धर्म – मराठी निबंध • Dharm Marathi Nibandh

प्रस्तुत लेख हा धर्म (Dharm Marathi Nibandh) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात धर्माच्या संकल्पना, धार्मिक सत्य व मनुष्य जन्माची संभावना अशा बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

धर्म निबंध मराठी | Dharm Essay In Marathi |

धर्माच्या अनेक संकल्पना आणि धारणा समाजात प्रचलित आहेत. आपण समाजाच्या पारंपारिक जगण्याच्या पद्धतीला धर्म मानतो तर काहीवेळा सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाला अनुसरून जी जीवनपद्धती आहे तिला धर्म मानतो. यामध्ये देखील द्वैत आणि अद्वैत अशा मान्यतांमध्ये मानवी समाज विभागला जातो. 

धर्म म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक व्यक्तीने दिल्यास प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल. धर्म आचरणात आणताना अनेक स्तरांवर व्यक्तीला साधना करावी लागते. त्या वेगवेगळ्या स्तरांवर केलेल्या साधनेला काहीजण धर्म मानतात. काहीजण कोणतेही कर्मकांड न करता बुद्धिवादी आचरणाला धर्म मानतात.

धर्म म्हणजे दैवी स्वभाव आहे, असे आपण म्हणू शकतो. मनुष्य हा एक प्राणी आहे आणि त्याची संभावना ही स्व – अस्तित्व ओळखून घेण्याची देखील आहे. त्यामुळे धर्म आचरण करताना आपला मानवी स्वभाव जो इतर प्राण्यांसारखा आहे तो आड येतो. तरीही कोणा व्यक्तीची इच्छा जर अस्तित्व जाणून घ्यायची असेल तर तो धर्म अंगिकारतो.

मनुष्याचे अस्तित्व हे शारिरीक, मानसिक आणि आत्मिक स्तरावर विभागलेले आहे. आपल्या शारिरीक प्रक्रिया या नैसर्गिक आहेत तर मानसिक क्षमता वापरून आपण आपले आयुष्य अधिक सुखकर बनवू शकतो. शरीर आणि मनाव्यतिरिक्त जे तिसरे आत्मिक अस्तित्व आहे त्याला जाणून घ्यायचे असेल तर धार्मिक आधार घ्यावा लागतो.

धार्मिक आचरण जे आपण जाणतो ते एक जगण्याची पद्धती बनलेली आहे. सध्या अस्तित्वात असलेले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध असे विविध धर्म हे अध्यात्मिक दिशेला नेणारे अगदी सुरूवातीचे पाऊल आहे. त्या धर्मांनुसार आचरण करणे आणि त्याला समजून घेणे यांमुळे आपली धार्मिक दिशा निश्चित होत असते.

धर्म जाणून घेणे म्हणजेच स्वतःचे व अस्तित्वाचे खरे रूप जाणून घेणे. ते जाणताना धार्मिक ज्ञान हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनात स्पष्ट होत जात असते. त्यानंतर स्वतः कोण आहोत हे जाणून घेणे अत्यावश्यक ठरते. मग धर्म हीच मनुष्य जन्माची सर्वात मोठी संभावना बनते आणि तिला शक्य करून दाखवणे हे आपण जन्माचे सार मानतो.

अध्यात्मिक संभावना जाणून घेण्यासाठी हजारो वर्षांपासून पृथ्वीवरील प्रत्येक प्रांतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे धार्मिक कार्य चालूच असते. व्यक्तीला साधना किंवा भक्ती अशा मार्गांनी अध्यात्मिक गती करावी लागते. तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी अध्यात्मिक मार्ग हा वेगवेगळा असल्याने वरचेवर विविध धर्मांत विरोधाभास आढळतो.

प्रत्येक धर्म म्हणजे अध्यात्मिक विकास करवून घेण्याची वेगळी जीवनपद्धती! त्यामुळे अगदी वरचेवर धार्मिक वादविवाद आणि चर्चा न करता सत्य जाणून घेण्याची क्षमता वाढवणे आणि त्या दिशेने प्रयत्नशील होणे हे केव्हाही धार्मिक सत्य व अध्यात्मिक अनुभव वाढवणारे ठरेल.

तुम्हाला धर्म हा मराठी निबंध (Dharm Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment