नेतृत्व मराठी निबंध! Leadership Essay In Marathi

नेतृत्व निबंध (Leadership Essay) विद्यार्थ्यांना खूप काळजीपूर्वक लिहावा लागतो. नेतृत्व सहजासहजी अंगी येत नाही. त्यामुळे नेतृत्व हा गुण काही लोकांतच पाहायला मिळतो. नेतृत्व हा निबंध लिहताना काल्पनिक विस्तार करावयाचा नसतो. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा नेतृत्व हा निबंध!

Essay on Leadership in Marathi | नेतृत्व गुण मराठी निबंध |

आजपर्यंत विश्र्वभरात अनेक राजे, नेते, खेळाडू आणि समाजसेवक होऊन गेले. पण त्यापैकी नक्की कितीजण खरोखर नेतृत्व गुण जोपासून होते? नेतृत्व करताना अशा लोकांना कोणत्या गोष्टी अंगिकाराव्या लागल्या? कोणत्या संकटांचा सामना करावा लागला? त्यांना विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागले का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधावी लागतील. तेव्हा खरे नेतृत्व तुम्हाला समजेल.

नेतृत्व हा शब्द फक्त ऐकीव आहे. बहुसंख्य लोक त्याबद्दल आयुष्यात विचार देखील करीत नाहीत. नेतृत्व हे वंशपरंपरेने जर काम म्हणून हाती आले असेल तर तेव्हा जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु ते नेतृत्व टिकवण्यासाठी मात्र अविरत प्रयत्न करावे लागतात. आजपर्यंत आपण असंख्य लोक असे पाहू शकतो ज्यांचा वंश हा नेतृत्वाने सजला होता परंतु काळाच्या ओघात त्यांचा वंश मात्र ते नेतृत्व सांभाळू शकला नाही.

नेतृत्व हा गुण सजगतेने आणि समाजसेवेच्या भावनेतून विकसित करता येऊ शकतो. नेतृत्व विकसित करताना सर्वप्रथम आपल्याला असा विचार करावा लागेल की, वास्तविक परिस्थिती आणि लोकांच्या समस्या काय आहेत? त्या कोणत्या पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात? त्यांचे योग्य निराकरण झाल्यास लोक स्वतः तुम्हाला नेतृत्व सोपवतील.

इतिहासात राजे आणि आत्ता राजकारणी, खेळाडू, विविध व्यावसायिक अशी खूप सारी उदाहरणे देता येतील. अशा लोकांनी स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ न बघता लोकहिताची कामे घडवून आणली आणि लोकांच्या नजरेत विराजमान झाले. अगोदर सत्ता आणि मग नेतृत्व असेच पूर्वीपासून चालत आले आहे त्यामुळे सत्तासंघर्ष हा होतच आला आहे. जो व्यक्ती व्यवस्थित स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेऊन काम करत राहतो, त्यालाच नेतृत्व सोपवले जाते आणि असा व्यक्तीच त्या नेतृत्वासाठी योग्य असतो.

नेतृत्व सोपवले जाणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. एखाद्याला नेतृत्व मिळाले की त्याचे निर्णयच त्याची कुशलता ठरवत असतात. सर्व बाजूंनी मानवता आणि निसर्गाचा समतोल ढळू न देता त्याला सर्वांगी आणि योग्य निर्णय घ्यावे लागतात. काहीवेळा विपरीत परिस्थितीचा सामनादेखील करावा लागतो. मग लोकांना त्याचे काम दिसते आणि लोक स्वतः अशा व्यक्तीचे नेतृत्व मान्य करतात.

व्यक्तीला नेतृत्व करत असताना प्रत्येक क्षणी समाज आणि लोकहितच पाहावं लागतं. स्वहित आणि स्वार्थ न पाहता देशहित आणि समाजहित समोर ठेवावं लागतं. प्रत्येक देशासाठी सामाजिक व्यवस्थेअंतर्गत काही नियम आणि अटी लागू केलेल्या असतात. त्या नियमानुसार योग्य ते बदल आणि कार्य नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला करावे लागते.

नेतृत्व काही काळ टिकू शकते पण काळानुसार नेतृत्वगुण विकसित करून ते जोपासायला देखील हवेत. कधीकधी सामाजिक विरोध पत्करून स्वतःच्या हिमतीवर लोकहितासाठी भविष्याला फायदेशीर ठरतील असे निर्णय आणि नियम यांची अंमलबजावणी करावी लागते. त्यामुळे नेतृत्व मिळणे यापेक्षा नेतृत्व टिकवणे जास्त महत्त्वाचे आहे.

नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला विरोधकही असतात परंतु त्यांच्याही हिताचा विचार त्याला करावा लागतो. यासाठी सर्वात महत्त्वाचा गुण आवश्यक ठरतो तो म्हणजे निरहंकारीता. निरहंकारी व्यक्तीच समतोल राहून, थोडेही विचलित न होता योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यासाठी निस्सीम देशभक्ती, आणि समाजसेवेची आवड असावी लागते.

सोन्याला जसे आगीत तापल्याशिवाय झळाळी येत नाही त्याप्रमाणे विपरीत परिस्थिती हीच व्यक्तीला सुधारत आणि घडवत असते. विपरीत परिस्थितीत जो ढळला त्याचे नेतृत्व कोणीच मान्य करीत नाही. विपरीत परिस्थिती आणि त्यामध्ये घेतलेले योग्य निर्णय हेच व्यक्तीला महान बनवत असतात. त्यामुळे नेतृत्व हे कुठल्या सामाजिक किंवा राजकीय संस्थेच्या पदावरून ठरत नाही तर व्यक्तीची क्षमता संकटकाळी आणि विपरीत परिस्थितीत पारखली जाते.

नेतृत्व हे फक्त पदावरून न ठरता व्यक्तीच्या अंगभूत कौशल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्यातही जर नेतृत्व बाणवायचे असेल तर तुम्ही या निबंधाचा नक्की विचार करा व नेतृत्व हा निबंध (Leadership Essay in marathi) तुम्हाला कसा वाटला, याबद्दल नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद!

Leave a Comment