जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्त जर अंगी बाणवली तर आयुष्यात एक सुसंगतता दिसून येते. शिस्तीचे महत्त्व जेवढ्या लवकर कळून येईल तेवढाच आयुष्यातील संघर्ष कमी होणारा असतो. शिस्त जीवनात असल्याने काय काय प्राप्त होऊ शकते तसेच कितीतरी व्यर्थ कामे टाळली जातात हे कळून येते. विद्यार्थीदशेत असताना शिस्तीचे महत्त्व निबंध (Discipline Essay In Marathi) त्यासाठीच लिहावा लागतो.
हा निबंध लिहताना तुमचे ज्ञान प्रगाढ असणे आवश्यक आहे. काल्पनिक विस्तार आणि अतिशयोक्ती न करता हा निबंध लिहावा लागतो. हा निबंध लिहण्यासाठी अतिरिक्त सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. चला तर मग पाहूया कसा लिहू शकता, “शिस्तीचे महत्त्व” हा निबंध!
शिस्तीचे महत्त्व निबंध! Importance Of Discipline Essay In Marathi |
शाळेत गेला की विद्यार्थी घडला किंवा कामावर गेला की चांगला माणूस झाला असा सहजासहजी अर्थ आपण करू शकत नाही. विद्यार्थी किंवा शिष्य असणे म्हणजे विविध गुणांची जोपासना करणे गरजेचे असते. माणूस हा आयुष्यभर शिकतच असतो, हे वाक्य एकदम बरोबर आहे. ज्या व्यक्तीने शिस्त आणि सातत्य कायम राखले तो आयुष्यभर विद्यार्थीच असतो.
जीवनाच्या कुठल्याच टप्प्यावर आपण शिकत नाही असे होत नाही. शाळेतल्या शिक्षणानंतर अनुभवाचे शिक्षण चालू होते. तेव्हा लहानपणापासून जोपासलेले गुण उपयोगात येत असतात. कोणता व्यक्ती कुठल्या गुणांनी किंवा कलेने समृद्ध असेल ते सांगता येत नाही परंतु एकदा आपल्या अंगातील कला समजली की त्यानंतर सर्वात महत्त्वाची ठरते ती म्हणजे शिस्त!
व्यक्ती कोणतेही काम करत असो, शिस्त जर बाळगली तर तो व्यक्ती संयमी आणि शांत बनत जातो. शिस्त नियमित घडवून आणण्यासाठी सातत्यही तेवढेच महत्त्वाचे ठरते. शारीरिक आणि मानसिक सुदृढता तेव्हा उपयोगी पडते. शिस्त हा गुण प्रत्येक दिशेने आपल्या जीवनात आला पाहिजे. प्रथमतः शिस्त कशी काय अंगी बाणवली जाते ते पाहूया.
सैनिक किंवा खेळाडू असतात, सर्वप्रथम त्यांना शारीरिक परिश्रम करायला लावतात तेही वेळेनुसार! कारण शरीराची कणखरता वारंवार परिश्रम केल्याने येत असते. तसेच त्यांना अडचणीच्या वेळी चांगले प्रदर्शन करून दाखवायचे असते त्यावेळी मानसिक सक्षमता कामी येते. मानसिक सक्षमता जीवनात येण्यासाठी विविध अडचणींचा आणि बिकट परिस्थितीचा सामना करणे आवश्यक ठरते. जीवनात शारीरिक किंवा मानसिक सुदृढता येण्यासाठी शिस्त आवश्यक आहे.
सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, कामात थोडासुद्धा आळस न दाखवणे, सर्व कामे वेळच्या वेळी करणे असे काही नियम त्यांना पाळावे लागतात. हे सर्व नियम पाळणे म्हणजेच शिस्त! अशा शिस्तीची सवय स्वतःला लागल्यावर आळस, आजार आणि टाइमपास हे जवळसुद्धा फिरकत नाहीत. एक सुंदर आणि व्यवस्थित कारकीर्द फक्त शिस्तीमुळे शक्य आहे.
जीवन हे जगण्यासाठी मिळालेले आहे. आपण वेळ आणि ऊर्जा एवढ्या व्यर्थ कामात वाया घालवत असतो की ज्याचा काही हिशोबच नाही. वेळेनुसार सर्व कामे झालीच पाहिजेत आणि त्यासाठी ऊर्जा खर्च झाली पाहिजे. आपली सर्व कामे बरोबर विरुद्ध दिशेने चाललेली असतात. सकाळी उशिरा उठणे, सर्व दिवस बडबड आणि टाइमपास करत घालवणे, यामुळे जीवन सफल तर बनत नाहीच शिवाय काही काळ उलटल्यानंतर जीवनाची असफलता छळू लागते.
जीवन सर्वांना समान संधी देत असते. त्यामुळे स्वतःची संधी ओळखून शरीराला आणि मनाला शिस्त लावून घ्या. आळसात आयुष्याची महत्त्वपूर्ण वर्षे उलटल्यानंतर मनात एक बेचैनी निर्माण होते ज्यामुळे व्यसन आणि वाईट सवयी जडतात. अशा वाईट सवयींचा परिणाम म्हणून आपले कुटुंब, नातेवाईक हेदेखील आपल्यामुळे त्रस्त होतात. त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर शिस्तीचा नियम स्वतःला लावून घ्या.
शिस्तीचे महत्व जाणून घेण्यासाठी फायदे आणि नुकसान यांचीच चर्चा करावी लागते. शिस्तीचे फायदे म्हणजे सुंदर, सुखी आणि आनंदी जीवन! सुरुवातीला शिस्त लावताना थोडा त्रास होईल खरा पण आयुष्यभराचा आनंद तुम्ही तुमच्यासाठी शिस्तीतून निवडत असता. याउलट शिस्तीचे नुकसान म्हणजे क्षणिक सुखाचा पाठलाग, त्यातून निर्माण होणारे दुःख आणि जीवनात व्यर्थता जाणवणे! त्यासाठी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कार्यरत असा, शिस्त महत्त्वाची आहेच.
तुम्हाला शिस्तीचे महत्त्व मराठी निबंध (Discipline Essay In Marathi) कसा वाटला ? नक्की कमेंट करून कळवा…धन्यवाद!