माझा आवडता विषय – विज्ञान निबंध । Maza Avadta Vishay Nibandh |

“माझा आवडता विषय” या विषयावर विद्यार्थ्यांना निबंध लिहावा लागतो. आवडणाऱ्या विषयावर निबंध लिहताना जास्त अतिशयोक्ती न करता नक्की कोणत्या कारणांमुळे तो विषय आवडता आहे याचा कल्पनापूर्वक वास्तववादी विस्तार करायचा असतो. चला तर मग पाहूया कसा लिहायचा, माझा आवडता विषय – विज्ञान (Majha Avadta Vishay – Vidnyan Nibandh) हा मराठी निबंध!

माझा आवडता विषय – विज्ञान मराठी निबंध । My Favourite Subject – Science Essay In Marathi |

आमच्या शाळेत एकूण सहा विषय शिकवले जातात परंतु त्यामध्ये विज्ञान हा माझा आवडता विषय आहे. भाषेचे विषय तसेच गणित, इतिहास हे विषय मला सोप्पे वाटतात पण विज्ञानामुळे मला शिकण्याची एक नवीन प्रेरणा मिळत राहते. विज्ञानात रोज नित्य नवीन काहीतरी शिकायला मिळत असते. विज्ञानातील गणिते, प्रयोग, संकल्पना, नियम सर्व काही मला खूप आवडते.

आम्हाला विज्ञान हा विषय पाचवीपासून सुरू झाला. सुरुवातीला मला विज्ञानातले काहीही समजत नव्हते पण हळूहळू मला त्यामध्ये आवड निर्माण होऊ लागली. प्रत्येक दिसणाऱ्या सजीव आणि भौतिक वस्तूत, त्याच्या असण्यामागे आणि कार्य करण्यामागे असणारी कारणे ही खूप गूढ आहेत आणि ती आपल्याला माहीत असलीच पाहिजेत, असे मला वाटते.

आम्हाला पी. आर. कदम मॅडम या विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी विज्ञान विषयातल्या प्रत्येक व्याख्या, नियम, आणि प्रयोग आम्हाला अगदी उत्तमरित्या शिकवलेले आहेत. आमच्या शाळेत एक भव्य विज्ञानाची प्रयोगशाळा आहे. त्यामध्ये आमचे आठवड्यातून दोनदा विज्ञानाचे प्रयोग असतात. प्रयोग असताना मॅडम आम्हाला अगोदर प्रयोग करून दाखवतात आणि आम्ही नंतर मिळून सारेजण तोच प्रयोग करतो.

आमच्या घरीदेखील मी अधूनमधून विज्ञानाचे काही प्रयोग आजमावत असतो. माझी आई मात्र कधीकधी त्यामुळे वैतागते. बाबा मला संपूर्णतः सहाय्य करतात. विज्ञानातील एखादी संकल्पना मला समजत नसेल तर ते उत्तमरीत्या समजावून सांगतात. विज्ञान एकदम परिपूर्णरित्या समजण्यामागे माझ्या बाबांची देखील तेवढीच मेहनत आहे.

बुध्दीचा संपूर्णतः विकास आणि उपयोग हा तर्कशुद्ध विचाराने होत असतो. त्याचीच परिणीती म्हणून भौतिक विकास शक्य झालेला आहे. आत्तापर्यंत झालेला मानवी विकास आणि प्रगती ही विज्ञानाचीच देण आहे. मोबाईल्स, संगणक, तंत्रज्ञान, भौतिक सुविधा, दळणवळणाची साधने असे सर्वकाही विज्ञानामुळे मानवजातीला प्राप्त झाले आहे.

विज्ञान हा विषय फक्त शाळेपुरता मर्यादित न ठेवता मी स्वतः टीव्ही आणि मोबाईलवर देखील विज्ञान हा विषय समजून घेतो आणि कळत नसलेल्या आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांची माहिती घेत असतो. विज्ञान समजून घेताना आत्तापर्यंत मी पाठ्यपुस्तक जास्त अभ्यासलेले आहे. परंतु इथून पुढे मी ग्रंथालयातील विज्ञाननिष्ठ पुस्तकेसुद्धा वाचायला सुरुवात करणार आहे.

मला भविष्यात संशोधन क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. आपण जसे राहतो, जगतो, क्रिया करतो, आणि निसर्गात जे जे घडते त्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय कारण असते. ते कारण शोधले की त्याला विज्ञानातला शोध समजला जातो. असे निरनिराळे शोध घेण्याची माझी खूपच इच्छा असल्याने विज्ञान हाच माझा आवडता विषय आहे.

तुम्हाला माझा आवडता विषय – विज्ञान हा मराठी निबंध (Majha Avadta Vishay Vidnyan Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment