प्रस्तुत लेख हा कष्टाचे महत्त्व (Kashtache Mahattv Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आपल्या जीवनात कष्ट करणे किती महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे आपला विकास कसा काय होतो याचे विस्तृत वर्णन या निबंधात करण्यात आलेले आहे.
कष्टाचे महत्त्व – मराठी निबंध | Kashtache Mahattv Nibandh Marathi
मानवी जीवनात कष्टाला खूप महत्त्व आहे. कष्ट केल्याने शारिरीक आणि मानसिक स्तरावर स्वास्थ्य निर्माण होत असते. मानवी जीवनातील प्राथमिक स्वरूपाचे पण अत्यंत गरजेचे असलेले आरोग्य हे कष्ट केल्याने प्राप्त होत असते.
सर्वप्रथम कष्ट ही संकल्पना आपल्याला नीट समजून घ्यावी लागेल. कष्ट म्हणजे दुःख नसून ती शरीराच्या आणि मनाच्या विकासाची स्थिती आहे. कष्ट केल्याने आपल्या पूर्वसीमा तुटतात आणि जीवनाची कक्षा विस्तारते. कष्टाची सवय निर्माण झाल्याने जीवन नियमितपणे सुखदायी अनुभव करते.
शरीर हे यंत्रवत असल्याने शारिरीक क्रिया या वारंवार घडत असतात. त्यामुळे शरीराला जेवढे कष्ट पडेल तेवढे शरीर सक्षम आणि कणखर बनत जाते, याचा अनुभव आपल्याला नित्य जीवनात असतोच. आपण जेव्हा मेहनत करतो तेव्हा आपले शरीर खऱ्या अर्थाने स्वास्थ्य अनुभव करते.
कष्ट केल्याने मन नियंत्रणात राहते आणि ते उद्विग्न व उदास होत नाही. कष्ट करत असल्यास मन दिवसेंदिवस निर्मितीक्षम बनत जाते. कोणत्याही कामाच्या सुरुवातीला मनाचा थोडासा विरोध होतो कारण मनाला फक्त कल्पनेत रमायला आवडते. परंतु निश्चय पक्का असल्यास कष्ट हे आपल्याला अगदी सोयीस्कर पडतात.
आधुनिक युग हे माहिती युग आहे. सध्या जगण्यासाठी जास्त कष्टाची गरज भासत नाही. कष्ट कमी झाल्याने मानवाला मानसिक चिंता, भीती व निराशा जाणवू लागलेली आहे. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील खूपच कमी झालेली आहे. कष्ट नसल्याने जीवन एकंदरीत सुखकर न होता आणखीनच दुःखी बनत चाललेले आहे.
कष्ट करण्याचे महत्त्व जाणून घेणे आणि त्याचे फायदे ओळखणे, ही आता काळाची गरज बनलेली आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपण आपले जगणे सुरक्षित केलेले आहे परंतु सहज आणि नैसर्गिक मानवी जगणे मात्र विसरलेलो आहोत. काम जर कष्टपूर्ण नसेल तर नियमित व्यायाम करणे आणि शारिरीक हालचाल ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
कष्ट केल्याने अन्नपचन व्यवस्थित होत असते. सर्व शारिरीक रसायने व अंतरस्त्राव नियमितपणे स्त्रवतात. याउलट कष्ट न केल्यास शारिरीक शिथिलता जाणवते. कोणत्याही कामात रस वाटत नाही. शरीर जड बनत जाते. परिणामी अनेक आजारांना निमंत्रण मिळत जाते.
कष्ट करण्याचे फायदे आणि महत्त्व समजून घेतले तरी कष्ट करण्याची अति मात्र कधीही करू नये. अति कष्ट केल्याने शरीराची अतिरिक्त व गरज नसताना झीज होते. शरीर व मनाची पूर्णपणे वाढ होत नाही. त्यामुळे अत्यंत आवडीने कष्ट निवडणे आणि ते प्रमाणात करणे ही आपल्यासाठी खूपच फायदेशीर बाब ठरेल.
तुम्हाला कष्टाचे महत्त्व हा मराठी निबंध (Kashtache Mahattv Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…