विधायक सूचनांचे परिणाम | Effects of Positive Affirmations in Marathi ।

मनुष्याचे जीवन म्हणजे स्वतःलाच दिलेल्या सूचनांचा परिणाम आहे. मनुष्य आपले स्वतःचे कर्म स्वतः करतच असतो परंतु अनेकवेळा असे जाणवते की त्याला त्याच्या सभोवताली असणारी परिस्थिती किंवा व्यक्ती त्रासदायक ठरू शकतात. मानसिकदृष्ट्या स्थिर असलेला व्यक्तिदेखील इतरांच्या सततच्या तक्रारीने चिंताग्रस्त होऊ शकतो.

इतरांच्या तोंडावर आपण लगाम तर ठेऊ शकत नाही परंतु स्वतःची आंतरिक स्थिती काही अशा प्रकारे बनवू शकतो की इतरांच्या बोलण्याचा त्रास आपल्याला होणार नाही. त्याची सुरुवात आपल्याला काही सूचना देऊन करावी लागेल. या सर्व सूचना स्वतःच स्वतःला द्यायच्या आहेत.

या सूचना काही विधायक स्वरूपाचे विचार आहेत जे वारंवार पुनरुक्त केल्याने तुम्हाला मानसिक स्थिरता लाभेल आणि स्वतःचे इच्छित काम नक्की पूर्ण करू शकाल. खाली दिलेले विचार आहेत तसे पाठ करा किंवा लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी त्यांचा संदर्भ तुम्हाला रोजच्या जगण्यात येईलच!

सूचना १

ज्याला जे करायचं आहे ते तो करतोच आणि त्याचे परिणामही भोगतो.

हा विचार इतरांच्या बाबतीत जेवढा सत्य आहे तेवढा स्वतःच्या बाबतीतही सत्य आहे. कोणी काहीही सांगितले तरी आपण आपल्या मनाप्रमाणेच जगत असतो किंवा कृती करत असतो.

आपले पूर्वसंस्कारच एखाद्या कृतीची दिशा ठरवत असतात. तसेच विचार वारंवार आपल्या मनात येत राहतात. त्यामुळे आपल्या सभोवती कुठलाही व्यक्ती जे काही करत असेल. त्याची जबाबदारी वैयक्तिक त्याचीच असते. त्यामुळे त्याचे कर्म तुम्ही निर्धारित करू शकत नाही. त्यामुळे त्याच्या बोलण्याचा आणि कर्माचा तुम्ही विचारदेखील करणे चुकीचे आहे.

या सुचनेने दुसऱ्या व्यक्तीला काही फरक पडणार नाही पण तुमची आंतरिक विचाराची दिशा मात्र तुमच्या ध्येयावर स्थिर राहील. ही सूचना स्वतःच्या बाबतीतही तेवढीच खरी आहे. आपल्या कर्मानुसारच आपण परिणाम भोगत असतो त्यामुळे जे काही करणार त्याचे दृश्य किंवा अदृश्य परिणाम इतरांवर आणि स्वतःवर होत असतात.

सूचना २ –

आपल्या मनासारखं काहीही घडत नाही त्यामुळे फक्त आनंदी राहणे आपल्या हातात आहे.

ही सूचना तुमचे पूर्ण जीवन बदलून टाकू शकते. प्रत्येक क्षणी आपले मन काहीतरी मागत असते, काहीतरी इच्छा व अपेक्षा करत असते. तशी इच्छा करणे चुकीचे नाही परंतु इच्छा जर पूर्ण झाली नाही तर निराशा हाती येते आणि ती जर पूर्ण झाली तर आणखी इच्छा तयार होते.

ती इच्छा किंवा अपेक्षा जर स्वतःकडून असेल तर आणखी इच्छा तयार होऊ शकते. त्याचा शेवट कधी असणार. कधीतरी अशी वेळ येईल जेव्हा इच्छा अपुरी राहील त्यामुळे इच्छा करण्यात आणि ती पूर्ण करण्यात स्वतःची खूप सारी उर्जा आणि वेळ खर्च झालेला असेल.

आता उदाहरण दुसऱ्याकडून अपेक्षा करण्याचे! दुसरा व्यक्ती कितीही तुमच्या जवळचा असेल तरी त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे त्याचे आणि तुमचेही स्वातंत्र्य हिरावल्यासारखे होईल. म्हणजे तुमचे सुख त्याच्यावर अवलंबून आणि त्याचे सुख तुमच्यावर! अशाने एकमेकांना बंधनात अडकवल्यासारखे वाटेल.

याउलट तुम्ही जर स्वतःहून आनंदी राहायला शिकलात तर इतरांकडून अपेक्षा न ठेवता आणि स्वतःही व्यर्थ इच्छा न करता स्व उत्स्फूर्त जगाल ज्यातून आनंदी तर व्हालच आणि इतरांनाही आनंद वाटू शकाल. सतत हसत खेळत जीवन जगाल.

हा विचार तुम्हाला संपूर्णपणे वर्तमान क्षणात घेऊन येईल ज्याद्वारे तुम्ही स्वतःसाठी योग्य असे कर्म निवडू शकाल आणि योग्य कृतीच तुमच्या हातून घडेल.

सूचना ३ –

आपले जीवन हे संपूर्णपणे आपल्या विचारांचा, कृतींचा आणि सवयींचा परिणाम असतो.

लहानपणापासून तुम्हाला असलेल्या सवयींचा पाठपुरावा करा. त्याची नोंद करा. त्यावर काही वेळ विचार केल्यावर कळेल की आपण जसे आज आहोत तो त्या सवयींचा परिणाम आहे आणि भविष्यात जसे असू तो देखील आत्ता असलेल्या सवयींचा परिणाम असणार आहे.

अगोदरपासून तुम्ही फक्त असजगपणे कृती केलेली आहे. त्यामुळे आत्ता जर कुठली वाईट सवय असेल आणि परिणामही भोगत असाल तर ती सवय बदलणे एकदम सहज शक्य आहे.
परंतु लक्षात ठेवा की, सवयी या काही एका दिवसात तयार होत नाहीत आणि एका दिवसात तुम्ही त्या बदलूही शकत नाही.

त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पाया असतो तो म्हणजे विचार! जसे आपल्याला जीवन हवे आहे त्या पद्धतीचे विचार करायला सुरुवात करा. त्या विचारांची पुनरुक्ती करा. काही दिवसांतच तशी कृती देखील व्हायला सुरुवात होईल आणि सततची कृती ही सवयीत बदलेल.

सूचनांचा उपयोग –

• रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पुनरुक्त करणे.

• क्लेशदायक प्रसंग उभा राहिल्यास तिन्ही सूचना विचारात आणणे.

• इतरांचे वागणे अथवा बोलणे बरोबर की चुकीचे हे ठरवण्यात वेळ दवडण्यापेक्षा स्वतःच्या कामात लक्ष केंद्रित करून तीन सूचना मनातल्या मनात घोळवणे.

तुम्हाला हा लेख आवडल्यास नक्की त्याचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Comment