प्रस्तुत लेख हा मराठी निबंध लेखनाविषयी संपूर्ण माहिती आहे. निबंध प्रकार हा नेहमीच माहितीचा उपयुक्त खजिना असतो. मराठी निबंध (Essay In Marathi) लिखाणात अगदी मोजक्या शब्दात आणि मुद्देसूद स्वरूपात माहितीचे लेखन करणे अपेक्षित असते.
Table of Contents
मराठी निबंध माहिती | Essay In Marathi / Marathi Nibandh |
निबंध लेखनाचा फायदा – (Benefits Of Essay Writing)
निबंध लेखन नेहमीच आपले विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती असते. एखादा निबंधाचा विषय हा प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडतो. त्यामुळे निबंध वाचल्याने आणि निबंध लिहण्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात नक्कीच फरक पडतो.
वारंवार निबंधाचा सराव हाच परीक्षेतील यशासाठी उत्तम पर्याय आहे. निबंध आपल्याला जीवनाची दिशा प्रदान करू शकतात कारण एखाद्या विषयाचा संपूर्ण सार निबंधात समाविष्ट असतो.
माझा देश या विषयावर निबंध लिहल्याने आपल्याला आपल्या देशाबद्दल एक नवीन दृष्टिकोन मिळतो. तशाच प्रकारे प्रत्येक विषयावर निबंध लेखन करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील निबंधाचे महत्त्व – (Importance of Essay in Marathi)
शालेय जीवनात प्रत्येक इयत्तेत एक वेगळी निबंध वही असतेच. त्याचा फायदा असा असतो की लहानपणापासूनच विद्यार्थी निबंधाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करतात. त्यांची विचार प्रक्रिया इयत्तेनुसार सुधारत जाते.
त्यामुळे शिक्षण हे फक्त परीक्षेचे माध्यम राहत नाही तर एक विचार प्रक्रियेचा भाग होऊन जातो. एकदा विचार प्रक्रिया बदलली की विचारांप्रमाणेच जीवनातील कर्म आणि कर्तृत्वाची दिशा निवडली जाते.
म्हणजेच लहानपणी निबंधाचा सराव हा किती महत्त्वपूर्ण भाग असतो, त्याची माहिती तुम्हाला मिळाली असेलच. विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध लेखन हा तसा विस्तृत शिक्षण प्रकार म्हणून अभ्यासता येईल. विद्यार्थी त्यांच्या बुद्धीच्या प्रगल्भतेनुसार निबंधात विचार मांडतात.
निबंध लेखनाचा सराव कसा करावा – (How to Write an Essay in Marathi)
• निबंध लेखन करताना विषयाची विस्तृत माहिती असावी लागते. माहितीचा स्वतःच्या भाषेत मुद्देसूद विस्तार करायचा असतो.
• भाषण प्रकारात जसे आपल्याला माहीत असते की किती वेळ भाषण करायचे आहे तसेच निबंधात सर्वप्रथम ठरवायचे असते की किती शब्दांत निबंध लिहायचा आहे.
• आपल्या हस्ताक्षरावरून एका परिच्छेदात किती शब्द बसतात याचा अंदाज घ्यायचा असतो.
• त्यानुसार वेळ, गुण आणि निबंध लेखनासाठी असलेली जागा (पेपर, कागद, वही) याप्रमाणे निबंध लिहायचा असतो.
• ठळक मुद्दे सर्वप्रथम माहिती असले पाहिजेत. त्यानुसार मग प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण करायचे असते.
• जसे की विषयाची प्रस्तावना, विषयानुरूप मुद्दे, आणि निष्कर्ष (शेवट) अशा तीन विभागात कोणत्याही निबंधाची रचना असू शकते.
निबंधाचे प्रकार – (Types of Essay In Marathi)
प्रकार १ – प्रसंगलेखन (प्रासंगिक/वर्णनात्मक)
प्रसंग लेखन प्रकारात घडलेला प्रसंग किंवा घटना मांडायची असते. घटनेचे स्वरूप कोणतेही असेल, त्यामध्ये वास्तविकता झळकली पाहिजे. अतिशयोक्ती करून चालत नाही. या निबंध प्रकाराला वर्णनात्मक निबंध असेही म्हणतात.
एखादे पाहिलेले स्थळ, प्रसंग, निसर्गातील घडणाऱ्या घटना अशा स्वरूपाचे निबंध या प्रकारात येऊ शकतील. प्रसंगाचे वर्णन करायचे असल्याने वाचकांसमोर त्याची वास्तविकता उभी राहणे आवश्यक आहे. वाचणारा आणि लिहणारा असे दोघेही त्या प्रसंगाशी एकरूप झाले पाहिजेत.
निबंधाच्या विषयाचे वर्णन म्हणजे सर्वकाही डोळ्यासमोर उभे आहे असेच वाटले पाहिजे. त्यासाठी भाषेवरील पकड आणि लिहण्याची लकब विद्यार्थ्यांना विकसित करून घेणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे –
• निबंधाचा विषय वास्तववादी असल्याने आपली निबंधाची भाषा आणि ओघ त्याप्रमाणे असावा.
• भावनिक आणि संवेदनशील शब्दांची मांडणी करावी.
• लिहताना डोळ्यासमोर प्रसंग उभा करावा. मग घडणाऱ्या घटनांचे अतिशय सूक्ष्म काल्पनिक वर्णन करावे जेणेकरून तो प्रसंग जिवंत वाटावा.
प्रकार २ – आत्मकथन
आत्मकथन या निबंधाच्या प्रकारात व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दर्शवले जातात. आत्मकथा सादर करण्यासाठी स्वतःला त्याजागी ठेवावे लागते. समजा नदीची आत्मकथा हा विषय असेल तर स्वतः नदी होऊन बोलावे लागते.
आपल्या सभोवताली असणारे सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी आपल्याला आत्मकथा सांगू लागल्या तर कसे होईल, ते काय असू शकेल? याचे लिखाण आत्मकथन या निबंध प्रकारात करायचे असते.
आत्मकथन करताना खूप सूक्ष्म निरीक्षणाची गरज असते. विचार आणि भावना यांचा मेळ बसवावा लागतो. आत्मकथा लिहण्यासाठी अगोदर स्वतःचे विचार आणि स्वतःला काय वाटते हे माहीत असणे आवश्यक आहे. स्वतःची आत्मकथा लिहण्याचा सराव करावा.
महत्त्वाचे मुद्दे –
• माणसाप्रमाणे इतर सजीवांना, निर्जीव वस्तूंना देखील विचार करता येऊ शकतो आणि तेही भावनाशील आहेत असे मानून त्यांच्या जागी स्वतःला ठेवणे.
• त्यांचे आत्मकथन म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे सर्व जग पाहण्याचा प्रयत्न करणे.
• अशा प्रकारचे निबंध लिहल्याने आपण वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या प्रगल्भ बनत जातो.
• सर्व अस्तित्व एकच असल्याने आपण कसे एकमेकांशी जोडलेलो आहोत, आणि मानवी कृत्यांचा इतरांवर आणि जगावर कसा प्रभाव पडतो, याचे सर्व ज्ञान आणि संवेदना प्राप्त होते.
• विचार आणि भावनेने आपण इतरांना जाणून घेऊ शकतो. त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि करुणा निर्माण होऊ शकते.
प्रकार ३ – वैचारिक निबंध
वैचारिक स्वरूपाचे निबंध लिहण्यासाठी विषयाचा चांगलाच अभ्यास असावा लागतो. त्या विषयाबाबतीत सर्व ज्ञान असणे आवश्यक असते. स्वतःची दृष्टी आणि मत यांचे मुद्देसूद कथन वैचारिक निबंधात करायचे असते.
वैचारिक निबंधात तर्कशुद्ध आणि भावनाशील विचार मांडावे लागतात. त्यांची योग्य संगती बसवावी लागते. वाचणारा आणि लिहणारा या दोघांनाही तो तर्क पटला तरच वैचारिक निबंध कामी येतो.
जीवनात सर्वप्रथम एखादा विचारच असतो जो कोणत्याही कर्मासाठी जबाबदार असतो. जर लहानपणीच विद्यार्थ्यांनी नैतिकता आणि मानवतेचे विचार अंगी बाणवले तर त्यांच्या संपूर्ण जीवनाचा विकास शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेची वाढ होण्यासाठी त्यांना वैचारिक निबंध लिहावा लागतो.
एखादी स्थिती अनुकूल असेल की प्रतिकूल? त्याचे फायदे आणि तोटे तसेच सकारात्मक व नकारात्मक बाजू अशा सर्व शक्यतांची मांडणी या प्रकारच्या निबंधात करायची असते. विचार हे वैयक्तिक असल्याने ते सर्वांना पटतीलच असे नाही. त्यासाठी योग्य भाषा आणि मुद्देसूद रचना आवश्यक ठरते.
वैचारिक निबंधात समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या, जाती धर्माच्या भावना दुखावणे हा हेतू नसतो. ज्या विषयाशी निगडित निबंध असेल त्याचा सखोल अभ्यास आणि माहिती असणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे मुद्दे –
• वैचारिक स्वरूपाच्या निबंधात स्वतःचे विचार मांडायचे असल्याने ते कोणत्याही पूर्वग्रह आणि मताशिवाय मांडलेले असले पाहिजेत.
• तर्कसंगत आणि प्रत्येकाला पटतील असे विचार मांडायचा प्रयत्न करावा.
• भरपूर वाचन, व्यक्तिगत अनुभव / ज्ञान आणि सामाजिक परिस्थितीची जाण असावी. मगच वैचारिक निबंध व्यवस्थित लिहता येऊ शकतो.
• सर्वात अगोदर मुद्दे ठरवावेत. त्या मुद्द्यांवरून वैचारिक दृष्टी व्यक्त करावी. विचारांत असलेली स्पष्टता आणि परखडपणा शब्दात जाणवला पाहिजे.
• सुंदर हस्ताक्षर आणि शब्दांची योग्य मांडणी असावी. व्याकरणातील चुका टाळाव्या.
प्रकार ४ – कथनात्मक
कथनात्मक निबंध म्हणजे स्वतःचा एखादा अनुभव स्पष्ट करायचा असतो. या निबंधात प्रथम पुरुषी कथन करायचे असते. अशा निबंध लेखनासाठी भाषेवर मजबूत पकड असावी लागते. कारण कथा लिहणारा आणि वाचणारा व्यक्ती त्या कथेशी जोडला गेला पाहिजे.
या निबंध प्रकारामध्ये कथेच्या मांडणीत रसिकता आणावी लागते. समजा माझी आई असा निबंध असेल तर त्यामध्ये आईबद्दल सर्व माहितीचे कथन करायचे असते. त्यामध्ये भावनात्मक आणि वैचारिक मुद्दे सुद्धा स्पष्ट करायचे असतात.
महत्त्वाचे मुद्दे –
• कथनात्मक निबंधात जास्त अतिशयोक्ती करून चालत नाही. त्यामुळे मोजक्याच पण स्पष्ट भाषेत निबंध लिहणे आवश्यक असते.
• सर्व मुद्दे/मसुदा अगोदरच तयार करणे. प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण करणे.
• कथेचा ओघ ओळखणे आणि सर्व माहिती समाविष्ट करणे.
• सुवाच्च हस्ताक्षर आणि योग्य भाषिक पद्धतीचा वापर करावा. व्याकरणातील चुका टाळाव्या.
मराठी निबंध लेखनाच्या टिपा –
(Writing Tips for Essay In Marathi)
निबंध लेखन हा प्रकार अनेक मुद्द्यांवर आधारीत आहे. ते मुद्दे स्पष्ट स्वरूपात आपल्याला माहीत असले पाहिजेत. त्यातूनच निबंधाला आकर्षक बनवणे आपल्या हातात असते.
• निबंधाचे लिखाण करताना सुवाच्च अक्षर काढणे.
• निबंध किती शब्दात लिहायचा आहे हे माहीत असणे.
• सर्वात अगोदर मुद्दे तयार करणे. त्यानंतर निबंध लिहणे. त्यामुळे लिहताना एका प्रवाहात लिखाण होऊ शकेल. गोंधळ उडणार नाही किंवा लिहताना गडबडणार नाही.
• छोटे छोटे परिच्छेद करणे. प्रत्येक परिच्छेदात एक-एक मुद्दा स्पष्ट करणे.
• निबंध संपूर्ण लिहल्यानंतर एकदा वाचणे. व्याकरण व विराम चिन्हांच्या चुका तपासून पाहणे.
• कमीत कमी खाडाखोड करावी. जास्त अवघड शब्दांचा वापर करू नये. अतिशयोक्ती करू नये.
वरील सर्व टिप्स नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील. हस्ताक्षर आणि वैचारिक बुद्धीक्षमता वाढवण्यासाठी नक्की निबंध लेखनाचा सराव करत राहा. तुम्हाला मराठी निबंध ( Essay In Marathi / Marathi Nibandh) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…