कौटुंबिक नाती जपताना…. | How to Grow family Relations |

वयाची जेमतेम तीस वर्षे पूर्ण होताना भविष्य आणि भूतकाळ कसा एकमेकांशी निगडित आहे हे कळत होतं. कुटुंबात एकत्र जगलेले क्षण, प्रेमपूर्ण सहवास, स्नेहपूर्ण वातावरण आणि त्यातून निर्माण झालेला भावनिक बंध यामुळे जीवन कसे उन्नत होत जाते आणि एखादी वितुष्टता निर्माण झाल्यास कौटुंबिक वातावरण कसे बिघडते हेही जाणवू लागले होते.

असंस्कारी विचार हे नुसतेच घोळ निर्माण करतात. असे व्यक्तिगत विचार हे कुटुंबासाठी कधीच हितावह नसतात. कुटुंबात राहताना आणि समाजात वावरताना आपल्या वागण्यात फरक असला पाहिजे. त्यासाठी तर्क आणि भावना यातील फरक लक्षात घ्यावा लागेल.

कुटुंबात राहताना, नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याशी वागताना भावनिक बंध जपता आला पाहिजे. त्यावेळी आपलेपण जाणवले पाहिजे. याउलट समाजात वावरताना व स्वतःचे काम प्रामाणिकपणे करताना मात्र फायदा – तोटा, तर्कशुद्ध विचार हे अग्रगण्य असलेच पाहिजेत.

सर्वांना समजून घेण्याचा मुद्दा एवढाच आहे की, कौटुंबिक वातावरण आणि कामाचे वातावरण यामध्ये जर रसमिसळ झाली तर भावनिक बंध नीट जुळले जात नाहीत आणि त्याचा कामावर आणि कुटुंबावर दोन्हीवर परिणाम होतो.

कुटुंब आणि काम – वागण्यातील फरक !

सतत विचार करण्याची प्रक्रिया ही स्वतःच्या कामात दाखवली पाहिजे तर कुटुंबात आल्यावर तार्किक गोष्टी करूच नये. कुटुंबात राहताना स्नेह आणि प्रेम ही भावना असली पाहिजे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना त्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे. कामाचा ताणतणाव आणि स्वार्थ हा कुटुंबात नसला पाहिजे.

सामाजिक वातावरणात व कामात उगीच भावनिक होऊ नये. त्याचा परिणाम कामावर होत असतो. काम करताना तुम्हाला माहीत असते की कामाचा उद्देश्य काय आहे? तो उद्देश्य स्वतःशी प्रामाणिक राहून आणि इतरांना त्रास न देता पूर्ण करता आला पाहिजे. तरच ते कामही व्यवस्थित पूर्ण होईल आणि त्याचा त्रागा करावा लागणार नाही.

नकारात्मक विचार आणि भावनांचा परिणाम –

नाती बिघडताना एका दिवसात बिघडत नाहीत. अनेक वर्षांपासून त्यावर नकारात्मक विचारांचा आणि भावनांचा पगडा तयार झालेला असतो. त्यांचा व्यवस्थित निचरा न झाल्याने त्या भावना मनात तशाच घर करून राहतात आणि एका क्रोधाच्या क्षणी बाहेर उफाळून येतात. त्या क्रोधासाठी समोरचा व्यक्ती कारणीभूत नसतो तर स्वतःचे विचार आणि भावनाच कारणीभूत असतात.

आता उदाहरण म्हणून जर आपण कौटुंबिक कलह विचारात घेतला तर असे कळेल की, आपल्याला कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत नसतो त्यामुळे त्याच व्यक्तीचे वागणे आपल्याला खुपत असते. जर व्यवस्थित त्यावर चर्चा झाली नाही, तर त्या व्यक्तीविरुद्ध सुरुवातीला मनातून विरोध होतो. तोच विरोध कोणापाशी तरी बोलून दाखवला जातो आणि नात्यात वितुष्टता निर्माण होते.

मग एखादे साधे कारणही भांडणासाठी पुरेसे ठरते. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची भांडणे ही संपूर्ण कौटुंबिक वातावरण बिघडवून टाकतात. त्याचा त्रास स्वतःला तर होतोच शिवाय लहान मुलांच्या मनात देखील मोठ्या व्यक्तींबद्दल आपुलकी राहत नाही. मग पुढील पिढीसाठी आपण शत्रुता संस्कारित करत जातो.

या सर्व बाबींवर उपाय म्हणून आपण पुढील गोष्टींचा विचार करू शकतो!

कुटुंबाची एकत्र जगण्याची प्राधान्यता ठरवणे.

सर्वांनी मिळून आणि ठरवून काम करणे. कोणावरही अतिरिक्त कामाचा दबाव येऊ न देणे.

सर्वांबद्दल आपुलकी, आदर आणि नवल वाटणे.

असे असेल तर नाते कधीच जुनाट वाटणार नाही आणि दिवसेंदिवस माणूस म्हणून आपण कुटुंबासह प्रगती करत जाऊ…

Leave a Comment