वडिलांचे प्रेम हे थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असते. माझे वडील तशाच पद्धतीचे आहेत. किंबहुना सर्वांचेच वडील तसे असतात. जास्त शब्दांनी व्यक्त न होता स्वतःचे कर्तव्य करीत जाणे हेच त्यांना माहीत असते. वडील हे त्यांच्या कर्तव्यात कधीच पदच्युत होत नाहीत हे आपल्याला मोठे झाल्यावर कळते.
माझे वडील या विषयावर निबंध लिहताना स्वतःचे वडिलांसोबतचे अनुभव आणि प्रसंग व्यक्त करायचे असतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपल्याला कळते की वडिलांचे संस्कार म्हणजेच आपले व्यक्तिमत्त्व आहे. आपल्यासाठी वडिलांनी केलेले प्रत्येक कार्य हे किती अनमोल होते, अशा आशयाचा निबंध लिहणे अपेक्षित असते. चला तर मग पाहूया, कसा लिहाल, “माझे वडील” किंवा ” माझे बाबा ” हा निबंध!
माझे वडील निबंध ! Marathi Essay – My Father |
प्रत्येक लहान मुलाची वाढ, त्याचे संगोपन आणि संस्कार हि कुटुंबातल्या सर्वांची जबाबदारी असते. परंतु आई आणि बाबा हे त्या कार्यात दोन प्रमुख घटक असतात. आईची माया ही जीवनात स्नेह आणि प्रेम निर्माण करत असते तर वडिलांची माया ही जीवन घडवत असते. माझे वडील हे माझ्यासाठी मित्र, शिक्षक, आदर्श असे सर्वकाही आहेत.
माझ्या वडिलांचे नाव सुरेश लक्ष्मण मोरे असे आहे. माझे वडील हे सरकारी कार्यालयात काम करतात. त्यांची कामाप्रती निष्ठा आणि आवड पाहून मलाही त्यांच्याप्रमाणे काम करावेसे वाटते परंतु माझे स्वप्न हे खेळाडू बनण्याचे आहे. माझे वडील त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मला आत्तापासून मदत करत आहेत. शिक्षण आणि खेळ या दोन्हींमध्ये माझे वडील तरबेज आहेत. मीही कोणताही खेळ उत्तमरित्या खेळतो. त्यांनी मला खूप सारे खेळ शिकवलेले आहेत.
क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन या खेळांत मी तरबेज आहे. त्याचे सर्व श्रेय माझ्या बाबांना जाते. चांगला खेळाडू खेळही उत्तमरीत्या खेळू शकतो आणि चांगले आरोग्यदायी जीवनही जगू शकतो असे त्यांना वाटते. मी उत्तम व्यक्ती बनावं असं माझ्या वडिलांचं स्वप्न आहे. माझे करीअर कोणतेही असले तरी त्यामध्ये मी सहज आणि आनंदी वागलो पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. विचार आणि सल्ले देण्यापेक्षा त्यांचा सरळसरळ अनुभव घेण्याकडे भर असतो.
माझे वडील हे सकाळी लवकर उठतात आणि मलाही उठवतात. सकाळी उठल्यावर व्यायाम करणे आणि धावणे हे सक्तीचे आहे. ते मला आणि माझ्या भावाला व्यायाम शिकवतात. शरीर तंदुरुस्त असेल तर सर्वकाही शक्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर ते अंघोळ आणि नाश्ता करून कामाला निघून जातात. आम्हीही त्यानंतर शाळेत जातो. शाळेत गेल्यावर शिस्त पाळणे आणि अभ्यास करणे ही देखील त्यांची शिकवण आहे.
घरात जास्तवेळ न थांबता बाहेर मोकळ्या वातावरणात फिरणे गरजेचे आहे म्हणून रात्री जेवण झाल्यावर ते आम्हाला बाहेर परिसरात फिरायला नेतात. सुट्टीचा दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. त्या दिवशी आम्ही बाहेर गावी किंवा बागेत सहकुटुंब नक्की फिरायला जात असतो. तेथे गेल्यावर आईस्क्रीम खाणे, मौजमजा करणे हे आमचे ठरलेलेच असते.
व्यायाम, खेळ, आणि अभ्यास हे तीन पैलू माझ्यात विकसित करण्यासाठी माझे वडील खूप प्रयत्न करतात. प्रसंगी कठोर देखील वागतात. त्यांचे ते वागणे तात्पुरते आणि माझ्या भल्यासाठीच असते. माझे वडील घरी असताना आईबरोबर कधीच वाद घालत नाहीत. आईला ते व्यवस्थित समजून घेतात. कधीकधी आईला शॉपिंगला सुद्धा घेऊन जातात. माझा भाऊ हा उत्तम गातो त्यामुळे त्याला त्यांनी गाण्याच्या शिकवणी लावलेल्या आहेत.
खरा कसोटीचा काळ येतो तो म्हणजे सुट्टीत! माझे वडील धाडसी प्रसंग अनुभवायला लावतात आणि खूप कष्टाचे काम करवून घेतात. धाडसी प्रसंगातून आणि कष्टाच्या कामातून आपली शारीरिक आणि मानसिक कणखरता वाढत जाते असे ते सुचवतात. त्यामध्ये नदीत पोहणे, ट्रेकिंगला जाणे, लांबच लांब अंतर सायकलिंग किंवा रनिंग करणे अशी कितीतरी धाडसी कृत्ये आम्हाला करावी लागतात. त्यामुळे आमचा स्वभाव हा साहसी आणि धैर्यशील बनला आहे.
माझे वडील हे प्रत्येक शिकवण प्रत्यक्ष कृतीतून देत असतात. ते आमचा लाड करतात त्याबरोबरच कठोरही वागतात. आमचे जीवन उदात्त बनत जावे अशी त्यांची इच्छा आहे. स्वावलंबी होण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. कोणत्याच गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहता कामा नये असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एवढी दूरदृष्टी ठेवणारे माझे वडील हे माझ्यासाठी आदर्श आहेत.