पूर्व इंग्लंड खेळाडू व कप्तान मायकल वॉन यांच्या समालोचकाच्या कारकिर्दीत अनेक वादविवाद त्यांनी ओढवून घेतले आहेत. भारतीय क्रिकेट बद्दल त्यांचे विचार हे सर्वश्रुत आहेत. परंतु हे मत आता बदलताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, भारत असे तगडे संघ जर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले तर चुरशीचा मुकाबला होतच असतो. परंतु ऑस्ट्रेलिया सारखा संघ त्यांच्या मायदेशात अशा रीतीने खेळतो की दुसरे संघ त्यांच्यासमोर हलकेच वाटतात.
मागील मालिकेत पाकिस्तानला ज्या पद्धतीने हरवले ते पाहता व भारतीय संघाची तुलना करताना मायकल वॉन यांचे मत असे आहे की, “ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात हरवणे खूपच अशक्य आहे. आत्ता सद्यस्थिती पाहता टेस्ट क्रिकेट मध्ये नंबर १ ला असलेली विराट कोहलीची भारतीय क्रिकेट टीम हा कारनामा करू शकते.”
मागील दोन वर्षातील भारतीय गोलंदाजीचा उंचावलेला स्तर हे त्यामागचे कारण आहे. भारतीय फलंदाजीचे सर्वजण नेहमीच कौतुक करत असतात परंतु आता ते चित्र पालटले आहे. भारतीय गोलंदाज हे कुठल्याही प्रतिस्पर्धी संघाचे वीस बळी टिपू शकतात. यामुळेच भारतीय संघ खूपच मजबूत बनला आहे. विराट कोहलीची पाच गोलंदाजांबरोबर खेळण्याची रणनीती यशस्वी ठरत आहे. पाचही गोलंदाज हे उच्चस्तरीय आहेत. त्यामुळे भारतीय संघ परदेशात जाऊन देखील विजय प्राप्त करू शकतो.