प्रस्तुत लेख हा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन (Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.
आधुनिक युगात होत चाललेले बदल हे शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहेत. त्यामधील समस्या व उपाय काय असू शकतील याची चर्चा शिक्षणातील बदलता दृष्टिकोन या निबंधात केलेली आहे.
शिक्षणातील बदलता दृष्टिकोन निबंध मराठी | Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi |
सध्या विद्यार्थी व तंत्रज्ञान यांची चांगलीच मैत्री झाल्याने विद्यार्थी हे शैक्षणिक बदल इच्छित आहेत. शिक्षण माणसाला घडवते हे अगदी सत्य असले तरी जबरदस्ती शिक्षणाचा आटापिटा होतोय याची जाणीव विद्यार्थ्यांना होऊ लागलेली आहे. म्हणजेच शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे आपण सध्या जीवनात जी प्रगती अनुभवत आहोत तिला आधार बनवूनच यापुढील कारकीर्द घडवली जाऊ शकते असा विश्वास शालेय मुलांना देखील वाटतो आहे. त्यामुळे अत्यंत प्रभावी असलेले पुस्तकी शिक्षण हे देखील विद्यार्थ्यांना नकोसे वाटते आहे.
विद्यार्थी आता मोबाईल, संगणक आणि इतर तांत्रिक उपकरणे वापरू लागल्याने दैनंदिन जीवनात सक्षमपणे व्यवहार आणि इतर उपयोगी कामे करू शकत आहेत. पुस्तकी गुणवत्ता व त्याचे कागदी प्रमाणपत्र हे कितपत योग्यपणे विद्यार्थ्यांची हुशारी ठरवू शकेल याबद्दलची जागरुकता निर्माण होऊ लागली आहे.
भविष्याची वाटचाल ओळखून जर शिक्षणाचा पाया कल्पकरित्या निर्मिला गेला तर शिक्षण हे सर्वांनाच प्रिय वाटू शकेल. तंत्रज्ञान विकसित झाल्याने त्याचा वापर आता शैक्षणिक उपक्रमांत होऊ शकतो व ते विद्यार्थ्यांना कितीतरी रंजक वाटू शकेल.
शारिरीक, मानसिक व बौद्धिक क्षमता यांचा विकास करणे हे देखील आवश्यक असल्याने तंत्रज्ञानाचा फक्त प्रभावी वापर करणे गरजेचे ठरेल. असा वापर केल्याने शिक्षण हे अति सोयीस्कर होईल आणि शिक्षणाचा उद्देश्यही पूर्ण होऊ शकेल.
विद्यार्थ्यांचे मन हे अपरिपक्व असल्याने ते लगेच भरकटू शकते. त्यामुळे त्यांना स्वभावाच्या विपरीत सवयी लागण्याच्या दाट शक्यता आहेत. तसे होऊ नये यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याची दृष्टी त्यांच्यात निर्माण व्हायला हवी. तशा उद्देश्याने शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध असायला हवी.
शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण घटक ठरतील. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रयत्न व सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. तेव्हाच विद्यार्थी शिक्षणात रस घेऊन अभ्यास, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांत सहभागी होतील.
शिक्षणातील रस निघून गेल्यास विद्यार्थी हे तंत्रज्ञानाच्या जाळ्यात असे काही गुरफटत जातील की त्यातून बाहेर पडणे हे त्यांच्यासाठी अशक्यप्राय बाब असेल. त्यासाठी भविष्यातील तोटे व धोके ओळखून सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा शिक्षणाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणे आवश्यक ठरेल.
तुम्हाला शिक्षणातील बदलता दृष्टिकोन (Shikshanatil Badalta Drushtikon Nibandh Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…