राजमाता जिजाऊ मराठी माहिती ! Rajmata Jijau information in Marathi ।

संपूर्ण महाराष्ट्राचे पहिले छत्रपती, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा संपूर्ण जीवन परिचय या लेखामध्ये देण्यात आला आहे. चला तर मग पाहुयात राजमाता जिजाऊ मराठी माहिती (Jijamata information in Marathi) !

जिजाबाई शहाजीराजे भोसले – Jijabai ShahajiRaje Bhosale


• जीवन काल –
( १२ जानेवारी १५९८ – १७ जून १६७४ )

जिजाबाई या मराठा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे यांच्या मातोश्री होत. राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आणि त्यांचे जीवन हे पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्वा वरून कळून येते.

जिजाऊंचे वडील सिंदखेडचे लखुजी जाधव हे होते तर आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.

राजमाता जिजाऊंचा जन्म पौष पौर्णिमा शके १५२०, म्हणजेच १२ जानेवारी १५९८ सिंदखेडराजा, बुलढाणा येथे झाला. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

• जिजाऊंचा करारी स्वभाव – Nature of Rajmata Jijabai

जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांत एका प्रसंगावरून वैर निर्माण झाले होते.

एकदा एका पिसाळलेल्या हत्तीला नियंत्रित व पकडण्यासाठी २ सैन्य पथके तयार करण्यात आली होती. एका पथकाचे नेतृत्व लखुजी जाधव यांचा मुलगा दत्ताजीराव जाधव करत होता तर दुसऱ्या पथकाचे नेतृत्व शहाजीराजे भोसले यांचे बंधू शरीफजी भोसले हे करत होते.

या प्रसंगात दोघांची भांडणे झाली. या भांडणाचा परिणाम म्हणजे संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार मारले. परिणामी लखुजी जाधव यांनी संभाजी भोसले यांस ठार मारले. हे सर्व समजताच शहाजीराजे स्वतःच्या सासऱ्यावर समशेर घेऊन धाऊन गेले. या लढाईत शहाजीराजांच्या दंडावर जखम झाली.

या अशा अवघड प्रसंगानंतर, जिजाऊंनी आपल्या माहेरचे संबंध तोडले. सर्व नात्यांना बाजूला सारत कर्तव्य हाच आपला धर्म समजून शिवाजी राजांना योग्य प्रकारे वाढवण्यास सहयोग दिला.

हा असा प्रसंग कुठल्याही स्त्रीसाठी जीवन हेलावून ठेवणारा ठरला असता परंतु जिजाऊंनी आपल्या करारी आणि एकनिष्ठ स्वभावाने त्यावर मात केली.

• कौटुंबिक कर्तव्ये आणि राज्यकारभार – Rajmata Jijau Family and Social Work

जिजाबाई यांना पहिला मुलगा झाला त्याचे नाव संभाजी ठेवण्यात आले. नंतरचे ४ मुलगे लहानपणीच दगावले. त्यानंतर १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्त समयी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंना आणखी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी शिवाजी ठेवले.

जिजाऊंना एकूण ८ मुलं होती. त्यातील दोन मुलगे आणि सहा मुली होत्या. मोठा मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ होता तर लहान मुलगा शिवाजीराजे यांची जबाबदारी स्वतः जिजाऊनी घेतली होती.

पुण्याची जहागीर सांभाळण्याची जबाबदारी जिजाऊंनी घेतली, त्यावेळी शिवाजीराजे १४ वर्षांचे होते. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या आक्रमणामुळे पुणे अस्ताव्यस्त झाले होते.

अशा संकटसमयी दादोजी कोंडदेव आणि काही कुशल सहकार्‍यांसोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला. यातच शिवाजीराजांचे शिक्षण देखील चालले होते.

शिवाजी राजांना कसे घडवायचे याचे संपूर्ण ज्ञान जिजाऊंना होते. रामायण आणि महाभारतातील कथा जिजाऊ बाल शिवाजीला सांगत असत. महाभारतातील अनेक योद्ध्यांचे महात्म्य व त त्यांचे पराक्रम राजमाता जिजाऊ उत्तमरीत्या छत्रपती शिवाजींना समजावून सांगत.

राज्यकारभार आणि पुण्याची जहागीर सांभाळताना येणाऱ्या अडचणी, त्यावर केलेली मात हे गुण राजमाता जिजाऊंचा पुरस्कार करतात. काळाप्रमाणे नवनवीन संकल्प, राजकारण, डावपेच, सहकार या सर्व गोष्टी जिजाऊ पद्धतशीर हाताळत होत्या. या सर्व गुणांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्यात देखील पाहायला मिळतात.

राज्य करीत असताना सामान्य लोक, दीन – दुबळे यांचा आधार फक्त राजाच असतो. जात-पात आणि धर्म हा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याचा राजाच्या निर्णयात समावेश नसला पाहिजे.

सर्वधर्मसमभाव, रयतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे राजाचे प्रथम कर्तव्य असते. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणारे अधिकारी आणि सगेसोयरे हे लालसेने जर भांबावले तर खेळावे लागणारे राजकारण आणि कूटनीती हेदेखील राजासाठी किती महत्त्वाचे आहे असे बाळकडू राजमाता जिजाऊंनी राजे शिवाजी यांना लहानपणीच दिले.

याव्यतिरिक्त शस्त्रास्त्र अभ्यास, धर्म आणि बुद्धी विकास असे धडे देखील राजमाता जिजाऊंनी आपल्या कुशल सहकार्‍यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत राजे शिवाजी यांना दिले.

• जीवन कार्य – Jijamata Life Work

शहाजीराजे वेगवेगळ्या मोहिमेत आणि कर्तव्यात व्यस्त असत. शिवाजी महाराज देखील राज्यव्याप्ती मोहिमेवर जात असत. अशा वेळी जिजाऊ यांनी आपल्या सूना आणि त्यांची मुले यांची जबाबदारी घेतली.

राजे शिवाजी यांच्याप्रमाणे संभाजीराजांना देखील योग्य संस्कार दिले. राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा पूर्ण करण्यामागे राजमाता जिजाऊंचा खूप मोठा वाटा होता.

बजाजी निंबाळकर यांच्या मुलाला राजांची कन्या सखुबाई यांना देऊन एक राजकीय सोयरिक साधली आणि त्यांना पूर्णपणे धर्मात परत आणले. या संपूर्ण प्रकरणात त्यांची दूरदृष्टी, न्यायभाव, धर्म सहिष्णुता दिसून येते.

शहाजीराजांची सुटका, तोरणागड आक्रमण, अफजलखानाचा वध, आग्रा येथून सुटका अशा अनेक जीवघेण्या प्रसंगात राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन किती मोलाचे ठरले होते, हा इतिहास सर्वांना माहीतच आहे. छत्रपती शिवाजी स्वतः वेगवेगळ्या मोहीमेवर असताना स्वतः राजमाता जिजाऊ यांनी राज्यकारभार उत्तमरित्या सांभाळला होता.

• जीवन समाप्ती – Rajmata Jijau Death

“शिवाजी राजांचा राज्याभिषेक” हा विलक्षण सोहळा पाहून, महाराजांना ” छत्रपती ” बनल्याचे पाहून बारा दिवसांनी म्हणजे ज्येष्ठ कृ. ९ , शके १५९६, इ.स. १७ जून १६७४ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वतंत्र स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाऊंचे निधन झाले.

राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे दोन्ही छत्रपती घडवले. स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ध्यानी मनी सतत तेवत ठेऊन ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अशा या राजमातेस त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा!

राजमाता जिजाऊ मराठी माहिती (Jijamata information in Marathi) हा लेख तुम्हाला कसा वाटला? त्याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा! इतिहासकालीन लेखामध्ये संदर्भ लेखन असल्याने माहिती चुकीची आढळल्यास आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

1 thought on “राजमाता जिजाऊ मराठी माहिती ! Rajmata Jijau information in Marathi ।”

Leave a Comment