प्रस्तुत लेख हा माझी बहिण (Majhi Bahin Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. बहिणीचे गुण स्पष्ट करणारा हा निबंध म्हणजे बहिणीविषयी असणारे स्वतःचे मत व्यक्त करायचे असते.
माझी बहिण निबंध मराठी | My Sister Essay In Marathi |
बहिण ही व्यक्ती म्हणजे आपल्या दुसऱ्या आईप्रमाणे असते. आई ही अखंड वात्सल्याचा झरा असतेच परंतु त्याशिवाय सतत आपली काळजी करणारी, आपल्यावर हक्क गाजवणारी, आपल्याशी भांडणारी, आपल्यावर रुसणारी आणि आपल्यासाठी इतरांशीही भांडणारी अशी व्यक्ती कोणी असेल तर ती आपली बहीण असते.
माझ्या बहिणीचे नाव पूनम आहे. ती माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. आमच्या घरी ती सर्वात लहान असल्याने तिला आम्ही लाडाने “छोटी” म्हणतो. घरी तिचा लाड केला जातो परंतु तिला कामही सर्वात जास्त वेळा सांगितले जाते. आई आणि बाबा दोघेही तिला चांगले संस्कार मिळावेत याबद्दल नेहमी प्रयत्नशील असतात.
माझी आणि तिची दिवसातून दोन – तीन वेळा तरी भांडणे होतातच. या भांडणांना कधी माझी तर कधी तिची चूक असते. भांडणे झाल्यावर काही तासांचा अबोला असतो परंतु त्यानंतर आम्हा दोघांना एकमेकांची गरज भासतेच! झालेल्या भांडणावर चर्चा करून आम्ही पुन्हा एकमेकांशी बोलू लागतो.
आमच्या कुटुंबात आजी – आजोबा, आई – वडील आणि आम्ही दोघे भाऊ – बहिण असे मिळून सहा सदस्य आहोत. त्यापैकी सर्वात जास्त खोडकर आणि खट्याळ अशी माझी बहिणच आहे. तिला सर्वांशी संवाद करणे आवडतेच शिवाय खोड्या काढून कधीकधी ओरडा देखील खाते.
माझी बहिण सध्या इयत्ता नववीत शिकत आहे. तिला चित्रकला आणि शिक्षण अशा दोन्हींची आवड आहे. दोन्हींपैकी एका क्षेत्रात तिला तिची कारकीर्द घडवायची आहे. शालेय आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांत तिचा नेहमी सहभाग असतोच असतो. तिला नीटनेटके आणि निर्मळ राहणे आवडत असल्याने आमच्या घरी नेहमी स्वच्छता असते.
इतर मुलींप्रमाणेच माझ्या बहिणीला देखील गप्पा मारायला खूप आवडते. घरातील कोणालाच ती शांत बसू देत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर कित्येक तास चर्चा करताना तिला मी अनुभवले आहे. त्यामुळे जेव्हा तिला वेळ असेल तेव्हा तर मी तिच्यापासून दूर – दूर राहतो.
माझी बहिण आईकडून स्वयंपाक शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आई तिला सर्व कामे सांगत नाही परंतु घरी गडबड असेल त्यादिवशी मात्र तिला घरकामात मदत करावीच लागते. बाबांना सुट्टी असेल तर आम्ही सहकुटुंब फिरायला जातो. तेव्हा तर बहिणीचा थाटमाट आणि खरेदी पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो.
आपल्या मित्र मैत्रिणींची सतत स्तुती करणारी आणि आपल्या सभोवताली मनमुरादपणे आनंद निर्माण करणारी अशी माझी बहिण ही अखंड ऊर्जेचा झराच आहे. आजपर्यंत तिला मी कधीच निरुत्साही पाहिलेले नाही. ती घरी सर्वांशीच मिळून मिसळून वागते आणि सर्वांना मदत देखील करते. त्यामुळे माझी बहिण ही घरात सर्वांनाच प्रिय आहे.
तुम्हाला माझी बहिण हा मराठी निबंध (Majhi Bahin Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…