माझा आवडता खेळ – क्रिकेट मराठी निबंध | Cricket Essay In Marathi

खेळ खेळणे प्रत्येकाला आवडत असते. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार खेळ खेळत असतो. शाळेत असताना खेळाशी संबंधित विषय म्हणून विद्यार्थ्यांना “माझा आवडता खेळ (My Favorite Game) या विषयावर निबंध लिहायला लागतो.

प्रस्तुत लेख हा माझा आवडता खेळ – क्रिकेट (My Favourite Game – Cricket Essay In Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. क्रिकेट खेळाविषयी प्राथमिक स्वरूपाची सर्व प्रकारची माहिती, खेळाचे नियम व अटी, हा खेळ कसा खेळला जातो, आणि तो स्वतःचा आवडता खेळ का आहे याचे विस्तृत वर्णन या निबंधात करण्यात आलेले आहे.

क्रिकेट – मराठी निबंध | Cricket Nibandh Marathi |

संपूर्ण भारतात क्रिकेट हा खेळ खूपच प्रसिध्द आहे. सध्या क्रिकेट या खेळात भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे देश खूपच प्रबळ आहेत. मी लहान असताना सर्वत्र क्रिकेटचाच जयजयकार चाललेला असायचा, नंतर आम्ही मित्र एकत्र येऊन हा खेळ खेळू लागलो. हळूहळू माझा क्रिकेट हा आवडता खेळ झाला.

आम्ही कधीकधी रबरी तर कधी टेनिस बॉलने क्रिकेट खेळतो. क्रिकेटचे नियम मला खूप आवडतात. विरूध्द संघाला पूर्ण खेळी करून देऊन त्या संघापेक्षा जास्त धावा जमवल्या की संघ विजयी, आणि नाही जमवल्या तर पराजयी; असा पायाभूत नियम या खेळात असतो.

दोन्ही संघात प्रत्येकी ११ खेळाडू असतात. त्यामध्ये एक कर्णधार, एक उपकर्णधार आणि एक यष्टिरक्षक असतो. खेळाडू आपापल्या कलेप्रमाणे फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. सर्वप्रथम दोन्ही संघाचे कर्णधार टॉस (नाणेफेक) उडवतात त्याद्वारे टॉस जिंकणारा कर्णधार ठरवतो की फलंदाजी करणार की गोलंदाजी!

गोलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजी करणाऱ्या संघाचे सर्व खेळाडू बाद करावे लागतात. त्याविरुद्ध फलंदाज मात्र जेवढी षटके आहेत त्यामध्ये धावा जमवत राहतात. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघास नंतर फलंदाजी करण्याची संधी मिळत असते.

आमच्या शाळेत आणि आमच्या गल्लीत मी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. अष्टपैलू हा एक असा खेळाडू असतो जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही उत्तमरित्या करू शकतो. असा खेळाडू संघात खूप उपयुक्त असतो. मी संघात उपकर्णधार देखील आहे. प्रत्येक संघात उत्तम फलंदाजी करणारे ६ किंवा ७ खेळाडू समाविष्ट केले जाऊ शकतात तर गोलंदाज हे परिस्थितीप्रमाणे ५ किंवा ४ असतात.

फलंदाजी करणे हे खूपच सरावाचे तंत्र आहे. हातात बॅट घेऊन चेंडूला टोलवणे हे फलंदाजाने करावयाचे असते. क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याचे प्रकार आहेत. फलंदाज जेथे उभा असतो त्यामागे यष्टी असतात. त्या यष्टीला जर गोलंदाजाने गोलंदाजी करताना बॉलने टिपले तर फलंदाज बाद ठरवला जातो.

फलंदाज पायचीत होणे, झेलबाद होणे, धावचीत होणे असे बाद होण्याचे प्रकार देखील या खेळात असतात. गोलंदाज एका षटकामध्ये ६ चेंडू टाकू शकतो. गोलंदाजी हे तंत्र एका विशिष्ट पद्धतीने विकसित करावयाचे असते. फिरकी आणि जलद असे दोन प्रकारचे गोलंदाज क्रिकेटमध्ये असतात.

आम्ही क्रिकेट खेळताना टेनिस बॉल वापरतो त्यामुळे अत्यंत कमी म्हणजे ८ ते १० षटकांचा सामना आम्ही खेळतो. आमच्या संघातील काही खेळाडू अत्यंत छान खेळतात. फलंदाजी करताना धावा जमवण्यासाठी धावपट्टीमध्ये पळावे लागते. क्रिकेट धावपट्टी ही २१ ते २२ मीटर असते.

फलंदाजाने चेंडू टोलवल्यानंतर धावपट्टीएवढे अंतर धावले की १ धाव आणि परत माघारी धावत आला तर दोन धावा, अशा धावा मोजल्या जातात. संपूर्ण मैदानाला गोलाकार सीमा असते. त्या सीमेपलिकडे जर चेंडू मैदानी टप्पा करत पाठवला तर ४ धावा आणि सरळ मैदानाबाहेर मारला तर ६ धावा पकडल्या जातात.

क्रिकेटमध्ये धावा जमवताना जर सर्व खेळाडू बाद झाले किंवा निर्धारीत षटके संपली तर विरूध्द संघ फलंदाजी करण्यासाठी उतरतो. फलंदाजी करताना अगोदर खेळलेल्या संघापेक्षा एक धाव जास्त जमवली की संघ विजयी ठरवला जातो आणि धावा समान झाल्या की सामना टाय (अनिर्णित) ठरवला जातो. सर्व सामना नियंत्रित करण्यासाठी आणि फलंदाज बाद ठरवण्यासाठी पंच असतात. त्यांचे निर्णय हे दोन्ही संघांनी मानायचे असतात.

सर्व नियम पाळून स्वतःला उत्तम खेळण्यास प्रवृत्त व्हावेच लागते. क्रिकेट म्हणजे एक प्रकारची लढाईच लढली जाते. जेथे फलंदाज हे बचाव आणि आक्रमण दोन्ही करत असतात तर गोलंदाज तर हे फक्त चेंडूचा व्यवस्थितरीत्या मारा करत असतात. दोन्ही संघांना फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी मिळत असते.

क्रिकेट खेळल्याने सांघिक वृत्ती, संयम, कौशल्य, नेतृत्व अशा गुणांचा एका वेळीच कस लागत असतो. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशी विविध कामे एका खेळाडूला करायची असतात. सामन्यात पराभूत झाल्यानंतर आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळते तर जिंकल्यानंतर मिळणारा आनंद हा गगनात न मावणारा असतो. त्यामुळे क्रिकेट हा खेळ मला खूपच आवडतो.

तुम्हाला माझा आवडता खेळ – क्रिकेट हा मराठी निबंध (My Favourite Game – Cricket Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment