प्रसंगलेखन या निबंध प्रकारात आपल्याला एखाद्या वास्तविक प्रसंगाचे वर्णन करायचे असते. प्रस्तुत लेख हा अकस्मात पडलेला पाऊस (Akasmat Padlela Paus Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे.
अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी | Akasmat Padlela Paus Nibandh Marathi
मी अनिकेत जाधव, इयत्ता आठवीत शिकतो. बाबांसोबत मला सायंकाळी गावी जायचे असल्याने मी दुपारीच शाळेतून सुट्टी घेऊन येत होतो. घरी चालत येताना अचानक ढग दाटून आले. मला समजले की आता पाऊस पडणार आहे. मी झपझप पाऊले टाकत लगबगीने घरी येऊ लागलो.
शाळेपासून माझे घर एक किलोमीटर लांब असल्याने मी घरी पोहचण्याअगोदरच पाऊस सुरू झाला. पावसाळ्याचे दिवस नसल्याने मीही अचंबित झालो की पाऊस कसा काय सुरू झाला. माझ्याकडे छत्री वगैरे काहीही नसल्याने मी रुमाल काढून डोक्याला बांधला.
सायंकाळी गावी जायचे असल्याने मला उशीर करून चालणार नव्हता. त्यामुळे मी भिजत असतानाही चालतच होतो. परंतु सोसाट्याच्या वाऱ्याने मला नको – नको झाले. पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता. पुढे जाऊन मी एका दुकानाच्या आडोशाला उभा राहिलो.
माझी स्थिती अशी झाली होती की घरी तर पोहचायचयं पण पाऊस काही थांबेना. अगदी ओलाचिंब झाल्याने सर्वप्रथम मी माझे दफ्तर बाजूला ठेवले अन् दुकानाच्या पुढे ठेवलेल्या बाकड्यावर पाऊसाकडे पाहतच काही वेळ बसलो. पाऊस आला म्हणून मी अगोदर त्रासलो होतो पण काही वेळातच मी अगदी शांत झालो.
आसपासची झाडे हलताना पाहून त्यांना शिरशिरी भरली आहे असे वाटू लागले. पाऊसाचा रिपरिप असा आवाज ऐकून सुमधुर गाण्याची लय तयार झाल्यासारखे वाटत होते. मी अलगद डोळे मिटले अन् दीर्घ श्वास घेतला तर लगेच मातीचा दरवळणारा सुगंध मला अगदी आल्हादित करून गेला.
दुकानाच्या समोर असलेल्या रस्त्यावरून काही वाहने ये – जा करत होती. काही कुत्री झाडाच्या खोडाला टेकून उभी होती. तेवढ्यात म्याऊ – म्याऊ असा आवाज करत एक भिजेलेली मांजर अगदी माझ्या शेजारीच पण बाकड्याखाली येऊन बसली. मी बाकड्यावर बसून समोर जे काही दिसेल ते फक्त न्याहाळत होतो.
दुकानात कोणीही गिऱ्हाईक नव्हते पण दुकानदार मात्र होता. त्यांनी माझी स्थिती पाहिली आणि मला सुके कापड अंग पुसण्यासाठी दिले. त्यांनी माझी विचारपूस केल्यावर मी त्यांना घरी फोन लावण्यासाठी विनंती केली. मी बाबांचा क्रमांक त्यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच फोन लावला आणि बाबांना बोलावून घेतले.
बाबा चालत आल्याचे दिसताच मला थोडा धीर आला. बाबांनी एक अतिरिक्त छत्री आणली होती. पाऊस चालूच असल्याने मी ती छत्री घेतली. भिजलेले दफ्तर तसेच अडकवले अन् बाबांसोबत चालू लागलो. चालतानाही माझ्या मनात या अकस्मात पडलेल्या पाऊसाचे चित्र रेंगाळतच होते आणि माझा मीच आनंदित होत होतो.
तुम्हाला अकस्मात पडलेला पाऊस हा मराठी निबंध (Akasmat Padlela Paus Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…