मी उन्हाळ्याची सुट्टी कशी साजरी केली (How I Spent My Summer Vacation Essay) या विषयावर निबंध लिहताना विद्यार्थ्यांनी मुक्तहस्त लिखाण करावे असे अपेक्षित असते. काल्पनिक विस्तार व घडलेल्या खऱ्याखुऱ्या घटना यांचे योग्य विश्लेषण अशा प्रकारच्या निबंधात करावयाचे असते. उन्हाळ्याची सुट्टी हा निबंध कसा लिहायचा याचे योग्य मार्गदर्शन तुम्हाला हा निबंध वाचल्यावर मिळेल.
How I Spent my Summer Vacation Essay In Marathi |
उन्हाळा म्हणजे सुट्ट्याच! उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीच असते. वर्षभर शाळा आणि क्लासेस करून विद्यार्थी पुरता थकून गेलेला असतो. त्याचा कंटाळा जाऊन नवा उत्साह संचारित होण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी कामी येते. उन्हाळ्याची सुट्टी नुसती झोपून घालवण्यापेक्षा आणि सूर्याला, उन्हाला दोषणे देण्यापेक्षा मी नवनवीन कला आणि खेळ शिकून ती व्यतित करू शकतो, असे मी यावेळी ठरवले.
या उन्हाळ्यात जरा जास्तच खेळायचे, पोहायला शिकायचे आणि खूप मज्जा करायची, असा विचार करतच शेवटचा परीक्षेचा पेपर दिला आणि उड्या मारतच घरी पोहचलो. सर्वप्रथम वेळापत्रक तयार केले. सर्व उन्हाळ्यात काय काय करायचे याचे नियोजन देखील केले. माझा छोटा भाऊ आणि मी दोघे मिळून हे सर्व करत होतो. दोघांच्या सहमतीनुसार आणि वडिलांच्या मान्यतेने आम्हाला दिवसभर खूप ठिकाणी फिरायला मिळणार होते.
एप्रिल महिन्यातच आम्ही मामाच्या गावी गेलो. तेथे मला मामाने पोहायला शिकवले. मी रोज दोन तास मनमुराद पोहायचो. पोहणे मला खूप आवडू लागले. अशातच तेथे रानात फिरणे आणि रोज नवीन गोष्टी ऐकणे असा रोजचा कार्यक्रम होता. मामाच्या गावी गेल्यावर वडील सोबत नसल्याने आमच्यावर बंधन घालणारे कोणीच नव्हते. तेथे आम्ही
खूपच खेळलो आणि बागडलो.
रात्री घराबाहेर झोपण्यात तर खूपच मज्जा यायची. दहा दिवस राहिल्यावर आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो. या उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे मी पोहायला शिकलो. मला अगोदर पोहायची खूपच भीती वाटायची पण आता मी पोहण्यात पटाईत झालो आहे. आमच्या शेजारी एक छोटी विहीर आहे तेथे आता आमची दररोज अंघोळ असायची.
क्रिकेट खेळणे हा तर आमचा नित्यक्रम!क्रिकेटमध्ये रोज नवीन बाबी शिकत राहणे एवढेच माझे काम असायचे. मी मोबाईलवर क्रिकेटचे व्हिडिओ पाहायचो. नवनवीन क्रिकेट खेळण्याचे तंत्र आणि कौशल्य विकसित करत होतो. माझे वडील हेदेखील क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत त्यामुळे त्यांच्यातर्फे थोडासुद्धा विरोध नसतो.
सकाळी पोहणे, त्यानंतर जेवण झाल्यानंतर कॅरम आणि सायंकाळी क्रिकेट असा संपूर्ण दिवस हा खूपच मज्जा करत निघून जातो. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी भरपूर आंबे खाल्ले. दुपारी मी भरपूर जेवत होतो. दुपारी जेवणात दही आणि कोशिंबिरीचा स्वाद तसेच जेवण झाल्यानंतर लस्सी! म्हणजे स्वर्गच प्राप्त झाल्याचा आनंद व्हायचा.
मामाच्या गावी गेल्यावर आणि क्रिकेट खेळताना मी खूप नवनवीन मित्रदेखील बनवले. या वेळी आणखी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे संगणक! आमच्यात संगणक नाहीये पण शेजारी राहणारा नवीन मित्र केतन, त्याने मला थोडा थोडा संगणक वापरायला शिकवले आहे. पोहणे, क्रिकेट, कॅरम, संगणक यातच माझी सुट्टी अत्यंत आनंदात साजरी झाली.
उन्हाळ्याची सुट्टी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतो. मी माझी उन्हाळ्याची सुट्टी कशी साजरी केली (How I Spent My Summer Vacation Essay) या निबंधाचा तुम्ही संदर्भ घेऊन तुमची सुट्टी योग्य त्या शब्दात मांडू शकता. तुम्हाला हा निबंध आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…