बहुतांश लोकांना पावसाळा हा ऋतू आवडतो. लहानणापासून पाऊस सुरू झाल्यावर एक वेगळाच आनंद शरीरात संचारतो. मातीचा सुगंध, सर्व निसर्गाचा टवटवीतपणा, शेतीची लगबग अशी सर्व धांधल एका वेळेसच सुरू होते. पाऊसाचे महत्व आणि पाऊस पडण्याची प्रक्रिया आणि त्याचा काळ अशी सर्व माहिती विद्यार्थ्यांना माहित असणे आवश्यक आहे.
पाऊस या विषयावर विद्यार्थ्यांना निबंध लिहायला लावणे हा प्रत्येक शाळेचा उपक्रम असतोच. या निबंधासाठी मुद्देसूद वाक्यरचना आणि पाऊसाचे सुंदर वर्णन अपेक्षित असते. चला तर मग पाहूया कसा लिहाल, माझा आवडता ऋतू – पावसाळा (My Favourite Season – Monsoon Essay In Marathi) हा निबंध!
माझा आवडता ऋतू – पावसाळा निबंध मराठी (100 शब्द) | Majha Avadta Rutu – Pavsala Nibandh
साधारणतः भारतात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे तीन मुख्य ऋतू आहेत. त्यापैकी पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर या महिन्यांत असतो.
पावसाळयात मुख्यतः शेती केली जाते. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकरी पावसाळयात अन्नधान्य उत्पादित करतात. मुलांची शाळा देखील पावसाळयात सुरू होत असते.
पावसाळा म्हटले की छत्री, रेनकोट इत्यादी वस्तू हमखास खरेदी केल्या जातात. पावसाळ्यात दरवळणारा जमिनीचा सुगंध, शेतीतील कामे, शाळेतील मज्जा तसेच चिखलात केली जाणारी घसरगुंडी अशा बाबी मला खूप आवडतात.
मला पावसाळयात निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जायला खूप आवडते. मला पावसात भिजायला देखील खूप आवडते. पावसाळा ऋतूमध्ये सर्वत्र थंडी जाणवते आणि निसर्गात हिरवाई पसरलेली असते.
Majha Avadata Rutu – Pavsala Nibandh | माझा आवडता ऋतू – पावसाळा मराठी निबंध (350+ शब्द)
पाऊसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी अपुरेच पडेल. निसर्ग आपल्या पूर्ण सौंदर्यात फक्त पाऊसातच असेल असे कधी कधी वाटते. कवीकल्पना तर अनेक प्रकारे पाऊसाला स्वतःमध्ये साठवत असते. पाऊसाचे पाणी, त्याचा रिमझिम आवाज, मातीचा दरवळत राहणारा सुगंध, संपूर्ण वनराई आणि शेती हिरवाईने सुशोभित होत असते.
पाऊस सुरू होण्याअगोदर अती रहस्यमय अशी चाहूल सुरू होते. पक्षी, प्राणी, झाडे सर्वजण सजग होतात. मेघांची गर्जना ही जणू शंखनाद असतो. मग हळूहळू पाऊसाचे थेंब जमिनीवर वर्षाव करीत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात.
पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत असतो. शाळा सुरू होणे आणि पाऊसाचे आगमन हे एका वेळीच होते. शाळेचा नवीन वर्ग आणि पाऊसाची रिमझिम एका वेळीच चालू असते. त्यामुळे पावसाचा संबंध हा माझ्यासाठी सृजनात्मक असाच आहे.
आत्ता २१व्या शतकात अनेक बदल पहावयास मिळत आहेत. त्यामध्ये मुख्यतः राहणीमानात होत चाललेला बदल आहे. त्यामुळे भारत हा शेतीप्रधान देश असून देखील पावसाची तेवढी उत्सुकता आत्ता पहावयास मिळत नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र आजही पावसाळा सुरू होताच एका नवीन जीवनाची सुरुवात झाल्याप्रमाणे वाटत राहते.
निसर्गचक्र एका विशिष्ट पद्धतीत चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू सर्व स्थिती सांभाळून असतात तर पावसाळा ऋतू पृथ्वीला पाण्याचे दान देऊन जात असतो. पाण्याचे उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन हवामानाच्या बदलामुळे ढग निर्माण करतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाणी स्वरूपात पुन्हा एकदा जमिनीवर येतात. हे सर्व एका चक्राकार गतीने चालले असल्याने त्यास जलचक्र असेही संबोधतात.
थंड शीतलता आणि आल्हाददायक निसर्ग देखावा यामुळे मला पावसाळा खूप आवडतो. प्रत्येक वर्षी पहिल्या पाऊसात भिजणे हे तर माझे कर्तव्यच बनून गेले आहे. पाऊस हा ऋतू मुख्यतः आवडण्याचे कारण म्हणजे सृष्टीत सर्व काही सृजन स्वरूपात कार्यरत असते. हवा, पाणी, आणि झाडे हे तर आपले जीवन पुन्हा एकदा सुरू करत असतात. स्वतःमध्ये नवीन ऊर्जा भरत असतात.
शेतकरी खायला लागणारे अन्नधान्य या पावसाळा ऋतुत उत्पादित करत असतो. त्यामुळे वर्षभर पाळीव जनावरे आणि मनुष्य यांच्या खाण्यापिण्याची सोय पावसाळ्यात पूर्ण होत असते. कोकिळा, पोपट, आणि मोर हे पक्षी तर पावसाळ्यात कलकल माजवतात. मोराचे पावसाळ्यात नाचणे हे तर आकर्षक सौंदर्याचा एक नमुना असतो. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात होत असतात.
आज पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनांचा वारेमाप वापर हा निसर्गावर अवकृपा करत चालला आहे. वृक्षतोडसुद्धा त्यासाठी कारणीभूत आहे. झाडे आणि जंगले कमी झाल्याने अवकाळी आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यातच पावसाळा हा शहरात फक्त पाणी साचवून ठेवतो त्यामुळे शहरी लोक फक्त पावसाचा तिटकारा करतात.
आपण आपल्या जाणिवा आणि निसर्गाप्रती संवेदना वाढवल्या पाहिजेत. पाऊस आपल्याला जीवनदायी आहे. खाणे आणि पिणे या प्राथमिक गरजा काहीही न मागता निसर्ग स्वतःहून पूर्ण करीत असतो. त्यामुळे पाऊसाचे खूप उपकार मानवावर आहेत असे म्हणता येईल. अशा प्रकारे पावसाळा हा नवीन आल्हाददायक उर्जाशक्तीचा ऋतू माझा आवडता ऋतू आहे.
तुम्हाला माझा आवडता ऋतू पावसाळा हा मराठी निबंध (Monsoon Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा..