आजचा शिक्षक दिन एका शिक्षकाच्या दृष्टीने…

शिक्षक-विद्यार्थी हा नातेसंबंध कुटुंबाव्यतिरिक्त असतो. त्यासंबंधात समोरच्या विद्यार्थ्याला पूर्णपणे समजून घेऊन त्याच्या बुद्धीला पटेल असे शिक्षण देणे आणि अशातच त्या विद्यार्थ्याकडून असलेली अपेक्षा नकळत पूर्ण करून घेणे असे कर्तव्य शिक्षकाचे असते. आई-वडिलांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा जर कोणावर विश्वास असेल तर ती व्यक्ती म्हणजे शिक्षक असते. विद्यार्थ्याला घडवणे म्हणजे, किती हळुवारपणे व पूर्ण अस्तित्वानिशी प्रयत्न करावे लागतात याचे मर्म शिक्षकच जाणू शकतो. असा शिक्षक हा आपल्या आयुष्यात दोन पिढ्यातरी नक्कीच घडवत असतो. अशा एका जबाबदार व कर्तृत्ववान सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि पुरस्कार करण्यासाठी ५ सप्टेंबर हा “जागतिक शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो.   

आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी हा शिकण्यापेक्षा, त्याची उपस्थिती, त्याचा गणवेश व त्याचे लिखाण याकडेच जास्त लक्ष दिले जाते. प्रतिदिनी व प्रत्येक वर्षी तो एक चांगला माणूस म्हणून आणि आदर्श व्यक्ती म्हणून कसा घडत जाईल याचा कोणीही विचार करत नाही.    

लहान असताना विद्यार्थ्याच्या अजाणतेपणामुळे त्याचे वागणे अनाकलनीय असते. त्याची उपजतच असलेली सर्वकाही जाणून घेण्याची भूक व फक्त निरागस आनंद मिळवणे हे त्याच्या जीवनाचे केंद्रबिंदू असतात. हे तथ्य समजून घेऊन, भविष्यातील सामाजिक गरज व शिक्षण व्यवस्थेने राबवलेले उपक्रम विद्यार्थ्यात रुजवण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारच्या शिस्तीची आवश्यकता असते. ती शिस्त अगोदर शिक्षकाच्या अंगी बाणवली खूप महत्त्वाचे आहे. जर एखाद्याने शिक्षकी पेशा निवडला असेल तर त्याचे शिक्षण हे पूर्णपणे विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्यात असले पाहिजे. लहान मुलांची मानसिकता ही त्या त्या क्षणी निर्माण होत असते आणि बदलतही असते. मुलं फक्त झालेल्या घटना लक्षात ठेवतात आणि उपदेश, मूल्ये, संस्कार हे फक्त भाषेतच असल्याचे त्यांना जाणवते. संस्कारांचा खराखुरा अनुभव जाणण्यासाठी त्यांना जीवनाबद्दल खूप खोल दृष्टी द्यावी लागेल.       

लहानपणापासून विद्यार्थ्यांना समाजात, कुटुंबात व शाळेत जाणवत असलेले फरक व त्यांचा प्रभाव हा नकळतपणे त्यांचे व्यक्तिमत्त्व तयार करत असतो. शाळेत शिकवली जाणारी मूल्ये आणि समाजात लोकांच्या वागण्यात असलेला विरोध हा मुलांना लगेच जाणवतो. तो कटूपणा, नकारात्मकता ते लगेच अजाणतेपणाने आत्मसात करतात. थोडे मोठे होऊ लागल्यावर हीच नकारात्मकता त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून जाणवू लागते. हा बदल शिक्षकाने अगोदरच हेरला तर खूप अमुलाग्र बदल हा तो त्याच्या स्वभावातून व शिक्षणातून विद्यार्थ्यांकडून घडून आणेल.     

आजचे विद्यार्थी हेच उद्याचे पालक असणार आहेत. त्यामुळे पुढची पिढी घडवण्यासाठी शिक्षक हा केंद्रबिंदू असतो. फक्त भाषिक मूल्ये व संस्कार न शिकवता जीवनातील खरेखुरे अनुभव, खेळाची व  स्वकष्टाची तयारी, बुद्धीची धार व भाषेचा परखडपणा हे सर्वांगीण विकास घडवून आणणारे गुण देखील शिकवले गेले पाहिजेत. शिक्षक दिनी शिक्षक हाच खरा प्रौढत्व प्राप्त करून गेला पाहिजे, असे प्रत्येक शिक्षकाने जाणले पाहिजे.    

शिक्षक दिनी विद्यार्थी हेच शिक्षक बनत असतात, शिक्षकांना विविध भेटवस्तू आणतात. शिक्षक दिन हा यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनाच्या काही विविध दिशांना व आकांक्षांना स्पर्श करता येईल का? याचा सारासार विचार करून शिक्षकांनीच या दिवशी काही उदात्त पद्धतीचे उपक्रम राबवले पाहिजेत. शिक्षकाची घडवण्याची एक वेगळी दृष्टी ही समाजाला एक पाऊल पुढेच नेऊन ठेवेल.

हे नक्की वाचा-देव सगळ्यांच्या जोड्या वरच बनवतो” सगळ्यात मोठी अफवा!

Leave a Comment