खेड्यातील जीवन – मराठी निबंध | Khedyatil Jivan Marathi Nibandh |

खेड्यातील जीवन हा निबंध लिहताना विद्यार्थ्यांना खेड्यातील, निमशहरी भागातील जीवन कसे असते याची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे.

खेडे म्हणजे काय तर विरळ लोकसंख्या असलेली वस्ती वर्षानुवर्षे एका ठिकाणी एकत्र राहत असते. त्यांचे राहणीमान, सुविधा, फायदे, तोटे अशा सर्व बाबींची सविस्तर चर्चा खेड्यातील जीवन (khedyatil Jivan Marathi Nibandh) या निबंधात करायची असते.

गावाकडील आयुष्य / खेड्यातील जीवन – निबंध | Indian Village Life Essay In Marathi |

निश्चित आणि सीमित उपजीविका सांभाळत जगत राहणे हेच खेड्यातील जीवनाचे गुपित आहे. खेड्यात लोकसंख्या विरळ असल्याने भौतिक सुविधा विकसित करणे शक्य होत नाही. परंतु शांत आणि संयमित जीवनाची अपेक्षा आपण खेड्यातील जीवनात करू शकतो.

शेती, पशुपालन, आणि लघु उद्योग करीत खेड्यातील सर्व लोक आपापली उपजीविका चालवत असतात. कसदार जमीन, स्वच्छ पर्यावरण, हवा, झाडे आणि पशुपक्षी अशा घटकांच्या नियमित संपर्कात असल्याने खेड्यातील व्यक्ती निसर्गाशी जोडला गेलेला असतो.

भारत अजूनही खेड्यांत वसलेला आहे असे म्हटले तरी काही हरकत असणार नाही. कारण कृषिप्रधान देश असल्याने जमीन कसणे हे काही शहरी भागांत होऊ शकत नाही. खेड्यात एक शेतकी संस्कृती वसलेली आहे ज्याद्वारे मनुष्य आपल्या मातीशी बांधला गेला आहे.

खेड्यातील जीवन निवांत असते. खेडेगाव म्हणजे अल्पशा लोकांची वस्ती असल्याने तेथे जीवनाची व्यर्थ आपाधापी आढळत नाही. कामात आणि राहणीमानात बुध्दीचा वापर जास्त नसल्याने नैसर्गिकरित्या ते जगत असतात.

शेती हेच खेड्याकडे प्रमुख उपजीविकेचे साधन आहे. ज्यांच्याकडे शेतजमीन नाही ते शेतीशी निगडित जी जी कामे आहेत त्यावर स्वतःची उपजीविका चालवतात. काही लोक पाळीव प्राणी जसे की गाय, बैल, शेळ्या, म्हैशी, कोंबड्या असे प्राणी सांभाळतात.

दुग्ध व्यवसाय हा खेड्यातील प्रमुख व्यवसाय आहे. जनावरे पाळून म्हैस, गाय आणि शेळी यांचे दूध विकून लोक अर्थार्जन करतात. शेतीची अवजारे, शेतमाल, खते – बियाणे अशा बाबींच्या संबंधित व्यवसाय देखील खेड्यात चालतात.

खेड्याकडे सध्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते. विविध प्रकारची शेतकी यंत्रे आणि ट्रॅक्टरद्वारे शेती केली जाते. जवळजवळ प्रत्येक तालुक्यात धरणे, पाटबंधारे असल्याने शेतीसाठी कॅनलद्वारे बारा महिने पाणी उपलब्ध होत आहे.

खेड्याकडे आपल्याला सध्या अनेक प्रकारचे बदल पहावयास मिळत आहेत. आज गावोगावी रस्ता, वीज, पाणी उपलब्ध झालेले आहे. दळणवळण आणि प्रवासाची सोय देखील झालेली आहे. इंटरनेट देखील गावोगावी पोहचल्याने मोबाईल, कम्प्युटर्स वापरणे सहज शक्य झालेले आहे.

पर्यावरण पूरक आणि स्वच्छ वातावरणात राहण्याचा ज्यांचा उद्देश्य आहे त्यांनी खेड्यात जरूर जीवन व्यतित करावे. एकदा शारीरिक कष्टाची सवय लागली की शरीराबरोबरच मानसिक स्थिती सुधारते आणि आनंदप्राप्ती होते. त्यामुळे खेड्यातील जीवन कष्टप्रद वाटत असले तरी तीच एका शांत आणि संयमी जीवनाची सुरुवात आहे.

तुम्हाला खेड्यातील जीवन हा मराठी निबंध (Khedyatil Jivan Marathi Nibandh)
आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment