जशी दृष्टी तशी सृष्टी – मराठी निबंध | Jashi Drushti Tashi Srushti Nibandh |

प्रस्तुत लेख हा जशी दृष्टी तशी सृष्टी (Jashi Drushti Tashi Srushti Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. आपण जसे या जगाकडे पाहतो तसेच आपल्याला ते दिसत असते अशा आशयाचा हा निबंध अत्यंत मुद्देसूद स्वरूपात मांडण्यात आलेला आहे.

जशी दृष्टी तशी सृष्टी निबंध | Jashi Drushti Tashi Srushti Marathi Nibandh

दुनियेला सामोरे जाताना आपली दुनियेकडे बघण्याची नजर कोणती आहे हे खूप आवश्यक ठरते. आपल्या अनुभवातून आपण जर नकारात्मक दृष्टिकोन बनवत गेलो तर आपले संपूर्ण जीवनच नकारात्मक बनत जाते आणि दुनियेला आपण तशाच नजरेतून पाहत जातो.

जर आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपल्याला दुनिया तशीच दिसत असते. विधायक नजरेने आपण दुनियेला पाहिल्यास आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते. प्रत्येक कामात आपण उत्साही आणि आनंदी राहू लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील आपल्याला रस येऊ लागतो.

जर आपला दृष्टिकोन नकारात्मक असेल तर आपल्याला जीवनात सतत दुःख आणि कष्ट अनुभवात येत असते. आपण सातत्याने प्रत्येक व्यक्ती व परिस्थितीची तक्रार करू लागतो. आपण चांगले काय घडले त्यापेक्षा वाईट काय घडले याकडे लक्ष देऊ लागतो. मग आपल्याला तशी सवयच जडून जाते.

सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन या दोन उदाहरणांचा आपण दैनंदिन जीवनात अनुभव घेऊ शकतो. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहोत, तो व्यक्ती कोणकोणत्या प्रकारच्या गप्पागोष्टी करत असतो? त्यामध्ये आशावाद आणि विधायक ऊर्जा जाणवते का? की सतत तक्रार आणि दुःख जाणवते?

आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना आपण विधायक ऊर्जेने जर भारलेले असू तर आपल्याला जीवन हे आनंदाची पर्वणीच जाणवेल. त्यासाठी जीवनातील बऱ्या – वाईट प्रसंगांसाठी तयार राहणे अत्यावश्यक ठरेल. त्यानंतरच आपण आपली वागणूक कशी आहे ते पाहू शकतो.

विधायक दृष्टिकोन ठेवून सातत्याने कर्म करत राहिल्यास आपली जीवनाकडे आणि इतर सर्वत्र पाहण्याची नजरच वेगळी असते. एखाद्या समस्येकडे आपण दुर्लक्ष करून जगू शकतो आणि दुसऱ्या बाजूने ती समस्या आनंदी मनाने सोडवून जीवनाचा अनुभव प्रगाढ बनवू शकतो. यामध्ये आपली निवड काय असेल यावरून आपल्या जीवनाची गुणवत्ता लक्षात येत असते. 

इतरांच्या आणि स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची आपली नजरच आपले मूल्य राखून असते. त्यामुळे आपल्या नजरेचे मूल्य कमी होऊ न देता ते वाढवत नेणे हाच जीवन उत्तम प्रकारे जगण्याचा सर्वोत्तम पर्याय असतो. आपल्या जीवनाचे खोल निरीक्षण करून आपला स्वभाव कसा आहे ते प्रथमतः ओळखणे गरजेचे आहे.

आपल्याला स्वतःचे जीवन हळूहळू कळू लागले की इतरांचे जीवनही कळू लागते. नकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणे किती त्रासदायक असते याची जाणीव देखील होऊ लागते. त्या जाणिवेतून आपण आपली दृष्टी हळूहळू विधायक बनवू लागतो. मग जशी दृष्टी तशी सृष्टी या उक्तीचा अनुभव आपण घेऊ लागतो.

तुम्हाला जशी दृष्टी तशी सृष्टी हा मराठी निबंध (Jashi Drushti Tashi Srushti Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment