प्रस्तुत लेख हा माझे गाव (Majhe Gaav Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात स्वतःच्या गावाविषयी सर्व प्रकारची प्राथमिक माहिती दिलेली आहे आणि गावाच्या भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक संरचनेचे वर्णन केलेले आहे.
माझे गाव – मराठी निबंध क्र. १ | My Village Essay In Marathi |
माझे गाव हे निसर्गाच्या सानिध्यात एका डोंगराच्या कुशीत वसलेले गाव आहे. माझ्या गावाचे नाव सुंदरनगर आहे. अगदी नावाप्रमाणेच माझे गाव हे स्वच्छ आणि सुंदर आहे. स्वच्छ रस्ते, नियमित पाणी व वीजपुरवठा, प्राथमिक शिक्षण अशा सर्व प्रकारच्या सुविधा गावात उपलब्ध आहेत.
सुमारे साठ वर्षांपूर्वी आमच्या गावाची वसाहत निर्माण झाली होती. आमच्या आजोबांची पिढी ही शेती कामानिमित्त येऊन या ठिकाणी कायमचे वसले. त्यानंतर हळूहळू इतरही ठिकाणचे नागरिक कामासाठी येथे येऊ लागले आणि गावाची वस्ती वाढू लागली. सध्या आमच्या गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे.
आमच्या गावाला ग्रामपंचायत आहे जेथे सर्व सरकारी व्यवस्था अत्यंत सुरळीत राबवली जाते. गावाच्या बरोबर मध्यभागी प्राथमिक शाळा आहे. शाळेशेजारीच एक मैदान आहे जेथे गावातील सर्व मुले विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळत असतात. गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने गावात शेतीक्षेत्र जास्त आहे.
गावात लोकसंख्या कमी असल्याने राजकीय ताणतणाव आणि संघर्ष एवढा जाणवत नाही. शेती आणि उद्योग करणारे लोक हे परस्पर साहचर्याने जीवन जगतात. भारतीय शासन व्यवस्थेप्रमाणे पाच वर्षांतून एकदा पंचायत निवडणुका देखील असतात. गावातील पुढारी लोक हे गावाची विकास योजना राबवत असतात.
सामाजिक उपक्रम अथवा कार्यक्रम असल्यास गावातील लोक हे एकत्र येऊन तो पार पाडतात. दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्री, गुढीपाडवा, होळी, यात्रा, बैलपोळा असे विविध सण गावात अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. गावची यात्रा ही वर्षातून एकदा भरते आणि सर्व गावकरी एकत्र येऊन देवाची मिरवणूक काढतात.
गावात इयत्ता सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. गावातील किशोरवयीन आणि तरुण पिढी ही माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी शेजारील गावी जातात. गावात जीवनावश्यक कामे पूर्ण होण्यासाठी विविध उद्योग – व्यवसाय केले जातात. तसेच गावात वाचनालय असल्याने सर्व साक्षर लोकांना त्याचा लाभ होत असतो.
सध्या आमचे गाव हे सामाजिक गरज आणि समस्या ओळखून त्या दिशेने वाटचाल करत असलेले गाव आहे. त्यामुळे गावात विविध विकासाच्या योजना राबविल्या जातात. प्रत्येक नागरिकाचे त्यासाठी आर्थिक व वैयक्तिक पातळीवर सहकार्य लाभते. गावात वृक्षलागवड व साफसफाई या गोष्टींवर विशेष भर दिला जातो.
गावचे भवितव्य हे प्रत्येक पिढी पुढच्या पिढीकडे संक्रमित करत असते. सामाजिक स्थिरता आणि नैतिकता टिकून राहण्यासाठी तसेच गावच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होण्यासाठी महिन्यातून एकदा ग्रामसभा भरवली जाते. अशा प्रकारे विकासात्मक दृष्टिकोन असलेल्या माझ्या गावाचा मला खूप अभिमान वाटतो.
माझे गाव – निबंध क्र. २ | Majhe Gaav Nibandh Marathi
माझ्या गावाचे नाव आहे अनंतपुर! गावाला लागूनच कृष्णा नदी वाहते. माझे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे आणि शेजारून नदीही वाहत असल्याने नैसर्गिक सुंदरतेची देणगी आमच्या गावाला लाभली आहे. जवळजवळ दोनशेच्या आसपास घरे गावात असतील. बहुतेक घरे अजूनही कौलारू आहेत.
वर्षभरातील विविध सांस्कृतिक सण आणि उत्सव आम्ही उत्साहात सर्वजण मिळून साजरे करतो. यामध्ये गणेशोत्सव आणि दिवाळी हे सण खूप आनंद देणारे असतात. आमच्या गावात दोन युवा मित्र मंडळे आहेत जी प्रत्येक वर्षी प्रत्येक सण सामाजिकरित्या उत्साहात पार पाडतात.
गावची यात्रा मार्च महिन्यात असते. सर्व पाहुणे आणि इतर शहरात स्थायिक झालेली गावची मंडळी एकत्र येऊन भैरवनाथ देवाची यात्रा साजरी करतात. गावात मारुती आणि भैरवनाथ अशी दोन मंदिरे आहेत. गावाला एक ग्रामपंचायत देखील आहे. ज्याद्वारे गावचा सर्व कारभार व्यवस्थितरीत्या सांभाळला जातो.
गावात उपजीविकेचे साधन शेती असल्याने पिके, वनराई, झाडे आणि फळबागा यांची विपुल प्रमाणात उपलब्धता माझ्या गावात आहे. तसेच गावात मुबलक पाणीपुरवठा, सर्वांना राहण्यासाठी घरे, योग्य तो धान्य आणि भाजी पुरवठा होतो. गावात इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दोन खाजगी दुकाने देखील आहेत.
गावाला एक सरकारी प्राथमिक शाळा आणि लहान मुलांची अंगणवाडी शाळा आहे. दोन्ही शाळेत मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे आणि शाळेत शिकवण्यासाठी गुणवान शिक्षक आहेत. गावातील भावी पिढी ही सुशिक्षित आणि साक्षर बनवण्यासाठी उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्याचे कार्य दोन्ही शाळांतून होत असते.
निवडणूक होतानाच काही विकासाचे मुद्दे अगोदर विचारात घेतले जातात जेणेकरून त्या गोष्टी अंमलात आणल्या जातील. गावच्या पारावर ग्रामसभा आणि बैठक बसते ज्याद्वारे समस्या किंवा विकास यांचे मुद्दे उपस्थित केले जातात. गावात पक्के रस्ते आणि वाहतुकीची योग्य सोय आहे. सर्व ठिकाणी बांधिलकी जपण्यासाठी सर्व कुटुंब एकत्र गावच्या कुठल्याही उपक्रमात सहभागी होतात.
गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याने सर्व सण आणि उत्सव हे शेतीसंबंधित असतात. सर्व लोक मिळून शेतीसाठी एकमेकांना सहाय्य करतात. माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी गावाशी जोडल्या गेल्या आहेत ज्या मी कधीच विसरू शकत नाही. अशा अनेक कारणांनी माझे अनंतपुर गाव मला खूप आवडते.
तुम्हाला माझे गाव हा मराठी निबंध (Majhe Gaav Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…