर्मित परिसर आपण आपल्या पद्धतीने सजवू लागलो आणि एक काँक्रिटचे जग उभे राहिले. त्याचा परिणाम म्हणून स्वच्छता आणि आरोग्य यामध्ये समस्या निर्माण झाल्या.

माणसाचा जन्म आणि मृत्यू हेदेखील निसर्ग प्रक्रियेचा एक भाग आहे. याचे मूळतत्त्व समजून घेऊन माणसाला हव्यास आणि स्वार्थ सोडावा लागेल नाहीतर त्याचे परिणाम सार्वजनिक पद्धतीने आपल्याला भोगावे लागतील. तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा नियंत्रित वापर झाला पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरण स्वच्छ होण्यासाठी उपयोजक धोरणे राबवली गेली पाहिजेत.

निसर्ग हा सर्व काही देत असतो असे म्हणण्यापेक्षा आपणच निसर्गाचा, प्रकृतीचा एक भाग आहोत, असे समजले पाहिजे. येथे उपलब्ध असलेले सर्व स्त्रोत आणि जीव हे एकमेकांशी जोडले गेले आहेत. फक्त एक देश किंवा समाज विकसित करायचा म्हणून निसर्गाशी खेळ करायचा नाही. त्यावर पर्याय म्हणून नैसर्गिक जीवनपद्धती अवलंबली गेली पाहिजे. ज्यामुळे मानवी विकास हा शाश्वत म्हणता येईल आणि आपल्या शेजारी असणारे पक्षी, प्राणी, नद्या, झाडे, डोंगर, जमीन हे सर्व देखील सुसंगत पद्धतीने सुरळीत होतील.

तुम्हाला निसर्ग मराठी निबंध किंवा निसर्गाचे उपकार ( Nature Essay In Marathi ) निबंध कसा वाटला ? हे नक्की कमेंट करून सांगा…धन्यवाद!

Leave a Comment