पतंग – मराठी निबंध | Patang Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा पतंग (Patang Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. प्रत्येकाने पतंग उडवण्याचा अनुभव कधी ना कधी घेतलेलाच असतो. तो अनुभव आणि पतंगाची प्राथमिक स्वरूपाची माहिती या निबंधात स्पष्ट केलेली आहे.

पतंग – मराठी निबंध | Essay On kite In Marathi |

पतंग ही सर्वांचीच आवडती कागदी वस्तू! प्रत्येकाने जीवनात कधी ना कधी पतंग उडवलेलाच असतो. पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित करणे, पतंगाची दोरी कापणे, पतंग हातात घेऊन संपूर्ण रस्त्यावरून धावत सुटणे, घरच्या घरी पतंग बनवणे अशा गोष्टी आपण सर्वांनी कधी ना कधी केलेल्याच असतात.

पतंग ही अगदी साधी बनावटी वस्तू आहे. बांबूच्या सडपातळ काड्या, चौकोनी कागद आणि उडवण्यासाठी बारीक दोरीचा गुंडा अशा निवडक गोष्टींनी पतंग उडण्यासाठी तयार असतो. पतंग उडवण्यासाठी थोड्या सरावाची गरज भासते. वाऱ्याची दिशा व प्रवाह अशा बाबी निरीक्षणात आणाव्या लागतात.

पतंग चौकोनी आकाराचा असून त्याचे एक टोक वर केले जाते. एक काडी बरोबर मध्यभागी लावली जाते आणि दुसरी काडी थोडीशी वाकवून आडवी लावली जाते. त्या दोन्ही काड्यांना मागच्या बाजूने दोरीचा मांझा जोडला जातो. तोच मांझा पतंगाला आकाशात असतानाही हवेतील नियंत्रण प्राप्त करून देत असतो.

पतंग उडवणे हा खेळ कोणीही खेळू शकते. परंतु लहान मुले त्यासाठी विशेष उत्सुक असतात. पतंग विक्रीसाठी येताच त्यांना खरेदी करण्यासाठी लहान मुले दुकानात तुंबळ गर्दी करतात. विशेषतः लहान मुलांना विविधरंगी पतंग खूप आकर्षित करतात. दुकानदार देखील आवर्जून रंगबेरंगी पतंगच विकत आणतात.

पतंग निर्मिती हा लघु उद्योग आहे. मकरसंक्रांत आणि लहान मुलांच्या सुट्टीच्या दिवसांत बहुतांश प्रमाणात पतंग तयार केले जातात. त्याच काळात अनेक ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. लहान मुले, तरुण मुले – मुली तसेच इतर ज्येष्ठ नागरिक देखील अशा स्पर्धेत सहभागी होत असतात.

घराच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवणे ही तर सामान्य बाब आहे. त्याव्यतिरिक्त कौटुंबिक अथवा मित्रांची सहल ही एखाद्या रम्य अशा ठिकाणी गेल्यावर पतंग उडवणे हा एक उपक्रम असू शकतो. त्याशिवाय माळरानी किंवा डोंगरावर गेले असताना तेथे पतंग उडवणे हा सुद्धा एक अद्भुत अनुभव ठरू शकतो.

पतंग हा आपण घरच्या घरी देखील तयार करू शकतो. पतंगाला लागणारे सर्व साहित्य विकत घेऊन आपण मोकळ्या वेळेत कागदी अथवा प्लास्टिकचा पतंग बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. शाळेतील मुलांना कार्यानुभव विषयात पतंग तयार करणे ही एक कृती असते.

पतंगाची शेपटी ही देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. काहीजण पतंगाला भली मोठी शेपटी जोडतात तर काहीजण अगदी तळहाताएवढी शेपटी जोडतात. काही कलाकार मंडळी तर पतंगाच्या दोन्ही बाजूला कान म्हणून अतिरिक्त कागद जोडतात.

पतंग हा विशेषतः मकरसंक्रांतीच्या काळात उडवला जातो. संपूर्ण भारतात संक्रांतीवेळी उत्साहाचे वातावरण असल्याने पतंग उडवणे हाही एक खेळ त्यावेळी आवर्जून खेळला जातो. पतंग स्पर्धेत पतंगाची दोरी कापणे, पतंग उंच उडवणे, पतंग जास्त वेळ उडवणे अशा विविध खेळांचा समावेश असतो.

पतंग ही एक छोटी वस्तू असली तरी तिचे मूल्य अधिक आहे. पतंगामुळे व्यक्तीमध्ये अतिउत्साह निर्माण होतो. पतंग उडवण्याचे कौशल्य विकसित करून कोणीही आनंदाचे क्षण प्राप्त करू शकतो. पतंग आकाशात उंच उडत असताना आपल्याही मनात उंच आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न जागृत होत असते.

तुम्हाला पतंग हा मराठी निबंध (Patang Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…✍️

1 thought on “पतंग – मराठी निबंध | Patang Nibandh Marathi |”

Leave a Comment