भ्रष्टाचार – एक भस्मासुर मराठी निबंध | Corruption Essay In Marathi |

भ्रष्टाचार ही समस्या आत्ता नव्याने जन्मलेली नाही. तिची पाळेमुळे खूप खोल अंतर्मनात रुजलेली आहेत. अनियंत्रित व्यवस्था आणि त्यामुळे निर्माण झालेला स्वतःचा स्वार्थ हा भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे असे म्हणता येईल. भ्रष्टाचार ही संकल्पना व्यवस्थित समजण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात भ्रष्टाचार या विषयावर निबंध लिहायला लावतात. चला तर मग पाहूया, कसा लिहायचा ‘भ्रष्टाचार’ हा निबंध!

भ्रष्टाचार मराठी निबंध ! Bhrashtachar Marathi Nibandh |

आपण सतत भ्रष्टाचार हा शब्द ऐकत आलेलो आहोत. आपल्या देशात आणि राज्यात हा भ्रष्टाचार कसा काय निर्माण झाला असेल? ही समस्या सामाजिक व्यवस्थेचे स्वरूप आहे की व्यक्तिगत कारणे देखील यासाठी जबाबदार आहेत याचा सविस्तर विचार केला गेला पाहिजे. समाजमन आणि व्यक्ती कसा काय भ्रष्टाचारापासून दूर राहू शकतो याचेदेखील सखोल चिंतन करावयाची गरज निर्माण झालेली आहे.

भ्रष्टाचार आपल्याला सतत न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रे यामधून कळून येत असतो. त्याची झळ सरळ व्यक्तिगत स्तरावर पोहचत नसल्याने भ्रष्टाचार ही समस्या आपल्याला मोठी वाटत नाही. परंतु कधीकधी स्वतःला एका व्यवस्थेत किंवा संस्थेत लाच द्यायला लागल्यावर हा भ्रष्टाचार किती भयंकर आणि मोठा असू शकतो याची जाणीव मात्र होते. ज्या सरकारी आणि सामाजिक व्यवस्था आज निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार सहज आढळून येतो.

जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या सहज उपलब्ध आहेत परंतु मानवी स्वार्थ खूपच टोकाला पोहचला आहे. जगण्याची व्यर्थ स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेला हव्यास हा कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचारास कारणीभूत आहे. भ्रष्टाचार हा नैतिक असो की आर्थिक, त्याला सामोरे सर्वांनाच जावे लागते. भ्रष्टाचार करणाऱ्यांची नैतिकता हीच भ्रष्ट झाली असल्याने वरवरचे लाचलुचपत कायदे आणि एखाद्या व्यक्तीला शिक्षा करून भ्रष्टाचार कमी होणारा नसतो.

आज एक व्यक्ती किती ठिकाणी सामाजिक व्यवस्थेत बांधला गेला आहे, ते प्रथम पाहुयात. माणसाची खाण्याची आणि राहण्याची गरज ही प्राथमिक आहे. त्यासाठी तो काम करतो आणि पैसे कमावतो. त्या पैशातून त्याला वरवरची मिळणारी स्वतंत्रता ही कायम स्वरूपाची वाटते आणि पैसा हेच जीवन आहे असे वाटू लागते. मग तो पैसा, संपत्ती प्राप्त करण्यासाठी मनुष्य कोणत्याही पातळीवर उतरण्यासाठी तयार असतो, त्यातूनच मग सुरू होतो भ्रष्टाचार!

सरकारी व्यवस्था ह्या लोकांसाठी कार्यरत असतात परंतु अशा व्यवस्था खरोखर लोकहिताचे कार्य करतात का? लोकांकडून आणि सरकारी तिजोरीमधून पैसे बळकावण्याचा अशा व्यवस्था प्रयत्न करत असतात. या सर्व व्यवस्था कायदे आणि नियमांतर्गत कार्यशील असल्याने लोकांना त्यांवर विश्वास असतो. व्यवस्थेसाठी किती आर्थिक पुरवठ्याची गरज आहे हेदेखील माहीत नसल्याने लोक फक्त व्यवस्थेत पैसे देत जातात.

क्षुल्लक सुविधा ह्या सुरुवातीला पुरवल्या जातात परंतु नंतर फक्त पैसे उकळले जातात. यावेळी लोकांना माहीत नसते की अल्पशा फायद्यासाठी किती तरी मोठी रक्कम गमवावी लागत आहे. ती व्यवस्था, यंत्रणा अशा भ्रष्ट नीतीद्वारे भरघोस संपत्ती कमावत असते. मग अशा व्यवस्थेला झालेला फायदा हाच भ्रष्टाचार म्हणून लोकांच्या नजरेसमोर येतो. सरकारी व्यवस्था जशा दळणवळण, बँक, शिक्षण, औद्योगिक कारखाने, या सर्व यंत्रणा लोकांसाठीच आहेत परंतु काहीवेळा यामध्ये गफलत केली जाते आणि भ्रष्टाचार सुरू होतो.

आता खाजगी क्षेत्र झपाट्याने वाढत आहेत. सरकारी यंत्रणांवर विश्वास कमी होऊ लागला आहे. खाजगी क्षेत्रात सर्व काही विश्लेषण असल्याने लोक भरवसा ठेवतात. परंतु सरकारी यंत्रणा अशा खाजगी संस्थेवर कायदे आणि नियम लागू करून झालेला घोटाळा उघडकीस आणतात. खाजगी संस्था मग सरकारला नफ्याचा काही हिस्सा देतात. अशा प्रकारे मग खाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रे मिळून लोकांची पिळवणूक करतात.

कोणतीही व्यवस्था किंवा यंत्रणा जी लोकांच्या फायद्याची असेल त्या यंत्रणेचे उद्दिष्ट उदात्त असले पाहिजे. मानवी विकास आणि प्रगती फक्त आर्थिक दृष्ट्या न करता नैतिकता देखील वाढीस लागली पाहिजे. तेव्हाच भ्रष्टाचार कमी होऊ शकेल नाहीतर भविष्यात आपण फक्त एक ना अनेक यंत्रणांचे बळी पडू आणि आपल्याला त्याविरुद्ध आवाजही उठवता येणार नाही. भ्रष्टाचार झाल्याने माणसाचा पैसा वाया जातो एवढेच नाही तर त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि अनमोल वेळ वाया जातो.

हा निबंध शालेय तसेच कॉलेजवयीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा आहे तरी तुम्हाला भ्रष्टाचार निबंध ( Corruption Essay In Marathi ) आवडला असल्यास नक्की कमेंट करा.

Leave a Comment