प्रस्तुत लेख म्हणजे शेतकऱ्याची आत्मकथा (Shetkaryachi Atmakatha Marathi Nibandh) या विषयावर निबंधलेखन आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हा विषय निबंध लेखनासाठी नक्की विचारला जातो. शेतकरी हा कष्ट करून अन्न पिकवत असतो. ते काम करताना शेतीसाठी सहाय्यक आणि शेतीविरोधी बाबी यांचे सविस्तर वर्णन या निबंधात करावयाचे असते.
शेतकऱ्याच्या समस्या आणि त्याला असणाऱ्या अडचणी नक्कीच दूर झाल्या पाहिजेत. याचा सारासार विचारदेखील शेतकऱ्याची आत्मकथा किंवा शेतकऱ्याचे मनोगत (Shetkaryache Manogat Marathi Nibandh) या निबंधात झाला पाहिजे. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा मराठी निबंध!
शेतकऱ्याचे मनोगत निबंध | Shetkaryache Manogat Essay In Marathi |
माझे नाव रामलाल किसन मोरे आहे. मी अभिमानाने सांगतो की मी एक शेतकरी आहे. परंतु आजची सद्यस्थिती पाहता शेतकरी असणे म्हणजे एक गुन्हा असल्यासारखे आहे. राजकारणी आणि व्यावसायिक हे शेतीसारख्या पारंपारिक उपजीविकेच्या कामाचा व्यापार बनवू पाहत आहे. त्यामुळे तीच खरी अडचण आहे आणि त्यावर मी आज माझी आत्मकथा सांगणार आहे.
आपल्या देशात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायाशी निगडित अनेक बाबी आणि जोडधंदे इथे केले जातात. परंतु त्याचा सरळसरळ लाभ शेतकऱ्याला होताना दिसत नाही. व्यापारी आणि दलाल शेतमालाचा खूप कमी भाव तोलून देतात. लागणारे कष्ट आणि गुंतवले जाणारे पैसे हे नफ्यापेक्षा जास्त असतात. त्यामुळे अनेक शेतकरी बांधव आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत.
शेतकऱ्यांना व्यक्तिगत फायदा हा त्यांच्या कष्टावर मिळतो परंतु आजची महागाई पाहता तेवढा फायदा पुरेसा ठरत नाही. मग त्यापेक्षा नफ्याची किंवा बागायत शेती करायची म्हटल्यावर पाणी आणि पैसा दोन्हीही आलेच! बॅंका, पतसंस्था या कर्जरुपी रक्कम देतात खरी, पण ती रक्कम फेडताना त्यांचाच फायदा जास्त होत असतो.
शेतीसाठी लागणारी अवजारे, रसायने यांचा अतिरिक्त वापर भरघोस उत्पन्नासाठी करावा लागतो त्यामुळे अतिरिक्त खर्च होतो. रसायने बनवणाऱ्या कंपन्या श्रीमंत होत जातात आणि जमिनीचा कस मात्र कमी होत जातो. तणनाशके आणि कीटकनाशके यांचा सततचा वापर जमिनीचा पोत बिघडवतो.
नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करणे शक्य आहे पण पीक उत्पादनासाठी लागणारा वेळ हा खूप जास्त असतो. याउलट रासायनिक खते वापरून पीक उत्पादन घेतल्यास उत्पन्न वाढते पण पिकाची आणि जमिनीची गुणवत्ता बिघडत जाते.
प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबाची काळजी असल्याने पैसा आवश्यक वाटतो. शेतीसाठी, मुलांच्या शिक्षण आणि लग्नासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक गरज असतेच. ती भागवण्यासाठी नुसत्या पारंपारिक शेतीचा पर्याय पुरेसा नसतो. त्यामुळे जमीन आणि पाण्याचा विपर्यास झाला तरी माणूस रासायनिक शेतीच करत आहे.
वाढती लोकसंख्या आणि व्यर्थ हव्यास यांमुळे खरी स्पर्धा निर्माण झालेली आहे. शेतीक्षेत्र देखील त्यामध्ये मागे नाही. त्यामुळे व्यावसायिक शेतीच आज करणे सर्वजण पसंद करतात. आधुनिक शेती संसाधनांचा वापर करून ते भरघोस उत्पन्न मिळवतात. अशा प्रकारचा फायदा ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांनाच मिळतो. सामान्य शेतकरी मात्र तसाच खितपत पडून राहतो.
सरकार प्रत्येक वेळी काहीतरी योजना घेऊन तात्पुरता फायदा करवून देते. परंतु कायमचा पर्याय शोधत नाही. निसर्गाचा तोल सांभाळून सर्व निर्णय आणि योजना यांचा मेळ बसला पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ न पाहता संपूर्ण शेती इतिहास आणि शेतीपूरक पर्यावरण याचा विचार झाला पाहिजे. तरच शेतकरी आणि शेती टिकू शकेल.
शेतकरी कष्ट करायला तयारच आहे पण सरकार आणि समाज हा त्या दिशेने प्रयत्नशील असला पाहिजे. शेतीत नक्कीच भवितव्य आणि संधी उपलब्ध असली पाहिजे. मात्र आजची सामाजिक स्थिती पाहता शेतकरी म्हणजे कोणी दुबळा नागरिक, दुय्यम घटक मानला जातो. नोकरदार, व्यावसायिक, शहरी निवासी हे प्रथम आणि श्रेष्ठ मानले जात आहेत.
माझे मनोगत म्हणजे माझे दुःख नाही तर आजची वास्तविक स्थिती आहे. माझ्या शेतकरी बांधवांसाठी माझे एवढेच सांगणे आहे की, या धरती मातेबद्दल आपल्याला थोडीशी करुणा दाखवणे गरजेचे आहे. पोटासाठी तसेच आर्थिक संपन्नता लाभण्यासाठी शेती करताना आपण जमिनीची सुपीकता मात्र कमी होऊ द्यायची नाही. कोणतेही संकट आल्यास आत्महत्या हा पर्याय नसून व्यर्थ हव्यास टाळत पारंपारिक पद्धतीनेच शेती करत राहा. त्यातच खरे सुख लाभेल!
शेतकऱ्याचे मनोगत किंवा शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध (Shetkaryachi Atmakatha Marathi Nibandh) तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा.