स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा जीवन परिचय आणि प्रासंगिक घटना यांचे विस्तारपूर्वक वर्णन छत्रपती संभाजीराजे भोसले या मराठी निबंधात (Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Nibandh) करायचे असते.
छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले | Chhatrapati Sambhaji Maharaj Essay In Marathi |
स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून ओळख असणाऱ्या संभाजी महाराजांचे संपूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे होते. त्यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे १४ मे १६५७ रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ते थोरले चिरंजीव होते.
छत्रपती शिवरायांच्या सहवासात बाल संभाजी सर्व शस्त्रास्त्र, राजकीय आणि बौद्धिक शिक्षण पार पडले. त्यांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन ते लहान असतानाच झाले. त्यानंतर संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला.
संभाजी महाराज नऊ वर्षांचे असताना शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी सोबत नेले होते. संभाजी महाराज अत्यंत शूरवीर होते. तसेच ते अनेक भाषांत पारंगत देखील बनले होते. शिवरायांनी स्वतः त्यांच्यासोबत वेळ व्यतित केल्याने मुघल सत्ता आणि इतर शत्रूसत्ता यांचे हेवेदावे आणि स्वार्थी वृत्ती यांबाबत ते चांगलेच निष्णात झाले होते.
इ. स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर काही दिवसांतच राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले. शिवाजी महाराज त्यानंतर दक्षिण भारत मोहिमेवर गेले. तरुण संभाजी महाराज हे राजदरबारात रुळू लागले पण त्यांची सावत्र आई सोयराबाई आणि अमात्य अण्णाजी दत्तो यांच्याशी त्यांचे मतभेद होऊ लागले.
दरबारातील लोक संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. शिवरायांच्या अनुपस्थितीत त्यांचे निर्णय मानण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. त्यानंतर त्यांची नियुक्ती कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून करण्यात आली.
इ. स. १६८२ मध्ये औरंगजेब स्वतः दक्षिणेत चालून आला. शत्रू सैन्य अफाट असूनही स्वतःची जिद्द आणि स्वाभिमानी मावळ्यांच्या सोबतीने संभाजी महाराजांनी त्यांच्याशी निकराने लढा दिला. संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंनाही चांगलाच धडा शिकवला.
इ. स. १६८९ साली आपल्या महत्त्वाच्या सरदारांना संगमेश्वर येथे एकत्र बोलावून संभाजी महाराजांनी बैठक पार पाडली. बैठक संपल्यानंतर रायगडाकडे जात असतानाच औरंगजेबचा सरदार मुकर्रबखान याने नागोजी माने याच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला.
या हल्ल्याची संपूर्ण माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. मराठ्यांचे संख्याबळ कमी असल्याने शत्रू पक्ष विजयी ठरला. शत्रूने संभाजीराजे व कवि कलश यांना जिवंत पकडले. मुघल सत्तेपुढे शरणागती न पत्करल्याने औरंगजेबाने त्यांना अतोनात छळ करून ठार मारले. त्यांचा मृत्यू ११ मार्च १६८९ रोजी झाला.
संभाजी महाराज हे साहित्य आणि धार्मिक क्षेत्रातील गाढे जाणकार होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. आपल्या शत्रूंशी जिकीरीने लढा देऊन स्वराज्य वाढवण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी केले. अशा या धर्मवीर, युगपुरुष, साहित्यिक आणि मृत्युंजयी दुसऱ्या छ्त्रपतीस मानाचा मुजरा!
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला छत्रपती संभाजीराजे भोसले मराठी निबंध (Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Nibandh) आवडल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Nice 👏👏👍👍😊😊
Thanks