प्रस्तुत लेख हा माझा आवडता खेळ कबड्डी (My Favourite Game – Kabaddi Essay In Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. कबड्डी खेळ कसा खेळला जातो, या खेळाचे नियम व अटी, तो खेळ स्वतःला का आवडतो अशा बाबींची चर्चा या निबंधात केलेली आहे.
कबड्डी निबंध मराठी | Kabaddi Nibandh Marathi |
कबड्डी हा खेळ प्रत्येक शाळा – महाविद्यालयात खेळला जाणारा खेळ आहे. आमच्या शाळेत देखील हा खेळ अत्यंत उत्साहात आणि खिलाडूवृत्तीने खेळला जातो. सर्व नियम व अटी पाळून, विरोधी स्पर्धकांना सुद्धा आदर देऊन कबड्डीचा सामना खेळला जात असल्याने कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे.
दक्षिण आशियातील एक प्रसिध्द खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे. भारतात कबड्डी हा खेळ खूपच प्राचीन काळापासून खेळला जातो. पूर्वी मातीत खेळला जाणारा हा खेळ सध्या मॅटवर देखील खेळला जातो. सध्या भारतात प्रो कबड्डी लीग, सुरक्षा दल खाती, सेवा क्षेत्रे आणि इतर कबड्डी अकॅडमी यांमध्ये कबड्डी स्पर्धा चालू असते.
कुस्तीप्रमाणे अस्सल मर्दानी खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे परंतु सध्या महिला देखील कबड्डी हा खेळ खेळू लागलेल्या आहेत. भारतात सध्या तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्र अशा विविध पातळींवर हा खेळ खेळला जातो. अतिशय रंजकरित्या आणि उत्स्फूर्तपणे खेळला जाणारा हा खेळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोहचला आहे.
इ. स. १९३४ मध्ये भारतात कबड्डीचे नियम तयार झाले. त्यानंतर थोड्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर इ. स. १९५० साली अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन करण्यात आला. भारतात राज्य आणि प्रदेश निहाय कबड्डी या खेळाला हुतूतू, चाडू – गुडू, वंदिकली, झबर गगने, दो – दो अशी वेगवेगळी नावे आहेत.
कबड्डीच्या मैदानात दोन बाजू असतात. दोन्ही बाजूंना विरोधी संघ मैदान राखून उभे असतात. प्रतिस्पर्धी संघावर चढाई म्हणून एक खेळाडू त्यांच्या मैदानात जातो आणि दुसऱ्या संघातील खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये दुसऱ्या संघातील सर्व खेळाडू चढाई करणाऱ्या खेळाडूला पकडण्याचा प्रयत्न करतात.
कबड्डी खेळताना “कबड्डी” या शब्दाचा उच्चार सतत करावा लागतो. जेवढे खेळाडू बाद होतील त्याप्रमाणे गुण पद्धती असते. विरोधी खेळाडू बाद झाल्यावर आपल्या संघाला एका गुणाची कमाई होत असते आणि आपल्या संघातील क्रमानुसार बाद झालेला खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी मैदानात येत असतो.
कबड्डीत कोणताच संघ कायमचा बाद होत नसतो. सर्व खेळाडू बाद झाल्यावर पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार असतात. सर्व खेळाडू बाद केल्याबद्दल मात्र विरोधी संघाला अतिरिक्त दोन गुणांची कमाई होत असते. खेळणाऱ्या सात खेळाडूंपैकी कोणत्याही खेळाडूसाठी बदली खेळाडू उपलब्ध असतो.
प्रत्येक संघात सात खेळाडू प्रत्यक्ष मैदानावर तर पाच खेळाडू बदली स्वरूपात खेळवले जातात. कबड्डी खेळात वीस – वीस मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. महिलांसाठी हा वेळ पंधरा – पंधरा मिनिटांचा असतो. हा खेळ नियमांतर्गत खेळला जाण्यासाठी पंचांचे निर्णय अंतिम ठरवले जातात.
मी अगदी लहान असल्यापासून कबड्डी पाहत आहे व खेळत आहे. या खेळासाठी मला माझ्या काकांकडून आणि वडिलांकडून खूप समर्थन आणि प्रोत्साहन मिळते. शाळेतील खेळ प्रशिक्षक सुद्धा माझ्याकडून कबड्डी खेळाचा भरपूर सराव करवून घेतात. भविष्यात एक उत्तम खेळाडू म्हणून कबड्डीत कारकीर्द घडवणे हेच माझे स्वप्न आहे.
तुम्हाला माझा आवडता खेळ – कबड्डी हा मराठी निबंध (My Favourite Game – Kabaddi Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…