चिंता आणि नैराश्य का वाढते आहे?

मानवाचे जीवन सध्या आहे त्याप्रमाणे यापूर्वी कधीही सुखदायक आणि आरामदायक नव्हते. तरीही सध्याची पिढी ही संपूर्णतः स्वस्थ आहे असे आपण म्हणू शकत नाही. सध्या सर्व वैद्यकीय सुविधा असतानाही आपण एक उल्हासित आणि आनंदीत जीवन जगत नाहीये ही वस्तुस्थिती आहे.

आनंदीत व स्वस्थ जगण्यासाठी आपल्याला शारिरीक व मानसिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. शरीर व मनाचे नियम जाणून घ्यावे लागतील. त्यांचा स्वभाव जाणून घ्यावा लागेल. त्यानंतर योग्य कृती व सवयी अंमलात आणाव्या लागतील.

तत्पूर्वी या लेखाचा जो मुख्य मुद्दा आहे तो जाणून घेऊयात. मानवी जीवनात चिंता व नैराश्य का पसरलेले आहे, या प्रश्नाचे उत्तर हे आपल्या दैनंदिन सवयी आणि आपली आयुष्याची समज यामध्ये सामावलेले आहे.

दैनंदिन सवयी –

पूर्वी जीवन चालवण्यासाठी भरपूर कष्ट केले जायचे. यंत्रसामग्री व दळणवळणाची साधने नसल्याने मनुष्याला कष्ट केल्याविना पर्याय नसायचा. त्यामुळे मनुष्याची शारिरीक हालचाल नियमित होत असे व सर्व शारिरीक प्रक्रिया देखील नैसर्गिक नियमांनुसार होत असत.

याउलट सध्या आपण सातत्याने काम करत नाही किंवा आपले काम हे बैठ्या स्वरूपाचे झालेले आहे. अशाने शारिरीक शिथिलता व आळस वाढीस लागलेला आहे. परिणामी मानसिक आणि भावनिक निचरा होणे शक्य होत नसते.

शरीर चंचल राहत नसल्याने मन मात्र भविष्यात आणि भूतकाळात रमत राहते. शारिरीक परिश्रम आणि दैनंदिन कष्ट अनुभवात नसल्याने संघर्ष करण्यास मन नकार देत असते. परिणामी कोणत्याही प्रसंगी आणि थोड्या आव्हानात्मक परिस्थितीत आपण घाबरतो. त्यानंतर चिंता आणि नैराश्य आपल्याला घेरते.

जीवनाची ऊर्जा प्रवाहित नसल्याने आपले मन हे साचलेल्या डबक्यासारखे होत असते. वारंवार भूतकाळ व भविष्यकाळ आपल्याला सतावतो. आपल्याच मानसिक संकल्पना आपला विकास होऊ देत नाहीत.

आयुष्याची समज –

आपल्याला चांगले जीवन जगायचे असल्यास आणि चिंता, भीती, नैराश्य अशा गोष्टी टाळायच्या असतील तर आपण आयुष्याची समज वाढवायला हवी. जीवनाचे काही प्राथमिक स्वरूपाचे नियम आहेत ते समजून घ्यायला हवेत.

पुस्तक वाचन, व्यायाम, खेळ, ट्रेकिंग, चालणे, विधायक स्वरूपाचे व्हिडिओज व मुलाखती पाहणे अशा विविध प्रकारच्या सवयी आपण आपल्या जीवनात लावून घेऊ शकतो ज्यांनी आपले शरीर व मन सुदृढ होऊ शकेल. मगच आपल्या आयुष्याची समज वाढू शकते आणि जीवनाचा अनुभव प्रगाढ होऊ शकतो.

त्यानंतर चिंता आणि नैराश्य अशा बाबी आपल्या जीवनात नसतीलच शिवाय उत्साह आणि उत्फुल्लता आपले जीवन अधिकच सुखकर आणि आनंदी बनवून जाईल.

Leave a Comment