Essay On My Village in Marathi | माझे गाव – निबंध !

माझे गाव हा निबंध शालेय जीवनात लिहावाच लागतो. त्याचे मार्गदर्शन आणि लिहण्याची पद्धती ही थोडी स्वतःच्या गावाला अनुसरून असली पाहिजे. स्वतःचे गाव हे प्रत्येकाला आठवणीत असतेच. व्यक्तीची नाळ आणि बालपण त्या गावात साठवलेले असते. त्यामुळे असा निबंध लिहणे हे शालेय जीवनातील एक उपक्रम असतोच.

महत्त्वाचे मुद्दे –

• गावातील संस्कृती.

• पायाभूत सुविधा.

• उदरनिर्वाह ( शेती + व्यवसाय )

• गावचा विकास.

• सामाजिक दृष्टिकोन आणि नैतिक मूल्ये.

• गावातील आठवणी

निबंधाचा विषय – माझे गाव !

माझ्या गावाचे नाव आहे अनंतपुर! गावाला लागूनच कृष्णा नदी वाहते. माझे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे आणि शेजारून नदीही वाहत असल्याने नैसर्गिक सुंदरतेची देणगी आमच्या गावाला लाभली आहे. जवळजवळ दोनशेच्या आसपास घरे गावात असतील. बहुतेक घरे अजूनही कौलारू आहेत. 

वर्षभरातील विविध सांस्कृतिक सण आणि उत्सव आम्ही उत्साहात सर्वजण मिळून साजरे करतो. यामध्ये गणेशोत्सव आणि दिवाळी हे सण खूप आनंद देणारे असतात. आमच्या गावात दोन युवा मित्र मंडळे आहेत जी प्रत्येक वर्षी प्रत्येक सण सामाजिकरित्या उत्साहात पार पाडतात. गावची यात्रा मार्च महिन्यात असते. सर्व पाहुणे आणि इतर शहरात स्थायिक झालेली गावची मंडळी एकत्र येऊन भैरवनाथ देवाची यात्रा साजरी करतात. गावात मारुती आणि भैरवनाथ अशी दोन मंदिरे आहेत. 

गावाला एक ग्रामपंचायत देखील आहे. ज्याद्वारे गावचा सर्व कारभार व्यवस्थितरीत्या सांभाळला जातो. उपजीविकेचे साधन शेती असल्याने पिके, वनराई, झाडे आणि फळबागा यांची विपुल प्रमाणात उपलब्धता माझ्या गावात आहे. तसेच गावात मुबलक पाणीपुरवठा, सर्वांना राहण्यासाठी घरे, योग्य तो धान्य आणि भाजी पुरवठा होतो. गावात इतर गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दोन दुकाने देखील आहेत. 

गावाला एक सरकारी प्राथमिक शाळा आणि लहान मुलांची अंगणवाडी शाळा आहे. दोन्ही शाळेत मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे आणि शाळेत शिकवण्यासाठी गुणवान शिक्षक आहेत. गावचा विकास हा मुद्दा नेहमी पुढे असतो. निवडणूक होतानाच काही विकासाचे मुद्दे अगोदर विचारात घेतले जातात जेणेकरून त्या गोष्टी अंमलात आणल्या जातील. गावच्या पारावर ग्रामसभा आणि बैठक बसते ज्याद्वारे समस्या किंवा विकास यांचे मुद्दे उपस्थित केले जातात.

गावात पक्के रस्ते आणि वाहतुकीची योग्य सोय आहे. सर्व ठिकाणी बांधिलकी जपण्यासाठी सर्व कुटुंब एकत्र गावच्या कुठल्याही उपक्रमात सहभागी होतात. शेतीमुळे सर्व सण आणि उत्सव हे शेतीसंबंधित असतात. सर्व लोक मिळून शेतीसाठी एकमेकांना सहाय्य करतात. माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी गावाशी जोडल्या गेल्या आहेत ज्या मी कधीच विसरू शकत नाही. माझे अनंतपुर गाव मला खूप आवडते.

Leave a Comment