माझा आवडता विषय – गणित मराठी निबंध | Majha Avadta Vishay Ganit Nibandh

प्रस्तुत लेख हा माझा आवडता विषय – गणित (Majha Avadta Vishay Ganit Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. गणित हा विषय एका विद्यार्थ्याला का आवडतो या प्रश्नाची सर्व उत्तरे या निबंधात स्पष्ट करण्यात आलेली आहेत.

माझा आवडता विषय गणित – मराठी निबंध | My Favourite Subject Mathematics Essay In Marathi |

आमच्या शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतर सर्व विषयांपैकी गणित हा माझा आवडता विषय आहे. मला गणित विषयात सर्वोत्तम गुण मिळत असल्याने तो विषय शिकताना नेहमीच रस वाटतो. गणितातील संकल्पना, गणितातील मूलभूत प्रक्रिया, सुत्रे, संख्यांची आकडेमोड आणि भौमितिक आकृत्या असे सर्वकाही गणितातील शिक्षण मला आवडते.

आम्हाला आमच्या शाळेत श्री. पी. आर. कदम सर हे गणित विषयाचे शिक्षक आहेत. ते खूपच गमतीशीर पद्धतीने गणित हा विषय शिकवतात. काही चाचणी परीक्षांत मला पैकीच्या पैकी गुण देखील मिळालेले आहेत. गणिते सोडवताना माझा आत्मविश्वास हा प्रचंड प्रमाणात असतो.

मूलभूत गणिती प्रक्रिया जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या मला अत्यंत सहज पद्धतीने आणि जलद गतीने करता येतात. काही उदाहरणे तर मी मनातल्या मनात सोडवू लागलेलो आहे. शाळेत गणिताचा तास हा सुरुवातीलाच असल्याने माझ्या पूर्ण दिवसाची सुरुवातच चांगल्या पद्धतीने होत असते.

गणितामध्ये जसे एखाद्या सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवलेले असते, अगदी त्याच पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या देखील आपण तर्क बुद्धीने जाणून घेऊन नैतिक नियमांचा वापर करून सोडवू शकतो. गणितामुळे समस्या सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे, असे मला वाटते.

गणित हा विषय प्रायोगिक तत्त्वावर देखील तितकाच महत्वाचा आहे. दैनंदिन जीवनात कितीतरी गणितीय व्यवहार आपल्या आसपास आपण पाहत असतो. अशा व्यवहारांत आपली फसवणूक होऊ नये म्हणून गणित आपल्याला उपयोगी पडते. बँक, शाळा, दुकाने, उद्योग संस्था अशा कितीतरी ठिकाणी आपल्याला गणिताचा उपयोग होत असतो.

सध्या आमच्या शाळेत गणित विषयाला एकूण तीन शिक्षक आहेत. सर्व शिक्षक उत्तम शिकवतात. परंतु मला खऱ्या अर्थाने गणिताची आवड निर्माण झाली ती लहानपणी! मी लहान असताना माझ्या बाबांनी मला गणित शिकवायला सुरुवात केली होती. त्याचा फायदा मला हळूहळू शालेय शिक्षणात झाला होता.

प्रत्येक वर्षी गणित विषयात मला ‘अ’ श्रेणी प्राप्त झालेली आहे. सध्या शाळेत आम्हाला अभ्यास म्हणून गणिताच्या प्रत्येक पाठावर आधारित गृहपाठ दिले जातात. एखाद्या दुसऱ्या विषयाचा अभ्यास माझा कधीकधी पूर्ण होत नाही परंतु गणित विषयाचा अभ्यास हा माझा कधीच अपूर्ण राहत नाही. 

मला भविष्यात देखील गणित विषयच संपूर्णपणे शिकावासा वाटेल. मोठे झाल्यावर माझी कारकीर्द ही गणित विषयाचा शिक्षक म्हणून मला घडवायची आहे. माझ्या या स्वप्नासाठी माझ्या घरातील लोक मला सहाय्य करतीलच असे मला मनोमन वाटते. त्यासाठी सध्या मी खूप मन लावून गणिताचा अभ्यास करत आहे.

तुम्हाला माझा आवडता विषय गणित हा मराठी निबंध (Majha Avadta Vishay Ganit Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment