प्रस्तुत लेख हा माझी पावसाळ्यातील सहल (Majhi Pavsalyatil Sahal Nibandh Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात पावसाळ्यात सहलीसाठी विविध ठिकाणी फिरायला गेल्यावर आलेल्या अनुभवांचे वर्णन करण्यात आलेले आहे.
माझी पावसाळ्यातील सहल निबंध मराठी | Monsoon Trip Essay In Marathi |
आम्ही कुटुंबीय प्रत्येक वर्षी पावसाळ्यात फिरायला जात असतो. सर्वजण मिळून पावसात भिजत असतो, नाचत असतो, गात असतो. पावसाचा मनमुराद आनंद लुटत सहलीचा दिवस साजरा करत असतो. यावर्षी आम्ही आमच्या गावाशेजारी असणाऱ्या घाटातील एका नैसर्गिक ठिकाणी प्रवास करत जाण्याचे ठरवले.
प्रवासाचा दिवस उजाडला. आम्ही सर्वजण जेवण व पाणी सोबत घेऊन तयार झालो. घाटातील मार्ग असल्याने आम्ही बूट, रेनकोट, छत्री अशा विविध वस्तू देखील घेतल्या. घरातील तरुण व्यक्ती मोटर सायकलवरून तर वयस्कर व्यक्ती आणि स्त्रिया चारचाकी गाडीतून येणार होत्या.
प्रवास सुरू होताच खूप मज्जा येऊ लागली. मी माझ्या मोठ्या भावाच्या मोटर सायकलवर बसलो होतो. पाऊसाची रिमझिम चालूच होती. आम्ही दोघेही फिल्मी संगीत गुणगुणत सहलीच्या ठिकाणी पोहचलो. आमच्या मागून आणखी काही भावंडे आणि चारचाकी गाडी देखील येऊन पोहचली.
आम्ही आमच्या गाड्या व्यवस्थित लॉक करून पायी प्रवास सुरू केला. घाटातच एका छोट्या टेकडीवर असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरात जाण्याचे आम्ही सर्वप्रथम ठरवले. तेथे जाताना निसर्ग सौंदर्याचा साक्षात्कारच आम्हाला घडत होता. आम्ही तेथे सेल्फी व कॅमेरा फोटोज् काढले तसेच व्हिडिओज देखील बनवले.
भगवान शंकराचे दर्शन घेतल्यावर तेथेच आम्ही जेवणासाठी बसलो. मस्तपैकी जेवण करून झाल्यावर आम्ही टेकडीवरून खाली उतरलो. खाली उतरल्यावर घाटातून प्रवास सुरू केला. अर्धा किलोमीटर चालल्यानंतर लगेच डोंगरातून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी आम्ही थांबलो. आम्ही सर्वजण त्या धबधब्याखाली नाचत बागडत चिंब न्हाऊन निघालो.
पुढे गेल्यावर घाटातच एका दरीचे अप्रतिम दृश्य होते. ते एक प्रसिद्ध असे नैसर्गिक ठिकाण होते. तेथील स्थायिक लोकांनी त्या ठिकाणी अनेक दुकाने थाटली होती. तेथे आम्ही गरमा गरम चहा घेतला आणि भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगांचा आस्वाद घेतला. तेथे आम्ही भिजलेल्या अवतारातच एक कौटुंबिक फोटोही काढला.
आता दुपारचे तीन वाजले होते. सकाळी नऊ वाजता निघालेले आम्ही सहा तास कसे व्यतित केले हे आम्हालाच समजले नाही. आम्ही आता परत माघारी यायला लागलो. घाटातील रस्ता उताराचा असल्याने पटपट चालत आणि पळतच आम्ही आमच्या गाड्यांपाशी आलो. गारठलेल्या अवस्थेत असल्याने सर्वजण तेथून निघण्याची घाई करत होते.
परतीच्या प्रवासात देखील माझा उत्साह काही कमी झाला नव्हता. गाणी गुणगुणत आणि मज्जा करतच आम्ही घरी पोहचलो. सर्वांच्या मोबाईलमधून आणि कॅमेरामधून काढलेले फोटो कधी माझ्याजवळ येतायेत याचीच उत्सुकता मला लागून राहिली होती. अशी ही पावसाळ्यातील सहल म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता.
तुम्हाला माझी पावसाळ्यातील सहल हा मराठी निबंध (Majhi Pavsalyatil Sahal Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Good essay