प्रस्तुत लेख हा माझी प्रिय मैत्रीण (Majhi Priy Maitrin Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात मैत्रिणीचे महत्त्व, गरज आणि तिच्यासोबत व्यतित केलेले अनुभव अशा बाबी व्यक्त करण्यात आलेल्या आहेत.
माझी प्रिय मैत्रीण निबंध मराठी | Majhi Priy Maitrin Nibandh Marathi |
माझे नाव ललिता पवार. मी आणि सुलेखा खूपच छान मैत्रिणी आहोत. सध्या आम्ही इयत्ता सातवीत शिकत आहोत. आम्ही इयत्ता तिसरी पासूनच्या मैत्रिणी आहोत. आम्ही दोघी एकाच शाळेत शिकतो. तिचे घर आमच्या घराशेजारीच आहे. आम्ही शाळेत जाताना आणि माघारी घरी येताना एकत्रच असतो.
मी इयत्ता तिसरीत असताना तिचे कुटुंब आमच्या येथे स्थायिक झाले. त्याच वर्षी तिचा प्रवेश आमच्या शाळेत आणि पर्यायाने आमच्या वर्गात झाला. सुरुवातीला अबोल असणारी सुलेखा काही दिवसानंतर खूपच बोलकी झाली. आम्ही दोघीही एकाच बाकड्यावर बसू लागलो.
आम्हाला मैत्री या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता मात्र आम्हा दोघींना एकत्र वेळ व्यतित केल्यावर अत्यंत छान अनुभव येत असे. त्यांनतर जसजसे आम्ही मोठे होऊ लागलो तसतसे आमचे एकमेकींच्या घरी येणे – जाणे वाढले. हळूहळू तिच्या आणि माझ्या आवडीनिवडी अत्यंत मिळत्याजुळत्या झाल्या.
मला आणि सुलेखाला एकत्र खेळणे, चित्र काढणे, अभ्यास करणे तसेच फिरायला जाणे खूप आवडते. आम्ही एकमेकींना कधी कधी खूप खोट्या – नाट्या गोष्टीसुद्धा सांगतो. आम्हाला त्या गोष्टी खोट्या आहेत हे माहीत असतानाही आम्ही एकमेकींना फक्त खोटाखोटा होकार भरत असतो.
आम्ही जेव्हा सुरुवातीला एकमेकींशी मैत्री केली, तेव्हा अनेक प्रसंगी आमची खूप भांडणे होत असत. आम्ही एकेमकींशी काही वेळ बोलत नसे. त्यानंतर कधी मी तर कधी ती स्वतःहून बोलण्यासाठी पुढाकार घेत असे. आमची खेळण्यातील भांड्यावरून तर कधी अभ्यासाच्या वहीवरून देखील भांडणे होत असत.
प्रत्येक भांडणातून आमची मैत्री अजूनच घट्ट होत गेली असं म्हणावं लागेल. कारण भांडणानंतर आमच्या दोघींच्या स्वभावातील उणिवा आम्हाला उमगत गेल्या. तसेच कोणतेही नाते चांगले कसे काय बनू शकते हेही आम्हाला कळत गेले. जसजसे आम्ही मोठे होत गेलो तसतशी आमची भांडणे खूप कमी होत गेली आणि समज वाढत गेली.
सुलेखामुळे मला खूप साऱ्या गोष्टी अनुभवता आलेल्या आहेत. आम्ही आमच्या घरी केलेली पोह्याची मेजवानी, एकाच बाकड्यावर बसून दररोज करत असलेले जेवण, एका पेन्सिलीसाठी ऋतुजासोबत केलेलं भांडण, पावसाळ्यातील एका रविवारी काढलेली सहल, अशा एक ना अनेक अनुभवांनी आमची मैत्री खूपच रंगतदार होत गेलेली आहे.
माझा स्वभाव थोडा फटकळ आहे तर सुलेखाचा थोडासा शांत आहे. आम्ही दोघी एकमेकींना नेहमीच सांभाळून घेत असतो. कधी मला घरी करमत नसेल तर मी आवर्जून तिला फोन करते. मग आम्ही किती वेळ बोलत बसतो हे आम्हालाच कळत नाही.
आम्ही दोघी सतत एकत्र असल्याने आमच्या वर्गातील सर्वजण आम्हाला ‘सख्ख्या मैत्रिणी’ असे संबोधतात. आम्हा दोघींनाही जांभळा रंग खूप आवडतो. आम्ही त्याच रंगाच्या चपला, दप्तर, आणि इतर काही दैनंदिन वापराच्या वस्तू वापरतो. शाळेतून माघारी घरी येताना एखादे फिल्मी गाणे गातच आम्ही येत असतो.
सुलेखाला मोठं झाल्यावर शिक्षिका व्हायचं आहे तर मला पोलिस बनायचंय. आत्ताची आमची स्वप्ने ही जरी पुसट असली तरी मोठे झाल्यावर ती नक्कीच सत्यात उतरतील. ‘मोठे झाल्यावर आपण एकमेकींच्या संपर्कात रहायचं आणि आपली मैत्री कधीच तुटू द्यायची नाही’ असे वचन आम्ही एकमेकींना कधीच देऊन ठेवलंय.
तुम्हाला माझी प्रिय मैत्रीण हा मराठी निबंध (Majhi Priy Maitrin Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…