भारतात राजकारणावर बोलणारे सगळे, त्यातील वाद करणारे निम्मे, मतदान करणारे निम्मे असे गणित असताना काहीजण भलतेच भाव खाणारे असतात. त्यांची वर्दी कुठल्या तरी नेत्याची असते तर झेंडा कुठल्यातरी पक्षाचा असतो. “कार्यकर्ता” नामक असा व्यक्ती नेत्याशी बांधला गेलेला असतो. त्याची पक्षनिष्ठा ही नेत्याप्रमाणेच बदलत असते. “आपला नेता जिकडे…आम्ही पण तिकडे…” अशा मताचे ते असतात. पण पक्षबदलीनंतर येणारे नैराश्य व दिनहीनता, ही त्याची राजकारणातील उमेदच हिरावून घेते.     

समाजातील किती जाती आणि धर्म या भारताला एक राष्ट्र समजतात? कितीजणांना लोकशाही माहिती आहे? त्यापैकी कितीजण नेत्यांना खरोखर आपला विकासपुरुष मानतात? आणि त्यातले कितीजण फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात? या प्रश्नातून उत्तरे काढत एखादा व्यक्ती कधी कार्यकर्ता म्हणून स्वतःचा मार्ग निवडत नाही तर पैशासाठी होणारा तात्पुरता फायदा करवून घेत असतो. अशातूनच जर त्याची पक्षात बढती झाली तर त्याच्या वाट्याला फक्त पैसे वाटण्याचे काम येऊन बसते. स्वतःसाठी पैसे ठेवणे आणि राहिलेले बाकीच्यांना देणे, अशा भ्रष्ट प्रक्रियेतून विकास तर लांबच राहतो फक्त विकासप्रश्र्न उभे राहतात. त्याची उत्तरे आणि त्याची रूपरेखा मग त्या पक्षांचे नेते प्रत्येक निवडणुकीत देत असतात. त्यासाठी कार्यकर्ता हा कोणत्या उद्देशाने पक्षासाठी कार्य करतो हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे.   

एक मोठा प्रवर्ग आपल्या सोबती असला म्हणजे पक्ष उभारता येतो परंतु नेता त्यासाठी एकनिष्ठ, दृढनिश्चयी व उदात्त असला पाहिजे. नेत्याचा स्वार्थ पूर्ण होवो न होवो, एक पिढी तरी उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहू शकेल अशी सामाजिक बांधणी त्याला करता आली पाहिजे. असे करताना त्या नेत्याला सच्चा कार्यकर्ता हवा असतो. एखादा नेताच एखाद्या पक्षाला मोठा बनवत असतो. हे आपण स्वातंत्र्योत्तर राजकारणात बघत आलेलो आहोत. नेत्याची बोलणी व करणी जर एकच असेल तर कार्यकर्ता त्यासाठी त्याचे पूर्ण आयुष्य देखील पक्षकार्यासाठी वाहून घेऊ शकतो.     

नेता जर फक्त सत्तेसाठी पक्ष बदलत असेल तर कार्यकर्ता हा कुठेतरी स्वतःला हीन समजू लागतो. त्याची पक्षनिष्ठा ही भावनेतून जन्मलेली असते. असे असताना जर नेता दुसऱ्या पक्षाचा हात धरत असेल तर कार्यकर्ता हा तेवढ्या उमेदीने काम करत नाही जेवढा अगोदर करायचा. आयुष्याची निम्म्याहून अधिक वर्ष एखाद्या पक्षाचा उदोउदो करण्यात घालवली असतील असा कार्यकर्ता एखाद्या सकाळी दुसरा झेंडा हातात घेऊन पूर्ण ताकदीनिशी प्रचारात कसा उतरू शकेल? वर्षानुवर्षे विचारात असणारे मतभेद, हे फक्त सत्तेसाठी एका रात्रीत पुसले जाऊ शकतात?

ग्रामीण भागात तर एखादे गाव दोन पक्षांमुळे विभागलेले असते. अशावेळी कालपर्यंत विरोधी असलेले कार्यकर्ते एकमेकांकडे बघून आज आपण मूर्ख ठरलो अशा भावनेने मिळालेले पैसे खिशात ठेऊन, ढाब्यावरचं फुकटचं जेवून एकदिलाने प्रचारात उतरतात. परंतु कोणाविरोधात उतरत आहोत? हेच त्यांना आज समजत नाही.

हे हि वाचा- आजचा शिक्षक दिन एका शिक्षकाच्या दृष्टीने…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here