माझा आवडता प्राणी – हत्ती मराठी निबंध | Elephant Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा माझा आवडता प्राणी – हत्ती (Elephant Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात हत्ती या प्राण्याचे राहणीमान, शरीररचना आणि वास्तव्य अशा बाबींची चर्चा करण्यात आलेली आहे.

हत्ती – मराठी निबंध | Majha Avadta Prani Hatti – Marathi Nibandh |

हत्ती हा प्राणी सर्वांना खूपच आकर्षक वाटतो. लहानपणापासून नेहमी आपण हत्तीच्या कथा ऐकत आलेलो आहोत. एवढा भला मोठा प्राणी पण स्वभावाने मात्र अगदी शांत असतो. त्याला पाण्यात खेळायला आवडते. तो नेहमी कळपाने वास्तव्य करतो.

हत्ती हा कणाधारी वंशाचा सस्तन प्राणी आहे. हत्तीचा रंग काळा असतो तर त्याची उंची जवळजवळ साडे तीन मीटर असते. त्याला एक लांब सोंड, एक शेपटी आणि चार पाय असतात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दोन सुपासारखे कान असतात. हत्ती या प्राण्याचे वास्तव्य जंगलात असते.

हत्तीच्या मोठ्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. हत्ती पिसाळला तर मोठमोठी झाडे सोंडेने उपटून किंवा गंडस्थळाच्या धडकेने पाडून टाकतात. हत्ती सस्तन प्राणी असल्याने प्रामुख्याने तो कळपाने राहतो. जंगलात हत्तीचा वावर हा कधीच एकटा नसतो.

नर हत्तींना मोठमोठे सुळे असतात. मादी हत्तीला सुळे नसतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर तर आफ्रिकेतील हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचे वजन जवळजवळ पाच ते सहा टन एवढे असते. भारतात कर्नाटक, केरळ, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठ्या प्रमाणात आढळतात.

प्राचीन काळापासून आपल्याला हत्तीचा संदर्भ सापडतो. पूर्वीच्या काळी राजे महाराजे आपल्या सैन्यात हत्तीचा समावेश करत असत. राजघराण्यातील मिरवणूक हत्तीवरून काढली जात असे. युद्ध लढताना हत्तीचा उपयोग होत असल्याने हत्तींच्या संख्येवरून देखील राजाची प्रतिष्ठा पणाला लागत असे.

एखाद्या व्यक्तीने अक्षम्य गुन्हा केल्यास त्यास हत्तीच्या पायाखाली दिले जायचे. बहुतांश लोकसंख्येचे स्थलांतर करताना हत्तीचा उपयोग होत असे. दळणवळण, इतर वन्य प्राण्यापासून संरक्षण, तसेच व्यवसायात देखील हत्तीचा उपयोग मालवाहतूक करण्यासाठी होत असे.

मृत्यू पावलेल्या हत्तीचे सूळ काढून त्याचा वापर विविध प्रकारे केला जात असे. त्या काळी हस्तिदंताचा उपयोग शोभेच्या वस्तू आणि हत्यारे बनवण्यासाठी होत असे. प्राचीन काळी घडलेल्या महाभारत युध्दातील अश्वत्थामा तर स्वर्गातील ऐरावत हत्ती हे लोकांना आजही ज्ञात आहेत.

हत्ती पाण्यात अंघोळ करणे खूपच पसंत करतात. हत्ती कळपाने पाण्यात उतरल्यास सोंडेने स्वतःच्या पाठीवर आणि दुसऱ्या हत्तींवर पाणी शिंपडतात. हत्तीची सुडौल चाल, त्याचे लहान डोळे, सुपासारखे कान हे सर्व मला खूपच आकर्षक वाटते. त्यामुळे हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे.

माझा आवडता प्राणी – हत्ती (My Favourite Animal Elephant Essay In Marathi) हा निबंध तुम्हाला कसा वाटला? याबद्दलचे तुमचे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Comment