आरोग्याचे महत्त्व – मराठी निबंध | Arogyache Mahattva – Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा आरोग्याचे महत्त्व (Arogyache Mahattva Nibandh marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.

आरोग्य असेल तर मनुष्याला आनंद, सुख, शांती यांची अनुभूती अगदी सहज घेता येते नाहीतर आजार आणि मानसिक त्रास सहन करून संपूर्ण आयुष्य जगावे लागते, असा आशय या निबंधात स्पष्ट केलेला आहे.

आरोग्याचे महत्त्व निबंध | Importance of Health Essay In Marathi |

प्रत्येकाने जीवनात स्वस्थ असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपणांस सर्वप्रथम उत्तम आरोग्याचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. त्यानंतर स्वतःचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारू शकते आणि जीवनाचा आरोग्यदायी अनुभव कसा काय घेता येऊ शकतो हे देखील जाणून घ्यावे लागेल.

प्रथमतः आपण जाणून घेऊ की आरोग्य म्हणजे काय? आरोग्य हा एक असा आनंददायी अनुभव आहे जो जीवनात आपल्याला सातत्याने शारिरीक आणि मानसिक स्तरावर जाणवत असतो. आपली ऊर्जा, मन आणि शरीर हे सतत समाधानकारक स्थितीची अनुभूती घेत असतात.

आपले आरोग्य अबाधित राहिल्याने आपली उपयोगिता वाढते. आपण कोणत्याही क्षेत्रात सहजरीत्या यशस्वी होऊ शकतो. आनंद आणि तीव्रता हे आपले सहज स्वभाव बनून जातात. याउलट आपण आजारी असल्यावर आपली मानसिक व शारीरिक स्थिती ही नकारात्मक आणि जीवन विरोधी बनून जाते.

आपल्याला आजारपण असल्यास आपले मन आणि शरीर हे दुर्बलता अनुभव करते. आपल्याला काहीही करावेसे वाटत नाही. सर्व शारिरीक प्रक्रिया असुरळीत होऊन जातात. साधारण आजारी असल्यास दोन ते तीन दिवस तर कायमचा कोणता आजार असेल तर पूर्ण आयुष्य सुस्तपणे व्यतित होत असते.

आरोग्य चांगले असणे अथवा बिघडले असल्याचा सर्वात मोठा परिणाम हा मानसिक स्थितीवर होत असतो. आरोग्य चांगले असल्यास आपण आनंदी आणि प्रफुल्लित अनुभव करतो. याउलट आपले आरोग्य बिघडले असल्यास बरे होण्यासाठी वेळ तर लागतोच शिवाय आपल्या मनात त्या काळात नैराश्याची भावना घर करून जाते.

आरोग्य अबाधित राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य पद्धतीचा आहार – विहार असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण एखादा मैदानी खेळ देखील खेळू शकतो ज्याने आपल्या आरोग्यात वृद्धी होऊ शकेल. त्याशिवाय नियमित चालणे, धावणे आणि पोहणे या क्रिया देखील उपयुक्त ठरू शकतील.

आपल्याला रोगमुक्त जीवन जगण्याची इच्छा करणे आवश्यक आहे तरच आपण काहीतरी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारू शकतो. सध्या सर्वत्र एवढे प्रदूषण आणि अनारोग्य पसरले आहे की स्वतः प्रयत्न केल्याशिवाय आरोग्य प्राप्ती अशक्य आहे. आपण पाश्चिमात्य जीवनशैलीचा अट्टाहास सोडायला हवा नाहीतर आरोग्य अबाधित राहणे अशक्यच आहे.

चित्रपट – मालिका यांमधून जीवनाचे जे दर्शन घडवले जाते त्याचा आपण नकळतपणे स्वीकार करत असतो. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य लयाला जातेच शिवाय व्यसने आणि चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता देखील वाढीस लागते. म्हणजेच फक्त अनुकरण करण्याने वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक अनारोग्य पसरलेले आहे असे म्हणावे लागेल.

आपल्याला आरोग्याचे महत्त्व जाणून घेऊन स्वतःच्या आयुष्यात सर्वप्रथम बदल करावे लागतील. जीवनात जे काही उत्तम आणि उदात्त असेल त्याची आस धरावी लागेल. त्यानंतरच आपण चांगल्या आरोग्यदायी सवयींचा अंगीकार करू शकू. तेव्हा आपण स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रेरणा निर्माण करू शकू.

तुम्हाला आरोग्याचे महत्त्व हा मराठी निबंध (Arogyache Mahattva Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “आरोग्याचे महत्त्व – मराठी निबंध | Arogyache Mahattva – Marathi Nibandh |”

Leave a Comment