प्रस्तुत लेख हा राग/क्रोध (Anger) या मानवी भावनेबद्दल आहे. राग उत्पन्न होण्याची कारणे, परिणाम व उपाय यांची विस्तृत चर्चा या लेखात करण्यात आलेली आहे. त्यामधून तुम्ही नक्की जाणू शकाल की, रागावर नियंत्रण आणि रागातून मुक्तता (Anger Management in Marathi) सहजशक्य आहे.
राग/क्रोध म्हणजे काय? What Is Anger?
आपल्या मनात जे विचार आणि भावना साठवल्या जातात त्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपले सध्याचे जीवन आणि त्यामधील नाती असतात. आपण फक्त शारीरिक अस्तित्व नाही आहोत तर खूप खोल आणि सूक्ष्म अर्थाने विचारांचा आणि भावनांचा परिणाम आहोत.
माणूस हा भावनाशील प्राणी आहे. भावना मधुर असतील अथवा कटू असतील, त्यांचा थेट परिणाम विचार प्रक्रियेवर होत असतो. मग त्याच भावना शाब्दिक स्वरूपात बाहेर पडत असतात. आपल्याला क्रोध येत असेल तेव्हा कटू भावना व्यक्त होत असतात.
रागाचा एक क्षण आयुष्यात खूप मोठा फरक निर्माण करत असतो. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तिपासून तोडत असतो. त्याच रागाचा परिणाम म्हणून जीवनातील निर्णय आपण ऐन रागाच्या भरात घेत असतो.
रागात आल्यावर आपण दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देत असतो, परंतु त्याचे खरे कारण आपल्या आंतरिक विचारांत आणि भावनेत असते. आपले मन सतत दुःखी आणि कष्टी अनुभव करत असेल तर क्रोध येणे साहजिक आहे.
आपल्या शरीरावर क्रोधाचे होणारे परिणाम हे नकारात्मक असतात. आपण आतल्या आत जळत राहतो. राग केल्यानंतर मन खिन्न अनुभव करते.
स्वतःचा क्रोधी स्वभाव व्यक्तिमत्त्वावर कशा प्रकारे वाईट छाप पाडत असतो हे व्यवस्थित कळाल्यावर आपल्याला त्याचा पश्चात्ताप देखील होतो, परंतु राग शांत झाल्यानंतर आपल्याला वाटते की परत राग येणार नाही पण तसे कधीच घडत नाही. राग वारंवार येत राहतो.
त्यामुळे आपल्याला प्रथमतः राग काय आहे, विचार आणि भावना काय आहेत, हे समजून घेतले पाहिजे. राग कसा येतो, त्याचे स्वरूप कसे अभिव्यक्त होते, हे बुद्धीने आणि अनुभवानंतर जाणून घ्यावे लागेल. मग राग हा स्वतःच्या नियंत्रणात येऊ शकतो.
राग येण्याची कारणे – (Causes For Anger)
क्रोधाचे मूळ कारण म्हणजे आपल्या इच्छा, वासना, अपेक्षा पूर्ण न होणे. (स्वतःकडून व इतरांकडून)
आपली इच्छा, अपेक्षा जर स्वतःकडून असेल तर आपण जीवन चांगले जगण्यासाठी मेहनत करतो. अपयशी आले तरी पुन्हा मेहनत करतो. परंतु जे लोक स्वतःकडून अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होत नाहीत ते लोक इतरांकडून अपेक्षा ठेवू लागतात.
काहीवेळा स्वतःचा निर्णय, स्वतःची स्वप्नं जर आपण इतर लोकांवर थोपू लागलो तर आपल्याच मनात अकारण अपेक्षा निर्माण होते. त्यानंतर त्या अपेक्षेच्या काळजीने चिंताग्रस्त होतो आणि मग राग निर्माण होतो.
सततच्या क्रोधाचा परिणाम असा होतो की त्याची आपल्याला सवय लागलेली असते, त्याची नोंद इतर लोक ठेवतात पण आपल्याला समजत नाही की आपल्याला राग येतोय.
आंतरिक स्थिती सुधारणे – उपाय
समोरील व्यक्ती काहीही करो. आपल्याला राग येणे म्हणजे ती आपलीच चूक आहे, हे सर्वप्रथम मान्य केले तर रागावर आपण विजय मिळवू शकू. त्यानंतर दुसरा काही बोलला किंवा त्याची एखादी कृती ही आपल्या मनाविरूध्द झाली तर राग मनात निर्माण होत आहे, हे आपल्याला सहज जाणवते.
आपले विचार आणि भावना यांचे निरीक्षण करणे, राग उत्पन्न होत आहे याची जाणीव होणे, या गोष्टी वारंवार घडल्यावर हळूहळू राग नियंत्रणात येऊ लागतो. अचानक येणारा राग व्यक्त होण्याअगोदर आपण जर पाहिला तर राग आपल्या नियंत्रणात येऊ लागतो.
सतत सकारात्मक आणि प्रेमपूर्ण विचार व भावना उत्पन्न करत राहिल्याने एखाद्याची आंतरिक स्थिती संवेदनशील बनत जाते. आपली संवेदना वाढल्यावर राग येण्याचे कारणच उरत नाही आणि जरी राग आला तरी आपण त्याचे निरीक्षण करू शकतो आणि त्याला नियंत्रित करू शकतो.
संवेदना वाढल्यावर आपण आपोआप समाधानी आणि आनंदी जीवन अनुभवू शकतो. आनंदाचे क्षण वाढल्यावर असे सुख जाणवते की राग करणे म्हणजे फुकट वेळ वाया घालवणे. आंतरिक स्थिती संवेदनशील बनवण्यासाठी आपल्याला आहार, विचार आणि भावना शुद्ध बनवत न्याव्या लागतील.
राग कधी आवश्यक –
आपल्यावर कोणी हल्ला केला तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला रागाचा उपयोग होतो. त्यावेळी प्रतिकार करणे हे आपले कर्तव्यच आहे. तेव्हा क्रोधाची ऊर्जा ही आपल्यासाठी नैसर्गिक देणगी आहे.
रागावर नियंत्रण की मुक्तता (Anger Management in Marathi) हा लेख वाचल्यावर तुम्हाला असे कळेल की, सुरुवातीला रागाला दाबून न ठेवता नियंत्रण मिळवता येते आणि त्यानंतर रागातून मुक्तता देखील शक्य आहे.
✓ सुरुवातीला रागावर नियंत्रण मिळवणे म्हणजे रागाप्रती जागृत होत जाणे.
✓ हळूहळू राग शांत झालेला पाहणे.
✓ रागाचे परिणाम जाणून घेणे. दुसऱ्याला जबाबदार न धरता स्वतःमध्ये त्याची कारणे व उपाय शोधणे.
✓ रागावर उपाय म्हणून संवेदना वाढवत जाणे.
✓ सहानुभूती, प्रेम, करुणा अशा मानवी गुणांचा विकास करणे. त्यासाठी शुध्द आहार, विचार आणि भावना यांचे ग्रहण करणे.