प्रस्तुत लेख हा आरोग्य शिक्षण (Health Education Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात शारिरीक व मानसिक आरोग्य शिक्षणाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करायचे असते.
आरोग्य शिक्षण – गरज आणि महत्त्व | Arogya Shikshan – Marathi Nibandh |
सध्या जगभरात बहुसंख्य लोक शारिरीक आणि मानसिक व्याधींनी त्रस्त आहेत. प्रत्येकाला कोणती ना कोणती आरोग्याची समस्या भेडसावत आहे. त्यावर जे उपाय आपण सध्या करत आहोत ते तात्पुरते आणि वरवरचे निदान आहे. जर भविष्यात एक सक्षम आणि कणखर व्यक्ती म्हणून जगायचे असल्यास प्रत्येकाला आरोग्य शिक्षणाची गरज आहे.
शिक्षणाचा प्रत्यय जसा आपल्याला जगताना येत असतो. त्यापद्धतीनेच एक अशी शिक्षण प्रणाली आपण राबवू शकतो ज्यामध्ये आरोग्याच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होऊ शकतील. अशा शिक्षणात अनुभवावर आधारित असणारे उपक्रम राबवून एका व्यक्तीला अथवा विद्यार्थ्याला आपण आरोग्याचे महत्त्व पटवून देऊ शकतो.
सध्या आरोग्य शिक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. आरोग्य म्हणजे काय आणि स्वस्थ व निरोगी जीवनाच्या मूलभूत संकल्पना काय आहेत या बाबी समजणे आवश्यक आहे. तसेच आपले शरीर आणि मन आपण स्वस्थ कसे काय ठेवू शकतो याबाबत देखील प्रयत्नशील असायला हवे.
सध्या मेडिकल दुकाने आणि दवाखाने वाढण्यामागचे कारणच हे आहे की आपली जीवनशैली बदलली आहे आणि आपण तसे का जगत आहोत हेही बहुतांश लोकांना माहीत नाहीये. आपल्याला माहीत असलेले वैद्य आणि डॉक्टर हे आजारी पडल्यावर त्याचे निदान करतात. आजारी पडूच नये म्हणून काही उपाययोजना राबवत नाहीत.
अशा सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेऊन आरोग्य शिक्षणाची सुरुवात होणे गरजेचे आहे.
लहानपणापासूनच शाळेत एक उपक्रमशील असा आरोग्याशी निगडित विषय शिकवला जाणे गरजेचे आहे. त्या विषयाला प्रत्येक इयत्तेत समाविष्ट करणे देखील अत्यावश्यक आहे.
दैनंदिन स्तरावर खेळ, व्यायाम आणि शारीरिक कष्ट अशा गोष्टींचा जीवनात समावेश करणे, तसेच चांगल्या पुस्तकांचे वाचन, चांगल्या मित्र मैत्रिणींची संगत आणि प्रत्येकाच्या निर्मितीक्षम विचार प्रक्रियेला चालना देणे असे काही उपक्रम असू शकतील ज्याद्वारे आपण विद्यार्थ्याचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतो.
पाश्चिमात्य देशात जी रोग निदान प्रक्रिया निर्माण झाली ती फक्त आणि फक्त सूचक आहे की जगात किती रोग निर्माण झालेले आहेत. आजारांना कारणीभूत असणाऱ्या जीवनशैलीवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करत नाही, अथवा तसे आजार होऊच नयेत यासाठी देखील कोणी प्रयत्नशील नसते.
आजची आरोग्याची संकल्पना ही चुकीची वाटते. नियमित तपासण्या आणि औषधे घेत राहणे म्हणजे आरोग्यदायी राहणे नाही तर आळशी स्वभाव निर्मित न होणे, आजारी पाडणाऱ्या सवयी लावून न घेणे, व्यसन न करणे, नैतिक मूल्ये अंगीकारणे, अशा काही बाबींची समज आणि कृती निर्माण होणे म्हणजेच आरोग्य प्राप्ती करणे होय.
उपचारापेक्षा काळजी बरी! या उक्तीप्रमाणे आजार बरे करण्यापेक्षा आजार होऊच नयेत यासाठी आपण आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात काय मूलभूत बदल घडवून आणू शकतो, याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. मग त्या दिशेने प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षित करणे हाच उपाय सर्वोत्तम आहे.
तुम्हाला आरोग्य शिक्षण हा मराठी निबंध (Health Education Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…