शालेय निबंध स्पर्धा किंवा परीक्षेत हमखास या विषयावर निबंध लिहायला लावतात. हा निबंध मुद्देसूद लिहावा लागतो. काही ऐतिहासिक संदर्भ द्यावे लागतात त्यामुळे निबंध लिहताना थोडी काळजी घेतलेली बरी. चला तर मग बघुया स्वातंत्र्यदिन या विषयावर निबंध लेखन!
Independence day Marathi Nibandh | स्वातंत्र्यदिन – मराठी निबंध
स्वातंत्र्यदिन हा भारतात सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे महत्व खूप मोठे आहे. आज आपण स्वतंत्रपणे चालत आहोत, काम करत आहोत, आपल्यावर कोणतेही बंधन नाही याचे सर्व श्रेय स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी असलेल्या क्रांतिकारकांना आणि समाजसुधारकांना आहे.
ब्रिटिश सरकारकडून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्याच दिवसाचा जयघोष आणि सर्व क्रांतिकारकांना मानवंदना म्हणून हा दिवस साजरा केला जातो. प्रेरणा आणि साहस प्राप्त करावयाचे असल्यास आपल्यावर असलेली बंधने सर्वात अगोदर झुगारून द्यावी लागतात. अशाच विचाराने तब्बल १५० वर्षे जो लढा चालू होता त्या लढ्याला अखेर याच दिवशी यश प्राप्त झाले होते.
महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात विशिष्ट पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो. सकाळी पहाटे उठून नवीन पोशाख परिधान केला जातो. समाजातील सर्वजण एकत्र येतात. भारतीय तिरंगा झेंडा सरकारी कार्यालयात, शाळेत, ग्रामपंचायतीत, शहरी वस्तीत मोठ्या उत्साहात फडकवला जातो.
सकाळपासूनच या दिवशी एक नवीन उत्साह सर्वांच्या मनी असतो. शालेय विद्यार्थी शाळेत छोटे झेंडे घेऊन जातात. विविध देशभक्तिपर गीते गायली जातात. सूचना आणि घोषणा दिल्या जातात. त्यानंतर प्रभात फेरीला सुरुवात होते. पूर्ण परिसरातून प्रभात फेरी काढल्यानंतर सर्व विद्यार्थी, पालक वर्ग, नागरिक शाळेत एकत्र जमतात.
राष्ट्रगीत एकदम निष्ठेने गायले जाते. सावधान – विश्राम या सूचना दिल्या जातात. झेंड्याला मानवंदना दिली जाते. एका विशिष्ट मान्यवर व्यक्तीकडून झेंडा फडकवला जातो. त्यानंतर समूहगीत सादर केले जाते. देश आणि समाजाप्रती कर्तव्य निष्ठा सांगितली जाते.
स्वातंत्र्यदिनी विविध स्पर्धा आणि उपक्रम सादर केले जातात. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य, वादन, गायन याद्वारे स्वातंत्र्यदिन आणखीनच उत्कृष्ट बनवला जातो. अशा उपक्रमांमध्ये पूर्ण स्वातंत्र्यकाळ उलगडला जातो. स्वातंत्र्यवीर, क्रांतीकारक व समाजसुधारक यांचा जीवनपट विविध कलेद्वारे सादर केला जातो.
स्वातंत्र्यदिनाची सांगता म्हणून गुणवंत आणि उपक्रमशील विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. लहान मुलांना खाऊ वाटप केला जातो. सर्वांच्या घरी गोड मिठाई खाल्ली जाते. त्यामध्ये जिलेबी आणि पापडी – फरसाण यांचा समावेश असतो. सायंकाळी झेंडा उतरवला जातो. पूर्ण एक दिवस देशभक्ती, प्रेरणा आणि एकता यांचा अनुभव सर्वांना होत असतो.