प्रस्तुत लेख हा मी खेळलेली रंगपंचमी (Mi Khelaleli RangPanchami Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. रंगपंचमी खेळताना येणारी मज्जा व घडलेले वास्तविक प्रसंग या निबंधात लिहणे अपेक्षित आहे.
मी खेळलेली रंगपंचमी – मराठी निबंध • Mi Khelaleli RangPanchami Nibandh Marathi •
रंगपंचमी हा रंगांचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यावर्षी देखील आम्ही रंगपंचमी अगदी मनमुराद खेळलो. रंगपंचमी यायच्या अगोदर आठवडाभर तरी माझ्या मनात रंगपंचमीच्या प्रंसगांचे चित्र रेंगाळत होते.
यावर्षी रंगपंचमी रविवारी असल्याने शाळेला साहजिकच सुट्टी होती. दिवस सुरू होताच माझ्या भावाने मला नकळत अंथरुणातच रंग लावायला सुरुवात केली. मी खाडकन जागा झालो आणि पळतच बाहेर गेलो. मी ही त्याला कसा रंग लावायचा हा विचार करू लागलो.
काही वेळाने अंघोळ करून झाल्यावर मी जुनी कपडे परिधान केली. आज फक्त रंगच रंग, या कल्पनेने मी नुसता भारावून गेलो होतो. दुकानात पळतच जाऊन मी सर्व प्रकारचे रंग विकत घेऊन आलो आणि सर्वप्रथम मी माझ्या भावाला रंगवले.
आमच्या शेजारील गल्लीत मुले गाणी वाजवून आणि पाणी उडवून रंगपंचमी खेळत होते. मी आणि माझे मित्र त्यामध्ये सामील होऊन उड्या मारतच रंगपंचमी खेळलो. तेथे खेळताना नाच, पडापडी, धक्काबुक्की अशी सर्व प्रकारची मस्ती आम्ही केली.
मी दुपारी घरी जेवायला आलो आणि त्यानंतर माझी झोपच लागली. झोपून उठलो आणि बघतो तर काय, घड्याळात चार वाजले होते. आता ऊन जास्त नसल्याने मला रंग खेळण्यासाठी पुन्हा एकदा परवानगी मिळणारच होती.
मी आता आमच्या वर्गातील मुलांच्या घरी जाऊन त्यांना रंग लावण्याचे ठरवले. मी सर्वांना नकळत रंग लावण्यात यशस्वी ठरलो देखील, पण त्यांना रंग लावून झाल्यावर मला लवकर निसटता आले नाही आणि मी सापडलो. मला केतनने पकडले आणि सर्वांनी मिळून जवळजवळ मला रंग चारलाच!
माघारी आल्यावर मला घरी खूप बोल खावा लागला. पहिल्या अंघोळीत माझा रंग तर निघालाच नाही शिवाय दुसऱ्या दिवशी अंघोळ करून देखील माझा चेहरा हा रंगीबेरंगीच दिसत होता. यावर्षीची रंगपंचमी ही माझ्या चांगलीच लक्षात राहण्यासारखी होती.
रंगपंचमी खेळताना मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन हे कधीच होऊ शकत नाही. आपला स्व बाजूला ठेऊन आपण एकमेकांच्या रंगांत रंगून जात असतो. आपण इतरांना रंग लावतोच पण आपल्यालाही कोणीतरी रंग लावावा असे मनोमन वाटत असते. अशा एक अनेक कारणांनी रंगपंचमी मला खूप आवडते.
तुम्हाला मी खेळलेली रंगपंचमी हा मराठी निबंध (Mi Khelaleli RangPanchami Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…