आनंदी राहण्याचा मूलमंत्र किंवा आनंद कसा मिळवायचा अशा प्रश्नांची उत्तरे सर्वजण शोधत असतात. प्रत्येक जण आनंद मिळवू इच्छितो किंवा आनंदी राहू इच्छितो, त्यासाठी स्वतःचे काही प्रयत्न आणि त्या दिशेची आकांक्षा कशी काय आवश्यक आहे याचं विश्लेषण प्रस्तुत लेखात करण्यात आलेले आहे.
Table of Contents
आनंदी राहण्याचे ५ सोप्पे उपाय । Easy Methods To Be Happy ।
१. काम एके काम (तेही आनंदी मनाने)
जीवनात आवडते काम करा किंवा कोणतेही काम आवडीने करा असे दोनच उपाय असतात. या दोन उपायांपैकी एक उपाय तुम्ही निवडू शकता.
काम निवडल्यानंतर ते काम आनंदी मनाने करणे आवश्यक आहे. सुरुवात आनंदी मनाने केली तर काम केल्याचा त्रास वाटत नाही.
याउलट निवांत राहणे किंवा बसून राहणे काहीजण निवडतात. पण निवांत राहिल्याने तुम्ही आळशी होऊ शकता आणि तशी मग सवयच लागून जाते. त्यासाठी आयुष्यात प्रत्येक क्षणी आळशी न होण्यासाठी काही ना काही बौद्धिक, शारीरिक, मानसिक काम करणे गरजेचे होऊन जाते.
२. नाती आणि मैत्री संबंध
तुमच्या स्वभावानुसार तुमचे मित्र बनत असतात. आनंदी किंवा दुःखी स्वभाव असणाऱ्या लोकांजवळ त्या – त्या स्वभावाचे लोकच फिरकत असतात.
आनंदी राहण्याचा प्रयत्न देखील तुमच्या सभोवती आनंदी वातावरण निर्माण करतो आणि तुम्हाला निर्व्याज आनंद प्राप्त होतो.
आपण आपल्याला नाती आणि मैत्री संबंधातूनच ओळखू शकतो. त्यामुळे स्वस्थ आणि समाधानी बनण्याचा तुमचा कल तुमची सर्व नाती सुधारून त्यांना योग्य दिशा देऊ शकतो.
एकदा का नाती सुधारली की मित्रांसोबत आणि परिवारात आनंदी राहणे आपोआपच घडत जाते.
३. विचार
एक विचार तुम्हाला दिवसाची गती प्रदान करून देऊ शकतो. रोजच्या रोज प्रत्येक दिवसाची सुरुवात एखाद्या सुंदर विचाराने करावी.
एखाद्या विधायक विचारावर सतत चिंतन करून सातत्य निर्माण करणे आपल्या हातात आहे. असे केल्यावर आपल्याला कळेल की तोच विचार जीवनात उतरू लागला आहे.
४. आहार
“जसे अन्न तसे मन” असे वारंवार आपण ऐकत असतो. त्यानुसार जसा आहार आपण घेतो. तसेच आपले मन, व्यक्तिमत्त्व घडत जाते.
स्वच्छ, ताजे व पौष्टिक अन्न ग्रहण करणे गरजेचे आहे. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य तर लाभेलच शिवाय मानसिक समाधान, आत्मिक सुख याची प्रचिती देखील येऊ लागेल.
शिळे, आळस निर्माण करेल असे, अति तिखट, मसालेदार, असंस्कारित असे अन्न न ग्रहण करणेच आनंद प्राप्तीसाठी योग्य ठरते.
५. कृतज्ञता आणि प्रेमभाव
सर्व सजीव सृष्टीबद्दल एकात्मता, कृतज्ञता आणि प्रेमभाव निर्माण करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुमच्यावर निसर्गाची, अस्तित्वाची कृपा होऊ शकते.
आपले शरीर, मन, अस्तित्व, आणि आसपासचे वातावरण जसे आहे त्याची तक्रार न करता कृतज्ञता व्यक्त करत राहणे आपल्या हातात आहे. त्यासाठी सर्व परिस्थितीचा स्वीकार करून सर्वांना प्रेम वाटत राहणे आनंदाच्या मार्गात अत्यावश्यक आहे.
वरील आनंदी राहण्याचे उपाय तुम्ही अंगिकारण्याचा प्रयत्न करून पाहा… नक्की बदल घडेल… आनंदाचा वर्षाव होईल….धन्यवाद!