स्वच्छता म्हणजे एकप्रकारे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. स्वच्छतेचे महत्त्व (Swachhateche Mahattva) जाणून घेतल्याने आपण सुंदरतेचे पाईक बनत असतो. त्यामुळे आपल्या समाजाची आणि देशाची प्रगती होत असते आणि आपणही खऱ्या अर्थाने प्रगत होत असतो.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळून येण्यासाठी “स्वच्छता” या विषयावर निबंध लिहायला लावतात. वास्तविक परिस्थिती आहे तशी दर्शवणे आणि काल्पनिक विस्तार न करणे अशा बाबी या निबंधात अपेक्षित आहेत.
चला तर मग पाहुयात कसा लिहायचा स्वच्छतेचे महत्त्व हा मराठी निबंध (Swachhateche Mahattva Marathi Nibandh)
स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध ! Importance Of Cleanliness Marathi Essay |
मानवी जीवनात स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. आपले अस्तित्त्व हे इतर प्राण्यांपेक्षा अति संवेदनशील आहे. त्यांना परिसर स्वच्छतेची गरज भासत नाही, परंतु माणूस मात्र स्वच्छतेने बांधला गेला आहे. स्वच्छता नसेल तर मानवी आरोग्यात बाधा निर्माण होते.
शरीर स्वच्छ न ठेवता आपण राहू लागलो, तर शरीराचा दुर्गंध येऊ लागतो. तसेच घरातील साफसफाई केली नाही तर रोगराई, आजार, अस्वच्छता आसपास पसरते. त्यामुळे शरीर आणि परिसर स्वच्छ राखणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
परिसरात स्वच्छता नसेल तर गंभीर परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. साथीचे रोग आणि प्रदूषण अशा समस्या डोके वर काढतात. त्यामुळे कचरा व्यवस्थापन ही बाब सातत्याने कृतीत आणावी लागते. त्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत असते, पण व्यक्तिगत स्तरावर देखील स्वच्छतेबाबत सजग असणे गरजेचे आहे.
कचरा व्यवस्थापन केल्याने घर आणि परिसर स्वच्छता राखली जाऊ शकते. त्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापन हे दोन वेगवेगळे घटक असू शकतात. निरुपयोगी व सुका कचरा आपल्याला जाळता येऊ शकतो आणि ओला कचरा आपण जैविक खतासाठी वापरू शकतो.
स्वच्छतेबाबतचे उपक्रम आणि नियम हे सर्वजण पाळू शकतील असे असले पाहिजेत. जसे की सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, परिसर अस्वच्छ न ठेवणे, अशा काही उपक्रमांची अंमलबजावणी आपण सामाजिक स्तरावर करू शकतो.
परिसरातील स्वच्छता म्हणजे पर्यावरणातील सर्व घटक स्वच्छ असणे होय. नदी, नाले, डोंगर, जमीन, हवा प्रदूषित होऊ न देणे हे देखील स्वच्छतेचेच काम आहे. अशा कृतीतून आपण एका स्वच्छ समाजाची, गावाची, आणि शहराची निर्मिती करू शकतो.
स्वच्छता नसल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. अस्वच्छतेमुळे असे संसर्गजन्य आजार पसरतात ज्यामुळे संपूर्ण समाज सातत्याने रोगी बनत जातो. त्याचे परिणाम इतर प्राण्यांवर आणि वातावरणावर देखील होत असतात.
मानवी पिढी जर स्वच्छतेबाबत जागरूक नसेल तर येणारी पुढची पिढीही तशीच असू शकते. साफसफाई न करता अस्वच्छ राहणे हे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर होऊ लागते. त्याचा परिणाम म्हणून एक रुग्ण मानसिकता विकसित होत जाते.
नियमित स्वच्छता ठेवली गेली तर प्रसन्न वातावरणाची निर्मिती होते. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हा सर्व जीवनात अंगिकारला जातो. सर्वांना स्वच्छतेची जाणीव होते. अशा जाणिवेतून आपण एक स्वच्छ, सुंदर आणि सृजनशील समाज घडवू शकतो.
तुम्हाला स्वच्छतेचे महत्त्व मराठी निबंध (Swacchateche Mahattva Marathi Nibandh) कसा वाटला ? त्याबद्दल नक्की तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा…