प्रस्तुत लेख हा माझी शाळा (Majhi Shala Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात स्वतःच्या शाळेचे संपूर्ण वर्णन करायचे असते ज्यामध्ये शाळेची वास्तू, शैक्षणिक मुद्दे, शिक्षक वर्ग आणि शालेय उपक्रम अशा बाबींचा समावेश असायला हवा.
प्रत्येक जण शाळेत गेलेला असतोच. शाळेतील गोड आणि कटू आठवणी प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येकाला शाळा हवीहवीशी वाटत असते. कोणत्याही वयोगटातील मनुष्य शाळेतील अनुभव सांगताना अत्यंत खुलून येत असतो.
प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांना माझी शाळा हा निबंध नक्कीच फायदेशीर ठरेल. या संपूर्ण लेखात आवश्यकतेनुसार माझी शाळा या निबंधाचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांची इयत्ता आणि निबंधाच्या शब्दांची संख्या विचारात घेण्यात आलेली आहे.
Table of Contents
माझी शाळा – मराठी निबंध – इयत्ता पहिली (१०० शब्द) | My School Essay In Marathi (100 Words)
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुंदरनगर असे आहे. माझ्या शाळेत एक मोठे मैदान, ग्रंथालय आणि बागसुद्धा आहे. मला शाळेत जायला खूप आवडते. आमचे वर्गशिक्षक मोरे सर आम्हाला मराठी भाषेचे लिखाण व वाचन शिकवतात.
शाळेत गेल्यावर सुरुवातीला सर्वांना प्रार्थना म्हणावी लागते आणि साफसफाई करावी लागते. शाळेची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते. तीन वाजल्यानंतर आम्ही मैदानात खेळ खेळतो आणि मग घरी येतो.
शाळेत सुंदर – सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत. प्राणी – पक्षी, मुले, कार्टून्स, निसर्गचित्रे अशी विविध चित्रे पाहून मला खूप आनंद होतो. शाळेत आम्हाला नवनवीन कविता शिकवल्या जातात. आठवड्यातून एकदा संगणक वापरायला देखील शिकवतात.
मला माझी शाळा खूपच आवडते आणि शाळेत असताना मला घरची आठवणच येत नाही.
माझी शाळा – मराठी निबंध – इयत्ता दुसरी (१२० शब्द) | My School Essay In Marathi (120 Words)
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गंगापूर असे आहे. माझ्या शाळेची वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन अशी आहे. मी इयत्ता दुसरीत शिकतो. मला नियमित शाळेत जायला आवडते. शाळेत माझे अनेक वर्गमित्र आहेत.
माझ्या शाळेला मैदान, ग्रंथालय, बाग आणि छोटी प्रयोगशाळा आहे. शाळेत पहिली ते सातवी असे वर्ग आहेत. शाळेत एकूण सात शिक्षक आणि एक प्राचार्य असा आठ जणांचा शिक्षकवर्ग आहे. माझ्या शाळेतील शिक्षक अत्यंत छान शिकवतात.
शाळेतील पवार सर हे माझे आवडते शिक्षक आहेत. ते आम्हाला गणित आणि चित्रकला हे विषय शिकवतात. शाळेत नियमित खेळ घेतले जातात. आम्ही सर्व वर्गमित्र मिळून खेळ खेळतो.
आमच्या शाळेत संगणक प्रशिक्षण देखील दिले जाते. शाळेत भाषण, रांगोळी आणि निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. शाळेतील शैक्षणिक वातावरण, माझे वर्ग मित्र आणि शिक्षक यांमुळे माझी शाळा मला खूप आवडते.
माझी शाळा – मराठी निबंध – इयत्ता तिसरी (१४० शब्द) | My School Essay In Marathi (140 Words)
माझ्या शाळेचे नाव नूतन विद्यालय असे आहे. कांकणगाव या ठिकाणी माझी शाळा आहे. शाळेला अत्यंत सुसज्ज अशी इमारत आहे. मी सध्या इयत्ता तिसरीत शिकत आहे. आमच्या शाळेत इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते.
शाळेतील शैक्षणिक वातावरण मला खूप आवडते. आमच्या शाळेत एकूण पंचवीस वर्गखोल्या, ग्रंथालय, प्राचार्य कक्ष, प्रयोगशाळा व सांस्कृतिक भवन अशा विविध वास्तू आहेत. शाळेला संगणक कक्ष देखील आहे. तेथे आम्हाला संगणकीय शिक्षण दिले जाते.
शाळेत एकूण वीस शिक्षक आहेत. त्यापैकी तीन शिक्षक आम्हाला शिकवतात. आमच्या वर्गशिक्षकांचे नाव एल. एम. जाधव सर असे आहे. ते आम्हाला मराठी हा विषय शिकवतात. मला शाळेत गेल्यावर चित्रकला हा विषय शिकायला खूप आवडतो.
आमच्या शाळेत दुपारी खेळाचा तास असतो. तेव्हा मला मैदानावर वेगवेगळे खेळ खेळायला आणि धावायला खूप आवडते. खेळताना आम्ही सर्वजण खूप मस्ती करतो. दुपारच्या सुट्टीत आम्ही वर्गातील सर्व मित्र मिळून एकत्र जेवण करतो.
शाळेत गेल्यावर मला घरची थोडी सुद्धा आठवण येत नाही. शाळेतून आल्यावर मी शाळेतील मजेशीर प्रसंग आई – बाबांना सांगत असतो. मला माझी शाळा खूप आवडते.
माझी शाळा – मराठी निबंध – इयत्ता चौथी (१५० शब्द) | My School Essay In Marathi (150 Words)
माझी शाळा मला खूप आवडते. माझ्या शाळेचे नाव संत गाडगेबाबा विद्यालय आहे. माझी शाळा दररोज सकाळी अकरा वाजता भरते आणि सायंकाळी पाच वाचता सुटते.
माझ्या शाळेत इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. शाळेत एकूण २० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. शाळेत वर्गखोल्या, प्राचार्य कक्ष, शिक्षक कक्ष, प्रयोगशाळा, संगणक खोली, ग्रंथालय, सांस्कृतिक भवन अशा विविध वास्तू आहेत.
शाळेत डिजिटल शिक्षण देखील उपलब्ध आहे. डिजिटल शिक्षण घेताना आम्हाला खूप मज्जा येते. तसेच शाळेला एक मोठे मैदान आहे जेथे आम्हाला विविध खेळ शिकवले जातात.
आमचे वर्गशिक्षक श्री. पाटील सर आम्हाला मराठी व गणित हे विषय खूप आवडीने शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्याला ते अतिशय उत्तमरित्या समजून घेऊन शिकवत असल्याने आमचे ते आवडते शिक्षक आहेत.
प्रत्येक वर्षी शाळेत सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सण – समारंभ किंवा दिनविशेष असल्यास निबंध, वक्तृत्व आणि रांगोळी स्पर्धा ठेवली जाते.
शाळेत प्रार्थना, साफसफाई, वृक्ष लागवड असे मानवी मूल्ये वाढवणारे उपक्रम घेतले जातात. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळत असल्याने मला माझी शाळा खूपच प्रिय आहे.
माझी शाळा – मराठी निबंध – इयत्ता पाचवी (१८० शब्द) | My School Essay In Marathi (180 Words)
शिक्षण म्हटले की शाळा आलीच! शाळेतील अनुभव प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात कारण शाळेतील सर्व प्रसंग आणि शिक्षण हे विद्यार्थ्यांना घडवत असतात. त्यामुळे माझीही शाळा मला खूप आवडते.
माझ्या शाळेचे नाव आदर्श शैक्षणिक संकुल असे आहे. शाळेत माझे मन खूप रमते. शालेय वातावरण हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संस्कारक्षम असे आहे. आमच्या शाळेत एकूण दहावीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे.
आमच्या शाळेत उच्चशिक्षित शिक्षक आहेत. कला, क्रीडा व विषयानुरूप वेगवेगळे शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. आमच्या वर्ग शिक्षकांचे नाव डी. एस. गायकवाड सर असे आहे. ते आम्हाला गणित हा विषय शिकवतात.
मी सध्या इयत्ता पाचवीत शिकत आहे. मी या शाळेत पहिलीपासून शिकत आहे. सुरुवातीला मला शाळा नकोशी वाटायची परंतु आता मात्र तसे नाही. शाळेत विविध कला – क्रीडा उपक्रम व उत्तम शिक्षण उपलब्ध असल्याने मला शाळेत दररोज जावेसे वाटते.
आमच्या शाळेत एक ग्रंथालय, एक प्रयोगशाळा व एक मोठे मैदान आहे. शाळेच्या आसपास एक सुंदर अशी बाग आहे. शाळेत या वर्षी संगणक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तेथे आम्हाला संगणकीय शिक्षण दिले जाते.
शाळेत प्रत्येक वर्षी क्रीडा व सांस्कृतिक कला स्पर्धा आयोजित केल्या जातात. सामाजिक जाणीव जागृत होण्यासाठी आमच्या शाळेत सामाजिक समस्यांवर आधारित असे उपक्रम आणि नाट्य सादर केले जाते.
आमच्या शाळेला गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी आमच्या शाळेची वेळ आहे. शाळेत अत्यंत प्रसन्न वाटत असल्याने मला माझी शाळा खूप आवडते.
माझी शाळा निबंध – इयत्ता सहावी (२०० शब्द) | Majhi Shala Nibandh (200 Shabd)
माझी शाळा अनंतपुर गावात मध्यभागी वसलेली आहे. माझ्या शाळेचे नाव नूतन विद्यालय असे आहे. शाळेची टुमदार इमारत, सदाहरित बाग आणि सुसज्ज मैदान अशी शाळेची रचना आहे.
शाळेत एकूण दहा इयत्ता आहेत आणि पंचवीस वर्ग आहेत ज्यामध्ये प्राध्यापक वर्गकक्ष, प्राचार्य कक्ष, प्रयोगशाळा, सांस्कृतिक भवन आणि विद्यार्थी वर्ग समाविष्ट आहे. शाळेला चाळीस शिक्षकांची मान्यता आहे तरी जवळजवळ पस्तीस एवढा शिक्षक वर्ग आत्ता आमच्या शाळेत आहे.
शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत तुकड्या नाहीत. एका इयत्तेला एक-एक वर्ग आहे. पाचवी ते सातवी पर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या आहेत आणि आठवी ते दहावी पर्यंत प्रत्येकी तीन तुकड्या आहेत. आठवीपासून पुढील शिक्षणासाठी बाहेरील छोट्या गावांतील विद्यार्थी देखील शाळेत येतात.
इयत्ता पहिलीत माझं या शाळेत शिक्षण सुरू झालं. अनेक दिवस तर मी या नवीन शाळेत घाबरत होतो. पण हळूहळू माझे नवीन मित्र होत गेले. त्यांच्याबरोबर शाळेत मस्तीही करू लागलो. थोड्या दिवसानंतर मला माझी शाळा खूपच आवडू लागली. शाळेच्या मैदानात खेळणे तर मला खूप आवडते.
आमच्या शाळेची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी आहे. दिवसभर अभ्यास करण्याची आणि नवनवीन शिकण्याची प्रेरणा आम्हाला शाळेतील शिक्षकांकडून मिळते. आमच्या शाळेतील श्री. के. टी. जाधव सर खूप आवडतात. ते आम्हाला मराठी विषय अतिशय उत्तम शिकवतात.
शाळेतील उपक्रम मला खूप आवडतात. प्रत्येक मुलाच्या आवडीनुसार कला, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रम शाळेत राबवले जातात. वर्षातून एकदा विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा आणि तीन ते चार वेळा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते. माझी शाळा ही सर्वांगीण विकास आणि कौशल्य वाढवणारी शाळा आहे. माझ्या शाळेचा मला खूप अभिमान आहे.
माझी शाळा निबंध – इयत्ता सातवी (२२० शब्द) | Majhi Shala Nibandh (220 Words)
माझी शाळा मला खूप आवडते. माझ्या शाळेचे नाव जि. प. प्राथमिक शाळा, भरतपूर असे आहे. शाळेची वास्तू ही अत्यंत सुशोभित, स्वच्छ व शालेय उपक्रमातील चित्रांनी रंगवलेली आहे. आमच्या शाळेच्या आवारात सदाहरित झाडे, खेळण्यासाठी व परिपाठासाठी मैदान तसेच एक प्रवेशद्वार आहे.
मी सध्या इयत्ता सातवीत शिकत असून इयत्ता पाचवीपासून या शाळेत आहे. सुरुवातीला मला येथील शैक्षणिक वातावरण व शिक्षक आवडले नव्हते परंतु आता तसे काही वाटत नाही. सध्या मला आमचे गणिताचे शिक्षक बी. आर. जाधव सर खूप आवडतात.
आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण मिळते. शाळेत चार शिक्षिका, चार शिक्षक व एक प्राचार्य असा एकूण नऊ जणांचा शिक्षकवृंद आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे काम सर्व शिक्षक करत असतात.
शाळेत विविध उपक्रम देखील राबवले जातात. निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आणि सांस्कृतिक नृत्य, गायन व अभिनय अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याशिवाय वर्षातून दोनदा आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत देखील आमची शाळा सहभागी होत असते.
शाळेत आम्हाला पुस्तके मुफ्त मिळतात. त्या पुस्तकांची ठेवण प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळी आहे. वर्गात बसण्यासाठी बाकडी आहेत तर प्रत्येक वर्ग हा शैक्षणिक तक्त्यांनी भरून गेलेला आहे. शाळेत स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरे केले जातात.
आमच्या शाळेची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी आहे. शाळेसाठी एक सामाईक गणवेश आहे. शाळेत अत्यंत शिस्तीचे शैक्षणिक वातावरण असते. प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत खूप छान प्रकारे रमतो. त्यामुळे शाळेतील प्रत्येकालाच आमची शाळा ही खूपच प्रिय आहे.
माझी शाळा मराठी निबंध – इयत्ता आठवी (२५० शब्द) | Majhi Shala Nibandh (250 Words)
स्वामी विवेकानंद विद्यालय ही माझी शाळा सुंदरनगर गावात मध्यभागी वसलेली आहे. आमच्या शाळेला पन्नास वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे. शाळेने आत्तापर्यंत उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे मला माझी शाळा खूप प्रिय आहे.
शाळेची वेळ ही सकाळी अकरा ते सायंकाळी पाच अशी आहे. शाळेला आठवड्यातून एकदा रविवारी सुट्टी असते तसेच वर्षातून दिवाळी सणाला आणि उन्हाळी मे महिन्यात अशा दोन मोठ्या सुट्ट्या असतात. त्याव्यतिरिक्त वर्षातून दोनदा सहामाही परीक्षा व चार चाचणी परीक्षा असतात.
शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मिळते. शाळेला अत्यंत अनुभवी असे शिक्षक लाभलेले आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. शाळेतील कला विषयाचे श्री. निकम सर हे माझे आवडते शिक्षक आहेत.
शाळेतील प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडी आहेत. शैक्षणिक व उपयोगी माहितीचे तक्ते संपूर्ण वर्गात लागलेले आहेत. मी सध्या इयत्ता आठवीत शिकत आहे. इयत्ता पहिलीपासून मी या शाळेत असल्याने मला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ओळखीचे झालेले आहेत.
आमच्या शाळेत विविध सांस्कृतिक व कला – क्रीडा महोत्सव देखील आयोजित केले जातात. शाळेला सध्या संगणक उपलब्ध झाले असल्याने संगणकीय व ऑनलाईन शिक्षण शाळेत दिले जाते. त्याशिवाय शाळेला ग्रंथालयाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
शाळेच्या परिसरात एक छोटी आणि सुंदर अशी बाग आहे. त्याशेजारीच एक खेळाचे मैदानसुद्धा आहे जेथे आम्ही विविध प्रकारचे खेळ खेळतो. शाळेच्या आवारात एकदम प्रसन्न असा अनुभव येत असल्याने आम्ही शाळेत फिरण्याची देखील मज्जा घेत असतो.
आमच्या शाळेत नृत्य, अभिनय, लेखन व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच पर्यावरण दिन, शिक्षक दिन, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. शाळेत अत्यंत शिस्तीचे शैक्षणिक वातावरण असल्याने माझ्या शाळेचा मला खूप अभिमान वाटतो.
माझी शाळा मराठी निबंध – इयत्ता नववी (३०० शब्द) | Majhi Shala Nibandh (300 Shabd)
आपण लहानपणापासून शाळेत जात असल्याने ते ठिकाण हळूहळू आपल्याला आवडू लागते. त्याप्रमाणेच मलाही माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय असून गुणवत्ता श्रेणीत माझी शाळा नेहमी अव्वल असते. मी सध्या आठवीत शिकत असून इयत्ता पहिलीपासून मी याच शाळेत शिकत आहे.
माझ्या शाळेला भव्य अशी इमारत आहे. ती इमारत अत्यंत कलापूर्ण पद्धतीने रंगवलेली आणि सजवलेली आहे. शाळेला एकूण तीस वर्गखोल्या, एक प्रयोगशाळा, प्राचार्य कक्ष, सांस्कृतिक भवन आणि सुसज्ज असे ग्रंथालय आहे. शाळेच्या मध्यभागी खेळाचे मैदान आहे. तेथेच आमची दररोज प्रार्थना घेतली जाते.
शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण प्रदान करतात. शाळेत एकूण अठरा शिक्षक, प्राचार्य, उपप्राचार्य, ग्रंथपाल व इतर कर्मचारी असा मिळून एकूण तीस लोकांचा समूह कार्यरत आहे. शाळेतील मराठी विषयाचे श्री. पाटील के. एम. सर मला खूप आवडतात. तसेच ग्रंथपाल श्री. मोरे सरांशी देखील माझी चांगलीच ओळख आहे.
शाळेत डिजिटल आणि प्रत्यक्ष असे दोन्ही प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. दोन्ही प्रकारच्या शिक्षणाने विद्यार्थी दिवसभर उदास राहत नाहीत. शिवाय शाळेत उपक्रमशील शिक्षण पद्धती असल्याने विद्यार्थांना प्रायोगिक तत्त्वावर जास्त शिकवले जाते. पुस्तकी शिक्षणाचे एकूण सहा विषय हे घड्याळी साडे चार तासांत शिकवले जातात.
शिक्षणाव्यतिरिक्त विविध कला – क्रीडा स्पर्धा, कला व विज्ञान प्रदर्शने, सांस्कृतिक दिन व प्रार्थना असे कलागुण वाढवणारे उपक्रम देखील शाळेत घेतले जातात. त्यामार्फत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थी हे अत्यंत उत्साहात सर्व उपक्रमांत सामील होत असतात.
शाळेत काही सुविधा देखील पुरवलेल्या आहेत. त्यामध्ये नियतकालिके, वर्तमानपत्रे व नवनवीन पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध करून देणे ही सुविधा मला खूपच आवडते. त्यासाठी मी एक तास अगोदरच शाळेत जाणे पसंद करतो. परगावच्या मुलांसाठी किंवा आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकदम अल्पदरात छोटेसे वसतिगृह उपलब्ध आहे.
प्रत्येक वर्षी शाळेत कला महोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे कलागुण वाढवणारे उपक्रम व प्रयोग सादर करत असतात. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गाच्या आणि शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी समजावून दिली असल्याने शाळा नेहमीच स्वच्छ आणि सुंदर असते.
माझी शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नियमित प्रयत्नशील असते. शाळेला स्थापन झाल्यापासून एकूण पंचवीस वर्षे झालेली आहेत. या पंचवीस वर्षांत शाळेने अत्यंत उत्तम पद्धतीने शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपलेला आहे. शाळेतील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी हे नेहमीच शाळेबद्दल अभिमान बाळगून असतात.
माझी शाळा मराठी निबंध – इयत्ता दहावी
(३५० शब्द) | Majhi Shala Nibandh (350 Words)
शाळा ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अनुभवाची उत्तम भूमिका तयार करत असते. त्यामुळे विद्यार्थी हा शाळेचा नेहमी ऋणी असतो. त्याप्रमाणेच मीही माझ्या शाळेचा ऋणी आहे. माझी शाळा देखील उत्तम गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा जपणारी शाळा आहे. माझ्या शाळेचे नाव अभिनव शैक्षणिक विद्यालय असे आहे.
आमच्या शाळेला एक भव्य अशी इमारत आहे. इयत्ता दहावीपर्यंत विद्यालयीन आणि बारावीपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण शाळेत उपलब्ध आहे. शाळेत एकूण तीस वर्गखोल्या, शिक्षक कक्ष, प्राचार्य कक्ष, प्रयोगशाळा, संगणक कक्ष अशा वेगवेगळ्या वास्तू समाविष्ट आहेत.
आमच्या शाळेला विशिष्ट प्रकारचा सामाईक गणवेश आहे. दररोज गणवेश परिधान करून येणे हा शाळेतील नियम आहे. शाळेची वेळ सकाळी अकरा ते सायंकाळी पाच अशी असते. शाळा सुरू झाल्याबरोबर सर्व इयत्तेचे वर्ग शाळेच्या आवारात जमून प्रार्थना म्हणतात. प्रार्थना झाल्यानंतर सर्व तासिका सुरू होतात.
मी इयत्ता दहावीत शिकत आहे. दहावीसाठी विशेष वर्ग शाळेत आयोजित केले जातात. शाळेतील शिक्षक उत्तमरित्या आम्हाला दहावीचे मार्गदर्शन करतात. दहावीनंतर भविष्यात असणाऱ्या संधी आणि विविध कारकीर्दीची क्षेत्रे समजावून सांगतात.
शाळेत विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी हे कला व क्रीडा क्षेत्रातील आपापल्या कलागुणांनुसार सहभागी होत असतात. अशा स्पर्धांमुळे त्यांना भावी आयुष्यातील कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा मिळत जाते. शाळेतून आजपर्यंत अनेक कलाकार आणि क्रीडापटू घडलेले आहेत.
शाळेत संगणक आणि विज्ञान हे दोन विषय अत्यंत योग्यरित्या हाताळले जातात. संगणक शिक्षणासाठी आठवड्यातून दोनदा तासिका भरवल्या जातात आणि विज्ञान विषयासाठी प्रत्येक वर्गाचे आठवड्यातून एकदा विविध प्रयोग घेतले जातात. तसेच वर्षातून एकदा विज्ञान प्रदर्शन भरवले जाते ज्यातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो.
शाळेत ग्रंथालय व व्यायामशाळा या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगळे ओळखपत्र दिलेले आहे. शाळेत एक मोठे खेळाचे मैदान आहे जेथे कबड्डी, खोखो, धावणे व फुटबॉल हे खेळ खेळले जातात. शाळेतर्फे मी वैयक्तिक कबड्डी या खेळात सहभागी होत असतो.
शाळेत विविध योजना व संकल्पना राबवल्या जातात. आम्हाला वृक्ष लागवड करावी लागते. शाळेची बाग आणि प्रयोगशाळा व्यवस्थित स्वच्छ ठेवावी लागते. शाळेचे मैदान व शाळेची वास्तू यांची विशेष काळजी घ्यावी लागते. इतर शालेय उपक्रम व शैक्षणिक मुद्द्यांव्यतिरिक्त शाळेत सामाजिक समस्यांचे देखील आकलन करून दिले जाते.
शाळेतील विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू कसे काय घडू शकेल याकडे विशेष लक्ष दिले जाते. शाळेत किंबहुना त्यासाठी विविध भाषणे व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आयोजित केली जातात. एकंदरीतच माझी शाळा ही मला आणि शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला संस्कारित करण्यात यशस्वी ठरत आहे.
माझी शाळा मराठी निबंध – (५०० शब्द) | Majhi Shala Nibandh Marathi
प्रत्येक व्यक्ती हा लहानपणी शाळेतूनच संस्कारित होत असतो. शाळेतील शिक्षणपद्धती ही व्यक्तीला एक सुजाण नागरिक म्हणून घडवत असते. त्यामुळे शाळा ही व्यक्तिच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे योगदान देत असते. माझ्याही शाळेचे आमच्या कर्णपूर गावी शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठे योगदान आहे.
माझ्या शाळेचे नाव समर्थ शैक्षणिक संकुल, कर्णपूर असे आहे. शाळेत इयत्ता पहिलीपासून इयत्ता दहावीपर्यंत उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते. शाळेची स्थापना १९७५ साली झाली होती. तेव्हापासून शाळेने आपली शैक्षणिक वारसा व गुणवत्ता जपलेली आहे.
शाळेची स्थापना झाली होती तेव्हा शाळेत फक्त इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण मिळत असे. त्यानंतर सरकारच्या अनुदानातून आणि गावकऱ्यांच्या मदतीतून हळूहळू वर्ग वाढत गेले. गावातील पूर्व दिशेला अगदी डोंगराच्या कडेला शाळेचे स्थान आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पक्का रस्ता बनवण्यात आलेला आहे.
शाळा ही गावाबाहेर असल्याने तेथील वातावरण अत्यंत निसर्गरम्य असे आहे. शाळेला एक मनमोहक अशी बाग आणि भव्य असे मैदान आहे. शाळेची इमारत देखील सुसज्ज स्वरूपाची आहे. शाळेला एकूण बावीस वर्गखोल्या आहेत, ज्यामध्ये प्राचार्य कक्ष, शिक्षक कक्ष देखील समाविष्ट आहेत.
प्रत्येक वर्ग हा कलात्मक पद्धतीने सजवलेला आहे. प्रत्येक वर्गात शैक्षणिक तक्ते, प्रायोगिक वस्तूंचा संग्रह आहे. वर्गातील मुले अत्यंत प्रायोगिक पद्धतीने ज्ञान मिळवत असतात व शिक्षण घेत असतात. त्यामुळे वर्गात गेल्यावर आपोआपच शैक्षणिक वातावरण असल्याचे जाणवते.
शाळेत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ग्रंथालय व वाचनालय आहे. ग्रंथालयात विविध विषयांची अनेक साहित्यिक पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयात जाऊन आम्ही नियमित वर्तमानपत्र किंवा मासिकांचे वाचन करतो. अतिरिक्त कोणाला अभ्यास करावयाचा असल्यास अभ्यास कक्ष देखील ग्रंथालयात उपलब्ध आहे.
शाळेत मराठी, इंग्रजी, हिंदी हे भाषेचे विषय आणि भुगोल, इतिहास, विज्ञान, गणित असे इतर विषय शिकवले जातात. शाळेत विज्ञान विषयासाठी एक प्रयोगशाळा आहे. तेथे आम्ही आठवड्यातून एकदा प्रयोग करण्यासाठी जात असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.
शाळेत स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. त्याशिवाय महत्त्वाच्या सण समारंभाला शाळेला सुट्टी असते. शाळेचा वार्षिक कालावधी जून ते एप्रिल असा आहे. शाळेत सहामाही व वार्षिक अशा दोन मुख्य परीक्षा असतात.
शाळेत प्रत्येक वर्षी कला महोत्सव आयोजित केला जातो. त्याशिवाय क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा देखील ठेवल्या जातात. सर्व स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शाळेत सांस्कृतिक भवन आहे. विद्यार्थी स्वतःहून अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात.
सरकारने राबवलेल्या शिक्षण पद्धतीनुसार शाळेत शिक्षण दिले जाते. शाळेची वेळ ही सकाळी अकरा ते सायंकाळी पाच अशी आहे. त्यामध्ये अल्प वेळेसाठी दोन सुट्ट्या असतात. शाळा सुरू झाल्याबरोबर सुरुवातीला वर्गांची व त्यानंतर शाळेची साफसफाई असते. साफसफाई झाल्यानंतर सर्व वर्गांची एकत्रितरित्या मैदानावर प्रार्थना घेतली जाते.
शाळेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र असे ओळखपत्र आहे. ते ओळखपत्र असल्यावरच शाळेत, प्रयोगशाळेत आणि ग्रंथालयात प्रवेश मिळतो. वर्षभराची शालेय पुस्तके व संगणक शिक्षण या सुविधा आम्हाला मुफ्त मिळतात. शालेय पुस्तके वर्ष संपल्यानंतर शाळेतच जमा करावी लागतात.
माझ्या शाळेला आमच्या पंचक्रोशीत नावाजले जाते. शाळेचा अत्यंत स्वच्छ परिसर, शैक्षणिक गुणवत्ता, शाळेची शिस्त अशा बाबी अगदी उत्तमरित्या सांभाळल्या गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने शाळेतील वातावरण हे खूपच उल्हासित आणि ज्ञानाच्या नव्या ऊर्जेने भरलेले असल्याने माझी शाळा ही मला खूपच आवडते.
माझी शाळा निबंधासाठी मुद्दे –
माझी शाळा हा मराठी निबंध लिहताना अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात. शाळेतील शैक्षणिक व्यवस्था, वर्गखोल्या, मैदान, ग्रंथालय अशा विविध प्रकारच्या बाबींचा विचार करूनच निबंध लिहायचा असतो. म्हणजेच निबंध लिहताना त्याच मुद्द्यांचा विस्तार करायचा असतो.
माझी शाळा (My School Essay In Marathi) हा मराठी निबंध लिहण्यासाठी आम्ही खाली काही मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. त्या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही तुमचा निबंध अधिक आकर्षक व मुद्देसूद लिहू शकता.
१. शाळेचे नाव व ठिकाण –
सर्वप्रथम शाळेचे नाव व ठिकाण लिहावे. त्यामध्ये आपण शैक्षणिक संस्था, शाळेचे मुख्य नाव यांचा समावेश करावा. त्याशिवाय शाळेची स्थापना केव्हा झाली, शाळेचे संस्थापक कोण आहेत अशा बाबीही तुम्ही निबंधात मांडू शकता.
२. शाळेची वास्तू –
शाळेची वास्तू म्हणजेच शाळेची इमारत कशा प्रकारची आहे, त्यामध्ये किती वर्गखोल्या आहेत, वर्गखोल्यांची रचना कशा पद्धतीची आहे याचा उल्लेख तुम्ही नक्कीच करू शकता. शाळेच्या भिंती कशा रंगवलेल्या आहेत. शैक्षणिक नकाशे, भित्तीचित्रे, सुविचार, बातमी फलक अशा मुद्द्यांचा समावेश देखील करू शकता.
३. शाळेचे मैदान –
शाळेच्या मैदानाचे वर्णन माझी शाळा या निबंधात करावयाचे असते. शाळेच्या प्रांगणात आणि मैदानात कोणकोणते खेळ खेळले जातात तसेच शाळेत गेल्यावर मैदानात विद्यार्थी काय काय करतात याचे देखील वास्तववादी वर्णन अपेक्षित असते.
४. शाळेचे ग्रंथालय –
शाळेचे ग्रंथालय हे ठिकाण शाळेतील सर्वात महत्त्वाचे ठिकाण असते. सर्व पाठ्यपुस्तकांचे नियोजन व वाटप ग्रंथालयाद्वारे केले जाते. तसेच शैक्षणिक पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर साहित्य लेखन, मासिके, वर्तमानपत्रे व कथा – कादंबऱ्या देखील ग्रंथालयात वाचनासाठी उपलब्ध असतात. ग्रंथालयाचे थोडक्यात वर्णन आपण माझी शाळा या निबंधात करू शकतो.
५. शाळेची प्रयोगशाळा –
विज्ञान विषयासाठी प्रयोगशाळा हे ठिकाण शाळेत उपलब्ध असते. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रयोगशाळेत प्रत्येक वर्गाचे प्रयोग घेतले जातात. प्रयोग करताना सर्वांना तार्किक व प्रायोगिक माहिती देऊन समजावले जाते. अशा प्रयोगशाळेचे वर्णन माझी शाळा या निबंधात असणे गरजेचे आहे.
६. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी –
शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त, शिक्षण, खेळ, व्यवस्थापन शिकवण्यासाठी विविध विषयांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी निवडलेले असतात. त्यामध्ये आपले आवडते शिक्षक व विविध विषयांच्या शिक्षकांचे वर्णन निबंधात अपेक्षित असते.
७. शिक्षण व्यवस्था –
प्रत्येक शैक्षणिक संस्थेनुसार शिक्षण व्यवस्था वेगवेगळी असते. शिक्षण मंडळाने ठरवून दिलेली शिक्षण व्यवस्था प्रत्येक शाळेत राबवणे हा नियम सर्वांसाठी लागू केलेला असतो. शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीची आहे, शिक्षण व्यवस्थेचा प्रभाव विद्यार्थ्यांवर कसा काय होतो, अशा बाबींचे वर्णन तुम्ही माझी शाळा या निबंधात करू शकता.
८. शाळेतील नियम व अटी –
प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना नियम व अटी समजावून दिलेल्या असतात. त्या नियमांमुळे शाळेतील शिस्त कायम टिकून राहत असते. नियमांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासुद्धा होऊ शकते. अशा नियम व अटींचे वर्णन माझी शाळा या निबंधात आपण करू शकतो.
९. शाळेतील विविध उपक्रम –
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम व स्पर्धा राबविल्या जातात. निबंध, भाषण, रांगोळी, चित्रकला, संगीत, अभिनय, नृत्य आणि विविध प्रकारचे खेळ असे विविध उपक्रम शाळेत आयोजित केले जातात.
१०. शाळेची इतर वैशिष्टे –
शाळेची शैक्षणिक प्रगती, सामाजिक स्तरावर शाळेचे महत्त्व, शाळेचे ब्रीदवाक्य, शाळेचा गणवेश, शाळेची वेळ व शाळेच्या सुट्ट्या अशा विविध प्रकारच्या बाबी विचारात घेतल्यास त्यांचा देखील समावेश आपण निबंधात करू शकतो.
शाळेविषयी बहुतेकदा विचारले जाणारे प्रश्न – FAQ’s about School In Marathi
१) विद्यार्थ्यांसाठी शाळेचे महत्त्व काय आहे?
उत्तर – विद्यार्थ्यांना जीवनाचा वेध शिक्षणातून घेता येतो. सत्य – असत्य, बरे – वाईट यामधील फरक कळून येतो. त्यानुसार ते भविष्यातील आपल्या आयुष्याची वाटचाल करू शकतात. अशा उदात्त हेतूने विद्यार्थ्यांचे जीवन हे उत्तम प्रकारे घडणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी शाळेचे महत्त्व नक्कीच आहे.
२) मुलांनी शाळेत का जावे?
उत्तर – शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार होत असतात. विद्यार्थ्याला आपल्या सुप्त कलागुणांची पारख करता येते. त्याशिवाय चांगले शिक्षण घेऊन तो स्वतःच्या प्राथमिक गरजा भागवू शकतो व एक जबाबदार व्यक्ती म्हणून घडू शकतो.
३) माझी शाळा हा निबंध कसा लिहावा?
उत्तर – माझी शाळा हा निबंध म्हणजे स्वतःच्या शाळेचे वर्णन करायचे असते. शाळेत घेतले जाणारे शैक्षणिक व इतर प्रकारचे उपक्रम, उपलब्ध असलेल्या सुविधा यांची देखील माहिती द्यायची असते.
४) शाळेत नियमित जाणे का महत्त्वाचे आहे?
उत्तर – कोणतीही गोष्ट सातत्याने केल्याने त्या गोष्टीचे परिणाम आपल्याला दिसून येतात आणि ते कायमचे टिकणारे असतात. आपल्या जीवनात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी आपल्याला नियमित शाळेत जाणे महत्त्वाचे आहे. नियमित शाळेत गेल्यावर आपल्या अभ्यासाविषयी सवयी निर्माण होत असतात.
५) शाळेला सुट्टी कधी असते?
दर रविवारी शाळेला आठवडी सुट्टी असते. तसेच विविध प्रांतानुसार तेथील मोठे सण समारंभ व कार्यक्रमादिवशी शाळेला सुट्टी असते. त्याशिवाय महाराष्ट्रात दिवाळी व उन्हाळी मे महिन्यात शाळेला अनेक दिवस सुट्ट्या असतात.
६) शाळेला गणवेश का असतो?
सर्व विद्यार्थ्यांना शिस्त व समानतेची शिकवण मिळावी म्हणून शाळेत जाताना एकसारखा गणवेश परिधान करणे गरजेचे आहे. त्याशिवाय आर्थिक परिस्थितीनुसार कोणताच विद्यार्थी हा सामाजिक स्तरावर एकसारखा नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये उच्च आणि नीचतेची भावना मनात जोपासू शकते.
ती भावना निर्माण न होता ऐक्याची भावना वाढीस लागावी याकरिता सर्वांना एकसारख्या कपड्यात शाळेत येणे अत्यावश्यक आहे.
७) शाळेत मुलांना ओळखपत्र का आवश्यक आहे?
शाळेतील विद्यार्थी हे अनेकवेळा वर्गातून बाहेर देखील वावरत असतात. त्याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी विद्यार्थी हे शाळेच्या गणवेशात ये – जा करत असतात. त्यावेळी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्याची ओळख पटण्यासाठी म्हणजे तो कोणत्या इयत्तेतील आणि कोणत्या तुकडीतील आहे हे कळून येण्यासाठी मुलांना शाळेचे ओळखपत्र दिले जाते.
तुम्हाला माझी शाळा हा मराठी निबंध (Majhi Shala Nibandh Marathi) आवडला असेल तर नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा…