गुढीपाडवा – मराठी माहिती | Gudhi Padava Mahiti Marathi |

प्रस्तुत लेख हा गुढीपाडवा (Gudhi Padava Mahiti Marathi) या सणाविषयी माहिती देणारा लेख आहे. या लेखात गुढी पाडवा या सणाचे महत्त्व आणि तो कसा साजरा केला जातो हे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

गुढीपाडवा सण – माहिती मराठी | Gudhi Padava Information In Marathi |

गुढीपाडवा सणाचे महत्त्व

• हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा ओळखला जातो. गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला असतो. पारंपरिक पद्धतीने हा सण भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो.

• गुढी पाडवा हा दिवस म्हणजे शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे. कुठल्याही क्षेत्रातील विजयाचे प्रतीक म्हणून आपण सर्व गुढी उभारतो. घरातील संपन्नता, समृद्धी कायम टिकून राहावी असा यामागचा उद्देश आहे. या दिवशी सर्वजण विविध प्रकारच्या वस्तू,वाहन, सोने खरेदी करतात तसेच नवीन कामाला, व्यवसायाला देखील आरंभ करतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून हा दिवस प्रचलित आहे.

• महाराष्ट्राव्यतिरिक्त गुढी उभारून हा सण उत्तर भारत, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यात देखील साजरा केला जातो. गौतमीपुत्र राजाची ज्या ज्या प्रदेशात सत्ता होती त्या प्रदेशात हा सण विजयदिवस म्हणून साजरा केला जातो. “संवत्सर पाडवो”, “उगडी” अशा विविध नावांनी हा दिवस साजरा होतो. सिंधी लोक “चेटीचंड” या नावाने हा सण साजरा करतात.

• पाडव्यादिवशी काठी पूजादेखील अनेक प्रदेशात केली जाते. भारतात तसेच पूर्ण जगभरात प्राचीन काळी ज्या काठीचा सर्वाधिक वापर जीवनात व्हायचा तशीच एखादी नवीन काठी या दिवशी वापरात आणली जायची आणि ती पुजली जायची. भारतात आजदेखील विविध प्रांतात काठी-पूजा केली जाते.

• भारतीय उपखंडातील नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर राज्यातही काठीपुजा केली जाते. राजस्थान येथे गोगाजी मंदिर आणि मध्यप्रदेशमधील निमाड प्रांतात काठी पूजा आणि काठी नृत्य केले जाते. महाराष्ट्रात गुढीपाढव्याशिवाय नंदी ध्वज, जतरकाठी, काठीकवाडी हे काठी-उत्सव साजरे केले जातात. काही मंदिरात आजही या दिवशी मानाची काठी फिरवली जाते.

गुढी पाडवा – ऐतिहासिक संदर्भ

• सर्वात प्राचीन उल्लेख म्हणजे स्वतः ब्रह्मदेवाने याच दिवशी अस्तित्व निर्मिले असे वेद जाणकार म्हणतात. शिव – पार्वतीचा विवाहदेखील याच दिवशी ठरला. पाडव्यापासून सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. चौदा वर्षांचा वनवास भोगून श्रीराम आणि त्याची सेना सीतेला लंकेतून सोडवून आणून याच दिवशी अयोध्येत परत येतात. तेव्हा गुढी उभारून त्या सर्वांचे स्वागत केले गेले असा इतिहास आहे.

• महाभारत म्हणजे द्वापारयुगात उपरीचर राजाने त्याला इंद्र देवाकडून मिळालेली कळक काठी इंद्रदेवाचा आदर म्हणून जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला कळक काठीची पूजा केली. अन्य राजांनी तसेच प्रजेनेदेखील याचे अनुकरण केले आणि काठीला नवीन शालवस्त्र बांधून फुलांची माळ चढवून काठी दारासमोर उभी केली. आज जी प्रथा आहे ती प्रथा तेव्हापासून सुरू झाली असा इतिहासही काही वेळा सांगितला जातो.

गुढीपाडवा हा सण कसा साजरा केला जातो?

• चैत्र शुद्ध प्रतिपदेला पहाटे लवकर उठतात. स्नान आदी क्रिया उरकून सूर्योदयानंतर गुढी उभारतात. गुढी म्हणजे उंच बांबूपासून तयार केलेली काठी. काठी स्वच्छ धुतली जाते. त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमीवस्त्र अथवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे बसवले जाते.

• गुढी ज्या ठिकाणी लावायची ती जागा स्वच्छ करून त्यावर रांगोळी काढतात. काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. घरी गोड जेवण बनवून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. संध्याकाळी हळद-कुंकू वाहतात आणि पूजा करून उभारलेली गुढी उतरवली जाते.

गुढीपाडवा – आहाराचे महत्त्व

• चैत्र शुद्ध प्रतिपदेला आहाराचे महत्त्वदेखील आहे. भल्या पहाटे ओवा, साखर, मीठ, हिंग आणि मिरी कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. कडुनिंब हा आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयोगी असा पाला आहे. पित्त, त्वचारोग, रक्त अशुद्धी या रोगांमध्ये कडुनिंब गुणकारक आहे. तसेच या दिवशी काही लोक अंघोळीच्या गरम पाण्यात देखील कडुनिंबाचा पाला टाकतात आणि शुद्ध स्नान करतात.

• वसंत ऋतु प्रारंभ आणि चैत्र महिना हा आल्हाददायक, उत्साहवर्धक आणि उल्हासपूर्ण असा असतो. त्यामुळे या महिन्याची सुरुवात म्हणजे एक प्रकारे आनंदाची उधळणच असते.

तुम्हाला गुढीपाडवा – मराठी माहिती (Gudhi Padava Mahiti Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment