बाळासाहेब ठाकरे – मराठी निबंध | Balasaheb Thakre Nibandh Marathi

प्रस्तुत लेख हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre Nibandh Marathi) यांच्या जीवनावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात बाळ केशव ठाकरे यांचे संपूर्ण जीवनकार्य व त्यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे.

बाळ केशव ठाकरे निबंध मराठी | Balasaheb Thackeray Essay In Marathi |

बाळासाहेब ठाकरे हे एक प्रसिध्द राजकारणी, लेखक – संपादक, व्यंगचित्रकार, शिवसेना पक्ष व सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व होते. बाळासाहेबांचे संपूर्ण नाव बाळ केशव ठाकरे असे होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला.

बाळ ठाकरे यांच्या वडिलांचे नाव केशव सीताराम ठाकरे व आईचे नाव रमाबाई केशव ठाकरे असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव मीना ठाकरे तर त्यांच्या मुलांची नावे बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव अशी आहेत. बाळ ठाकरेंनी एक व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता.

बाळ ठाकरे यांनी ऑगस्ट १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक सुरू केले. मार्मिक या साप्ताहिकात त्यांनी मराठी माणसांच्या समस्यांना चित्रांमार्फत वाचा फोडली. मराठी माणूस एक व्हावा आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करता यावेत यासाठी १९ जून १९६६ रोजी त्यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली.

बाळ ठाकरे हे उत्तम वक्ते होते. शिवाजी पार्कवरील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी तर लोकांची झुंबड उडत असे. त्यांचे वक्तृत्व, मुलाखत तसेच सामना वृत्तपत्रातील त्यांचे लिखाण हा वारंवार चर्चेचा विषय असे. बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रे ही देखील अनेक प्रासंगिक सत्य सांगून जात असत.

मुंबईतील प्राथमिक गरजा व समस्या सोडवणे तसेच मराठी माणसाला न्याय मिळवून देणे अशी कार्यवृत्ती बाळ ठाकरेंनी नेहमीच दाखवली. झुणका भाकर केंद्र योजना, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण, वृद्धाश्रमे, झोपडपट्टीवासीयांना घरे, तसेच सुधारित प्रकारचे दळणवळण अशा एक ना अनेक संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या राबवल्या.

राजकारणातील बाळासाहेबांचा सहभाग हा मूळ समस्यांच्या निराकरणासाठी होता. त्यांनी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष सत्ताकारण करण्यासाठी नाही तर समाजसेवा करण्यासाठी आहे असे त्यांचे परखड मत होते. त्यांनी स्वतःहून कधीही खुर्चीचा वा पदाचा मोह बाळगला नाही. त्यामुळेच ते अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते, समाजसेवक आणि नेते घडवू शकले.

बाळ ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांनी कोणत्याही धर्माचा विरोध केला नाही परंतु आतंकवाद, भ्रष्टाचार आणि इतर देशविघातक कृत्ये घडवणाऱ्या लोकांना या देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे त्यांचे परखड मत होते. हिंदुत्वाच्या स्पष्ट भूमिकेमुळे त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ असे देखील संबोधले जाते.

बाळासाहेब हे एक हरहुन्नरी कलाकार व स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व होते. कोणावरही झालेला अन्याय त्यांना सहन होत नसे. त्यांनी सामाजिक समस्यांना आपल्या लेखणीतून, चित्रांतून, प्रसंगी राजकारणाच्या माध्यमातून सोडवण्याचा आजीवन प्रयत्न केला. अशा या महान व्यक्तिमत्त्वाचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी झाले.

तुम्हाला बाळासाहेब ठाकरे हा मराठी निबंध (Balasaheb Thakre Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

महत्त्वाची टीप*

बाळासाहेब ठाकरे या निबंधाचे लिखाण हे कोणत्याही धार्मिक व राजकीय पैलूंना समर्थन करणारे नाही. कोणाचीही भावना दुखावणे व कोणाच्याही तत्त्वांना समर्थन करणे हा या निबंध लिहण्यामागचा हेतू नसून केवळ शैक्षणिक माहितीसाठी हा निबंध प्रकाशित करण्यात आलेला आहे. धन्यवाद!

Leave a Comment