आपल्या भारतीय संस्कृतीत उपवासाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. महिलांचे उपवास हे आयुष्यभर चालूच असतात. पुरुषही त्यामागोमाग कधी कधी उपवास पकडत असतात. उपवासाला एवढे महत्त्व का दिले जाते आणि उपवास पकडण्यातील तथ्य काय आहेत ही आपण आज जाणून घेणार आहोत.
उपवास म्हणजे काय?
उपवास म्हणजे फक्त ‘उदरभरण न करणे’ हा एकच अर्थ पकडला जात नाही. उपवास असेल त्या दिवशी मौन व्रत धारण करणे, स्वतःसोबत वेळ घालवणे, एकांत साधणे, चिंतन करणे असेही अनेक प्रकार उपवासात येत असतात.
उपवास पकडल्याने शारिरीक स्वास्थ्य लाभतेच शिवाय उपवास हा एखाद्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी देखील पकडला जातो. उपवासादिवशी इच्छेचा वारंवार पाठपुरावा केल्याने आणि चिंतन केल्याने इच्छा पूर्ण होण्यासाठीचा अपेक्षित मार्ग सापडतो अशी धारणा आहे.
उपवासा दिवशीचा आहार –
अपवासादिवशी केला जाणारा आहार हे एक मोठे मिथ्यच आहे. अनेक पदार्थांचे मार्केटिंग करून ते पदार्थ उपवासाचा आहार म्हणून खपवले जातात. आहारातील पदार्थांचा समावेश हा हलकाफुलका आणि अशक्तपणा जाणवणार नाही असा असावा.
आपण आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे पाहतो जेथे उपवास पकडला जातो परंतु त्यामागचे कारण जाणून घेतले जात नाही आणि उपवासाचा पदार्थ हाच पोटभरून खाल्ला जातो. खाल्ला जाणारा पदार्थ हा कधी कधी आरोग्यदायी नसतो देखील!
आणखी एक प्रसंग म्हणजे उपवास हा देवी देवतेच्या नावाखाली फक्त भीतीदायक स्थितीत पकडला जातो. उपवासाला स्वतःची आहे ती शारिरीक आणि मानसिक स्थिती सुधारावी असे अपेक्षित असते. याउलट उपवास सुटला तर देवी कोपेल, नाराज होईल, काहीतरी बरेवाईट होईल इ. प्रकारच्या भिती देखील दाखवल्या जातात.
काही शारिरीक व्याधी निर्माण झाल्यास त्यामागील कारणे जाणून न घेता सरळसरळ उपवास पकडण्यास सांगितला जातो. त्यामुळे उपवास ही लाभदायक बाब न ठरता एक प्रथा पडून जाते.
उपवासाचे शारिरीक फायदे –
उपवासाला आपण अत्यल्प आहार घेत असल्याने किंवा आहारच घेत नसल्याने पचन संस्थेला आवश्यक असणाऱ्या आरामाची पूर्तता होते. शरीरातील सर्व विषारी घटक त्यादिवशी बाहेर पडतात आणि आंतरिक प्रक्रिया सुरळीत पद्धतीने पार पडण्यास मदत होते.
जवळजवळ सर्व रोगांचे कारण हे पोटातून सुरू होत असते. उपवास पकडल्याने पोटाची कोणतीच तक्रार राहत नाही आणि आपण शारिरीक व्याधिंतून बाहेर पडत असतो. उपवासाला जर आपण भगवंताचे स्मरण करत असू, पूजापाठ करत असू तर मानसिक शांतता व आत्मिक समाधान देखील प्राप्त होते.
टीप – उपवास करताना अपवासा मागचे कारण जाणून घ्यावे आणि मगच उपवास धरावा. शारिरीक कष्टातून बाहेर पडायचे असेल, मनातील इच्छापूर्ती करायची असेल, अध्यात्मिक साधनेचा भाग म्हणून उपवास करायचा असेल, वजन कमी करायचे असेल अशा अनेक पद्धतीची कारणे आपण स्वतः समजून घेऊन योग्य त्या सल्ल्यानुसार उपवास केला तरच फायदेशीर ठरू शकेल.