प्रस्तावना –
होळी हा संपूर्ण भारतात उत्साहात आणि आनंदात साजरा केला जाणारा सण आहे. फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेपासून फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा सण साजरा केला जातो. या सणाला साजरे करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. होळी, धुळवड, रंगपंचमी असे काही प्रकार आहेत ज्याद्वारे तीन ते पाच दिवस हा सण साजरा केला जातो. तसेच या सणाला शिमगा, फाग, दोलायात्रा, कामदहन, हुताशनी महोत्सव, होलिकादहन अशी वेगवेगळी नावे आहेत.
Essay on Holi in Marathi | निबंध : माझा आवडता सण – होळी !
महाराष्ट्राला खूप वर्षांपासूनची सांस्कृतिक परंपरा आहे. होळीच्या दिवशी लाकडे, शेणकुटे, आणि नैवेद्य एका मोठ्या कुंडात किंवा सार्वजनिक ठिकाणी जाळली जातात. सर्व समाज एकत्र येऊन नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. अर्पण झाल्यानंतर प्रदक्षिणा घालत बोंबा मारण्याची खूपच वेधक पद्धत महाराष्ट्रात आहे. लहान मुले तर या दिवशी खूपच आनंदी असतात. घरात गोडधोड जेवण आणि नवीन कपडे घालून दिवसभर मस्त आनंद लुटतात.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. काही ठिकाणी धुळवड, धुलवड असे शब्द वापरले जातात. या दिवशी सर्वजण एकत्र येऊन गुलाल उडवतात आणि एकतेचे प्रतीक आणि बंधुभाव म्हणून हा दिवस साजरा करतात. महाराष्ट्रात पूर्णपणे शेतकी इतिहास आहे. आपल्या इष्ट देवतेला या दिवसात निघालेले पीक अर्पण करण्याची प्रथा आहे. शेतकरी या दिवशी गव्हाच्या ओंब्या प्रदान करतो.
होळी सणामागे अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. यामध्ये होलिका, ढुंढा, पुतना यासारख्या राक्षसींच्या वधाच्या कथा समाविष्ट आहेत. होळी सणाच्या आसपास सांस्कृतिक अधिष्ठान देखील केले जाते. या सणामध्ये अग्नीचे महत्व खूप आहे. अग्निमध्ये ज्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्यांचे दहन करणे हे प्रामुख्याने कर्तव्य केले जाते.
पौराणिक कथेनुसार होलिका राक्षसी हिरण्यकशपूच्या सांगण्यानुसार भक्त प्रल्हाद याला मारण्यासाठी आलेली असते. भक्त प्रल्हाद हा मोठा विष्णूभक्त बालक असतो. हिरण्यकशपुला त्याची भक्ती मान्य नसते. फक्त या कारणाने त्याला मारण्यासाठी होलिकाला बोलवतो. होलिका राक्षसीला अग्नी मारू शकणार नाही असे वरदान प्राप्त असते. त्यामुळे भक्त प्रल्हादाला ती घेऊन अग्नीत प्रवेश करते परंतु भक्त प्रल्हादाला काहीच होत नाही आणि होलिकेचे मात्र दहन होते.
माणूस त्याला जे नैसर्गिकरित्या प्राप्त आहे त्याबद्दल वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करत आला आहे. त्यामुळे या सणाला पूर्ण देशभरात वैविध्यपूर्ण सांस्कृतिक आणि नैसर्गिक भावना जोपासल्या जातात. धार्मिक आधारही देण्याचा प्रयत्न काही ठिकाणी दिसून येतो. सार्वत्रिक एकच गोष्ट सामाईक दिसते ती म्हणजे अग्नीपूजन! अग्नीपुजन करताना आपल्या जगण्यातल्या गोष्टी अर्पण करणे आणि त्याला सांस्कृतिक आधार दाखवणे त्यामधून आनंदाची प्राप्ती होणे असे या सणाचे महत्त्व सांगता येईल.
आदिवासी लोक हा उत्सव गुलाल उधळून, ढोलाच्या आवाजावर नृत्य करून साजरा करतात. घरापुढे, घरातील भिंतींवर पूर्णपणे नक्षीकाम करून घरातील स्वच्छता पार पाडून सर्व आदिवासी समाज एकत्र हा सण साजरा करतात. कोकणात या सणाला शिमगा असे म्हटले जाते. शेतीची सर्व कामे या दरम्यान संपलेली असतात. त्यामुळे हा सण कोकणात पाच ते पंधरा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळी आणि धुळवडीनंतर रंगपंचमी खेळली जाते. लहान मोठे सर्वजण विविध प्रकारचे रंग घेऊन एकमेकांना लावतात आणि आनंद साजरा करतात.